गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं, तर सध्या जितकी उलथापालथ झालीये, तितकी उलथापालथ कधीही झालेली दिसणार नाही. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता नेता, स्वत:चा पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात सामील होत आहे, तेही विधानसभा निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत. पण या महाराष्ट्राने एक नेता असा ही पाहिला आहे जो शेवटपर्यंत एकाच पक्षाशी निष्ठावंत राहिला, फक्त पक्षाशीच नाही तर एकाच मतदारसंघाशीही, आणि त्या मतदार संघातल्या लोकांनी सुद्धा त्या नेत्यावर जवळ जवळ ११ वेळा विश्वास ठेवला. हा नेता म्हणजे गणपतराव देशमुख, ज्यांना सर्वच जण आबासाहेब या नावाने ओळखतात. असा नेता आताच्या राजकारणात होणं म्हणजे फार दुर्मिळ आहे. ११ वेळा एकाच पक्षातून आमदार म्हणून निवडून येणं, आणि तेही एकाच मतदार संघातून, आणि तरीही एसटीने प्रवास करणारा नेता. अशा या नेत्याबद्दल जाणून घेऊया. (Ganpatrao Deshmukh)
महाराष्ट्राच्याच नाहीतर भारताच्या राजकारणात खूप कमी असे नेते असतील, ज्यांचा उल्लेख सभ्य साधा नेता म्हणून होत असेल. त्यातलेच एक तरीही एकमेव असे गणपतराव देशमुख, वयाच्या ९१ व्या वर्षीही ते राजकारणात पूर्णपणे कार्यरत होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत त्यांचा आमदार म्हणून कार्यकाळ राहीला आहे. १० ऑगस्ट १९२६ रोजी सोलापूरच्या सांगोला येथे त्यांचा जन्म झाला. विद्यार्थी असल्यापासूनच समाजसेवेत आणि चळवळीत त्यांचा सहभाग होता. याच काळात शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून ते शेतकरी कामगार पक्षातून राजकारणात आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणुकीत शेकाप कडून गणपराव देशमुखांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यांच जन्मस्थान असलेल्या सांगोला मतदारसंघातूनच पहिल्याच निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. (Political News)
शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला मातब्बर पक्ष होता. पहिल्या निवडणुकीत या पक्षाचे १५ आमदार निवडून आले होते आणि त्याकाळात कॉंग्रेसनंतर ही सर्वाधिक संख्या होती. गणपराव देशमुख यांची बहुतांश कारकीर्द विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणूनच राहिली. १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता, ११ टर्म ते सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्त्व करत होते. १९७२ साली काकासाहेब साळुंखे यांच्या विरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर १९९५ साली कॉंग्रेसच्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. शहाजी पाटील हे तेव्हा फक्त १९२ मतांनी विजयी झाले होते. हे दोन पराभव वगळता त्यांनी सांगोल्यातून सतत विजय मिळवला. १९७८ साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती. तर 1999 साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता. (Ganpatrao Deshmukh)
आमदार असले तरीही ते नेहमी एसटीने प्रवास करत होते. एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखले जाते.कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावं म्हणून नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता. त्यातही गणपतरावांचा सक्रिय सहभाग होता. टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचं दुखणं विधानसभेत मांडण्याचं काम त्यांनी केलं. साधं २ टर्म आमदार राहिल्यानंतर नेते मंत्री पदाकडे धावं घेतात. गणपतराव देशमुखांनी एकाच मतदारसंघासाठी ११ टर्म म्हणजेच ५५ वर्ष काम केलं. ते इतक्यावेळा कसे निवडून येऊ शकले? असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरातच त्यांचा निस्वार्थीपणा दिसतो. ते म्हणाले होते की ,”माझी क्षमता आणि कुवत बघून मी स्वत:च्या मतदारसंघापुरतं मर्यादित राहायचं ठरवलं. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांच्यासाठीच काम करायला वेळ कमी पडतो. विधानसभेचं अधिवेशन संपलं की मी प्रत्येक गावाला वर्षातून किमान दोन वेळा भेटी देतो. विधानसभेत झालेले निर्णय सांगतो. (Political News)
======
हे देखील वाचा : ऐरोलीत नेमकं कशाप्रकारे राजकीय गणित साधलं जाईल?
====
लोकांशी संपर्क न चुकता ठेवतो आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतो.” स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी कधीच स्वत:चा पक्ष सोडला नाही. सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांच्या नावावर रेकॉर्ड सुद्धा आहे. पण फक्त या रेकॉर्डपुरते ते मर्यादित नाहीत. एकदा आमदार बनल्यानंतर वेगवेगळ्या गाडींसाठी एकच नंबर प्लेट, हवा करण्यासाठी वापरणारे नेते आहेत. त्यांच्यासमोर एक गणपतराव देशमुख आहेत जे १९६२ साली मंत्रालयात येण्यासाठी एसटीची पायरी चढली आणि शेवटपर्यंत याच सरकारी वाहनाने प्रवास केला. अशा या लोकनेत्याचं ३० जुलै २०२१ साली निधन झालं. महराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जेव्हा जेव्हा साधेपणा, सचोटी आणि निष्ठा या बद्दल बोललं जाईलं, तेव्हा तेव्हा गणपतराव देशमुख म्हणजेच आबासाहेबांचं नाव घेतलं जाईल. (Ganpatrao Deshmukh)