माणसे जन्माला येतात तशीच ती मरणही पावतात. पण काही माणसे आपल्या कारकीर्दीमुळे तर काही माणसे आपल्या कलेमुळे लोकांच्या हृदयावर कायम आधिराज्य गाजवतात.
बॉलिवूडमधील सर्वाधीक नावाजलेले नाव म्हणजे दिलीप कुमार (Dilip Kumar). दिलीप कुमारांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली होती.
आज सकाळी ७:३० च्या दरम्यान मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होत होता म्हणून 30 जून रोजी ऍडमिट केले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या या कलाकाराने भारतीय सिनेसृष्टीला एकसे बडकर एक चित्रपट दिले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतःच्या अभिनयाने संपूर्ण बॉलिवूड दणाणून सोडले होते.

दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर या ठिकाणी दि. ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. तर त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसुफ खान असे होते. त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले.
दिलीप कुमार यांना १२ भाऊ-बहिणी होत्या. त्यामुळे या एवढ्या मोठ्या कुटुंबासोबत दिलीप कुमारांचे सुरुवातीचे आयुष्य गेले. पुढे दिलीप कुमार यांचे वडील आपल्या परिवारासोबत मुंबईमध्ये आले आणि येथेच स्थायिक झाले.
पण हलाकीच्या परिस्थितीमुळे सतत वडिलांशी वाद होत असल्याने दिलीप कुमार पुण्यात आले. याठिकाणी त्यांनी एका कॅन्टिंनमध्ये ३६ रुपये महिना या पगारावर काम सुरु केले.
नंतर घरच्यांनी केलेल्या आग्रहास्तव ते परत मुंबईत आले. याचदरम्यान त्यांना एका मित्राने कामाच्या संदर्भात बॉम्बे टॉकिजचे मालक विका रानी यांच्याकडे नेले. त्यावेळी दिलीपकुमार अत्यंत देखणे आणि रुबाबदार दिसत होते.
त्यामुळे विका रानी यांनी दिलीप कुमार यांना चित्रपटाची ऑफर दिली. पण दिलीप कुमार यांच्या वडिलांना चित्रपट म्हणजे नौटंकी वाटायची म्हणून त्यांनी दिलीप कुमारच्या या निर्णयाला विरोध केला. पण दिलीप कुमारांनी वडिलांचे ऐकले नाही. त्यांनी अखेर चित्रपटात काम करायचे ठरवले.

त्यावेळी त्यांना सर्वजण युसूफ या नावाने ओळखत असे. त्यामुळे देविका रानी त्यांना म्हणाल्या, “युसूफ मी तुला चित्रपटात लाँच करणार आहे. पण मला वाटते की तू स्क्रीन नाव ठेवावे. प्रेक्षकांना अपिल होईल आणि एक रोमँटिक हिरो म्हणून योग्य वाटेल असे तुझे नाव असायला हवे. मला दिलीप कुमार नाव चांगले वाटते. तुला या नावाबाबत काय वाटते.”
यावर दिलीप कुमार यांनीही लगेचच आपले नाव बदलून घेण्याचा निर्णय घेतला व तेंव्हापासूनच ते मोहम्मद युसुफ खान चे दिलीप कुमार झाले. पुढे त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९४४ साली ज्वार भाटा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
नंतर ते आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत राहिले होते. त्यांचे वय ४४ वर्ष असताना त्यांनी २२ वर्षीय अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी विवाह केला होता. मात्र असे असले तरी देखील ते आपल्या कामाशी एकनिष्ठ होते.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण ६५ चित्रपटात काम केले. शहीद, मेला, नदिया के पार, बाबुल, फुटपाथ, देवदास, नया दौर, मुगले -ए–आजम, गंगा जमुना, राम और श्याम, कर्मा असे अनेक हिट चित्रपट त्यांनी बॉलीवूडला दिले.
त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिजात बादशहा, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात असे. त्यांनी १९९८ मध्ये ‘किला’ हा शेवटचा चित्रपट केला होता.
असा हा अभिनयाचा बादशहा आज काळाच्या पडद्याआड गेला. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांचे निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी त्यांची पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरून ट्विट करत या अफवांचे खंडन केले होते. मात्र आता त्यांचे खरोखरच निधन झाल्याने समस्त चित्रपट सृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
अशा या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिजात बादशहा, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांना टीम क फॅक्टस तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…!
– निवास उद्धव गायकवाड