फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची निवड झाली आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत मॅक्रॉन यांनी राष्ट्रीय रॅली पक्षाच्या नेत्या मारीन ले पेन यांचा पराभव केला. सलग दुसऱ्यांदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झालेले मॅक्रॉन हे युवा नेते म्हणून फ्रान्समध्ये ओळखले जातात.
2017 मध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनले. त्यावेळी ते अवघे 39 वर्षांचे होते. राजकीयदृष्ट्या अत्यंत हुशार असलेले मॅक्रॉन त्यांच्या खाजगी आयुष्यावरुन अनेकवेळा टिकेचे धनी झालेले आहेत. तरुणवयात राजकारणात आलेले मॅक्रॉन त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले.
मॅक्रॉन यांनी 2007 मध्ये त्यांची शिक्षिका, ब्रिजिट यांच्याबरोबर लग्न केले. ब्रिजिट या मॅक्रॉनपेक्षा 24 वर्षांनी मोठ्या आहेत. मात्र हे वयाचं अंतर असले तरी ब्रिजिट आणि मॅक्रॉन यांच्यात खूप चांगली मैत्री आणि प्रेमही आहे. फ्रेंच पत्रकार आणि ब्रिजिट-मॅक्रॉनचे जवळचे सहकारी गेल चेक्लॉफ यांनी त्यांच्या एका पुस्तकात या दोघांबाबात एकमेकांशिवाय काही तासही राहू शकत नाहीत, असा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे मॅक्रॉन, ब्रेग्झिट यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत.
ब्रिजिट यांना पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत. त्यांची मुलगी मॅक्रॉन यांची मैत्रिण होती. त्याच विद्यापीठात ब्रिजिट या शिक्षिका होत्या. ब्रिजिट यांच्याबरोबर लग्न केल्यावर त्यांच्या तिन्ही मुलांचा मॅक्रॉन यांनी वडीलांप्रमाणे सांभाळ केला आहे. पाच जणांच्या या आनंदी कुटुंबाची सुरुवातीला अनेकांनी खिल्ली उडवली.
2019 मध्ये, ब्राझीलचे अध्यक्ष जेवियर बोल्सोनारो यांनी फेसबुक पोस्टमध्ये ब्रिजिट यांच्यावर बोचरी टिका केली होती. बोल्सोनारोच्या मंत्र्यांपैकी एकाने ब्रिजिट यांचे वर्णन कुरुप महिला असे केले. अर्थात मॅक्रॉन यांनी अत्यंत अपमानास्पद लिखाण, म्हणून या दोन्हीही टिकाकारांवर पलटवार केलाच, शिवाय आपले ब्रिजिट यांच्यावर प्रेम असून, एक महिला म्हणून त्यांच्याबद्दल आदर वाटतो, असे वक्तव्य केले.
इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या राजकीय कारकीर्दीत ब्रिजिट यांचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. 2017 मध्ये मॅक्रॉन यांना मरीन ले पेन यांनी आव्हान दिले होते. त्यांचा पराभव करून मॅक्रॉन राष्ट्राध्यक्ष बनले. आता दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले मॅक्रॉन यांनी ऐतिहासीक विजय मिळवला आहे.
मॅक्रॉन यांना समाजकार्याची आवड होती. त्यांनी बँकर म्हणूनही काम केले. राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस ओलांद यांच्या काळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ओलांद यांनी त्यांना आपले सल्लागार बनवले. मॅक्रॉनची क्षमता ओळखून, ओलांद यांनी मॅक्रॉन यांना मंत्रिमंडळात घेतले. त्यानंतर मॅक्रॉन यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि एकामागून एक यश मिळवत गेले.
भारताबाबत बोलायचे, तर मॅक्रॉन हे आपल्या देशाचे चांगले मित्र आहेत. मॅक्रॉन यांनी निवडणूक प्रचारावेळीही भारताबरोबरच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांची केमिस्ट्रीही चांगली मानली जाते. विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदनही केले.
फ्रान्सची निवडणूक प्रक्रीयाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेप्रमाणेच फ्रान्समध्येही राष्ट्राध्यक्ष हा सरकारचा प्रमुख असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होते. फ्रान्समध्ये 18 किंवा त्याहून अधिक वयाचा नागरिक, अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो. उमेदवार होण्यासाठी त्याला प्रथम नामांकन अर्जावर देशातील 500 महापौरांची स्वाक्षरी घ्यावी लागते. मग तो अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरच ती व्यक्ती राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकते.
या निवडणुका 2 टप्प्यात होतात. पहिल्या टप्प्यात, उमेदवाराला पन्नास टक्के मते मिळाल्यास तो निवडणूक जिंकतो. मात्र, असे जवळपास 60 वर्षांत झाले नाही. विजयी उमेदवार राष्ट्रपती भवन येथे शपथ घेतो.
=====
हे देखील वाचा – सौदी अरेबियातील महिला होतायत मुक्त! आता मिळणार चक्क बॉर्डर गार्ड्स म्हणून काम करण्याची संधी!
=====
भारताप्रमाणेच फ्रान्समध्येही 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक मतदान करतात. येथेही मतदान ईव्हीएम मशीनद्वारे होते. विशेष म्हणजे फ्रान्समध्ये मतदान नेहमी रविवारी होते. शिवाय इतर देशांमध्ये राहणारे फ्रेंच नागरिकही मतदान करू शकतात. केरळ, तामिळनाडू आणि पॉंडेचरी येथे राहणार्या 4,564 फ्रेंच नागरिकांनी 10 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान केले होते.
फ्रान्स ही जगातील सातवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पर्यटनाच्या बाबतीत फ्रान्सचा जगात पहिला क्रमांक लागतो. या देशाचे आता 44 वर्षीय इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले आहेत. कोविडकाळात मॅक्रॉन यांची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होती. मात्र जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
– सई बनी