अगदी दोनच दिवसांवर गणेश चतुर्थीचा वर्षातला सर्वात मोठा सण येऊन ठेपला आहे. सर्वांच्या घरात, मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्यांच्या नजर फक्त बाप्पाच्या आगमनावर टेकल्या आहेत. दहा दिवस बाप्पा आपल्यासोबत राहतील, आपला पाहुणचार घेतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन पुढच्या वर्षी नक्की येणार असे वचन देऊन जातील. आता १७ सप्टेंबरपर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त बाप्पाच्या चर्चा ऐकायला येणार आहे.
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि अतिशय प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत.महाराष्ट्रातील विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना आणि त्यात असणाऱ्या मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
या गणेश चतुर्थीच्या दहा दिवसांमध्ये गणपतीच्या मंदिरांना देखील उत्सवाचे स्वरूप असते. विविध मंदिरांमध्ये जात लोकं बाप्पाचा आशीर्वाद घेतात. अशातच महाराष्ट्रात असणाऱ्या गणेशाच्या आठ महत्वाच्या मंदिरांमध्ये देखील तुफान गर्दी असते. अष्टविनायक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आठ गणपतीच्या मंदिरांचा इतिहास आणि कथा अतिशय प्रचलित आहे. या अष्टविनायकाचे दर्शन प्रत्येकाने जीवनात एकदा तरी घेतलेच असे सांगितले जाते. याची अष्टविनायक यात्रा देखील प्रचलित आहे. आज आपण गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया या अष्टविनायकांची माहिती आणि इतिहास.
1. श्रीमोरेश्वर , मोरगाव :
अष्टविनायकापैकी मोरेश्वर गणपती हा पहिला गणपती आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर गणेश भक्त असलेल्या मोरया गोसावी यांनी बांधले आहे. सांगितले जाते की, श्रीगणेशाने मोरावर बसून सिंदुरा राक्षसाचा वध केला होता. म्हणूनच या गणपतीला मोरेश्वर असे म्हटले जाते. या मूर्तीबद्दल सांगायचे झाले तर मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळीच्या दोन मूर्ती आहेत. मंदिराच्या चार दिशेला चार दरवाजे असून, चारही दरवाजांवरती गणेशाच्या मुर्त्या आहेत. अशी मान्यता आहे की, चार दरवाजे असे दर्शवतात की चारही युगात श्री गणेश आहेत.
2. श्रीचिंतामणी, थेऊर :
अष्टविनायकापैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. या गणपतीबाबत देखील एक कथा प्रसिद्ध आहे. सांगितले जाते की, गुणासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने एक दिवस कपिलमुनींकडून चिंतामणी नावाचा हिरा चोरला. हे कपिलमुनींना समजल्यानंतर त्यांनी गणपतीला तो हिरा परत आणायला सांगितले. गणपतीने गुणासुराचा वध केला आणि कपिलमुनींची चिंता मिटवली म्हणून या गणपतीला चिंतामणी म्हटले जाते. थेऊरच्या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून, गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडेची आहे. या श्री गणेशाच्या दोन्ही डोळ्यात हिरे आणि लाल मणी आहेत.
3. श्रीसिद्धीविनायक, सिद्धटेक :
अष्टविनायकापैकी तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धीविनायक. अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती असा आहे, जो उजव्या सोंडेचा गणपती आहे. सिद्धिविनायक गणपती हे अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे आहे. खूप आधीच्या काळात या मंदिरात जाण्यासाठी होडीने नदी पार करावी लागायची. पण आता पूल बांधल्याने पायी किंवा गाडीने जाता येते. या गणपतीची आख्यायिका म्हणजे, मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस होते. ते ब्राम्हणांना खूप त्रास द्यायचे. त्यांच्यासोबत भगवान विष्णुने युद्ध केले, मात्र त्यांना त्या दानवांचा पराभव करता येत नव्हता. पुढे विष्णु शंकराजवळ गेले आणि त्यांना याबद्दल सांगितले. तेव्हा शंकरांनी सांगितले की तुम्ही लढाई सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली नाही. तेव्हा सिद्धटेक येथे भगवान विष्णुने तपश्चर्या केली आणि गणेशाला प्रसन्न केले. याठिकाणी गणपतीने विष्णुला सिद्धी प्राप्त करून दिली म्हणून गणपतीला सिद्धीविनायक म्हटले जाते.
4. श्रीमहागणपती, रांजणगाव :
चौथा गणपती म्हणजे रांजणगाव येथील श्री महागणपती. पुणे जिल्ह्यात हा गणपती आहे. रांजणगावचे महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, या मंदिराबाबत देखील एक कथा आहे. त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला एक वरदान मिळाले होते की त्याला शंकराशिवाय कोणीच मारू शकत नाही, म्हणून त्याने सर्वत्र हैदोस घातला होता. सर्व देवांना तो त्रास देत होता. तेव्हा शंकराने गणपतीचे स्मरण करून त्याच्या मदतीने या त्रिपुरासुर राक्षसाचा रांजणगाव येथे वध केला. या मंदिरातील मूर्ती तळघरात आहे. मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात.
5. श्रीविघ्नेश्वर, ओझर :
अष्टविनायकापैकी पाचवा गणपती म्हणजे श्रीविघ्नेश्वर गणपती. या मंदिरामागची कथा अशी आहे की, अभिनंदन नावाचा एक राजा होता. त्याला त्रिलोकाधीश व्हायचे होते. त्यासाठी त्याने मोठा यज्ञ सुरू केला. हे पाहून इंद्राला भीती वाटली. या भीतीपोटी त्याने विघ्नासूर नावाचा राक्षस उत्पन्न केला. त्याला त्या यज्ञात अडथळा आणण्यास सांगितले. विघ्नासराने यज्ञात अडथळा आणलाच पण दुसऱ्या सर्व यज्ञातही त्याने अडथळे आणायला सुरुवात केली. हे पाहून ऋषिमुनींनी श्रीगणपतीची आराधना केली. गणपतीने विघ्नासुरासोबत लढाई केली आणि त्याला पराभूत केले, म्हणून त्याला विघ्नेश्वर नाव पडले. या गणपती मंदिराचा गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे जडले आहेत.
6. श्रीगिरिजात्मज, लेण्याद्री :
अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजे गिरिजात्मज. पुण्यातील जुन्नर तालुक्यात हे मंदिर आहे. या मंदिराबाबतची एक कथा म्हणजे पार्वती मातेने इथे श्रीगणेशाची पार्थिव मूर्ती बनवली होती. पार्वतीला गिरिजा देखील म्हटले जाते. तिचा मुलगा म्हणजे आत्मज होय. गिरिजात्मज म्हणजेच पार्वतीचा मुलगा. म्हणून त्याला हे नाव पडले असावे असे म्हटले जाते. या मंदिरातील गणपतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मंदिरातील मूर्तीवर उजेड पडत असतो.
======
हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा
======
7. श्रीवरदविनायक, महाड :
अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजे महाड येथील वरदविनायक. या गणपतीची आख्यायिका अशी आहे की, गृत्समद नावाचे एक ऋषी होते. त्यांनी गणपतीची अर्थात विनायकाची उपासना केली. श्रीविनायक त्याला प्रसन्न झाले आणि गृत्समद ऋषींनी वर मागताना विनायकाकडे मागणी केली की, “तुम्ही या वनात वास्तव्य करा आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा” ते मान्य करुन विनायक तेथेच राहू लागले. ते भद्रक वन म्हणजे आताचे महाड होय. या ठिकाणी गृत्समद ऋषींना श्री गणेशाने वर दिला होता म्हणून येथील विनायकाला “वरदविनायक” असे म्हणतात.
8. श्रीबल्लाळेश्वर मंदिर, पाली :
अष्टविनायकापैकी आठवा गणपती म्हणजे पाली येथील श्रीबल्लाळेश्वर मंदिर. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे. कल्याण नावाचा एक व्यापारी होता त्याचा एक मुलगा होता त्याचं नाव होतं “बल्लाळ”. बल्लाळ गणपतीचा खूप मोठा भक्त होता, तो भक्तीमध्ये एवढा वेडा होता की त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लावले होते. ते सर्व जवळच्या जंगलात जाऊन गणपतीची पूजा करायचे. हे बघून त्याच्या मित्रांचे घरातील लोक अस्वस्थ झाले. त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली. पुढे बल्लाळ एकटा गणेशच्या भक्तीमध्ये लिन झाला होता. कल्याण शेठ नावाच्या व्यक्तीने गणेशाची भक्ती करत असल्यामुळे बल्लाळ खूप मारले आणि एका झाडाला बांधून त्याला जंगलातच सोडून ते निघून आले. निघताना त्याला बोलून आले की आता बोलाव तुझ्या गणेशाला तुला सोडवण्यासाठी. तेव्हा गणपती तेथे ब्राम्हणाच्या रुपात आला आणि त्याने बल्लाळला सोडवले. तेव्हापासून तिथे गणपती बल्लाळेश्वर नावाने वास्तव्य करू लागले. अशी मान्यता आहे.