आपल्या सख्खा शेजारी असणारा एक देश सध्या कोरोनाची झळ बसल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या देशातील प्रमुख व्यवसायचे साधन असणारं पर्यटन क्षेत्र कोलमडलं आहे. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम झाला आहे. तसंच, या क्षेत्राला पूर्वीसारखे सुगीचे दिवस कधी येतील, याबद्दल काहीही तर्क करता येत नाही. या देशाची परकीय गंगाजळीसुद्धा कमी होत चालली आहे आणि चालू वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडणार अशी परिस्थिती आहे.
या देशाचं नाव आहे, श्रीलंका! सामान्य भारतीय माणसाला रावणाची लंका म्हणून श्रीलंका माहिती आहे. भारतीयांच्या मनात या देशाचे स्वतंत्र पौराणिक महत्व आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करता भारत आणि श्रीलंका संबंध हे अत्यंत जुने, विश्वासपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे राहिले आहेत.
भारत – श्रीलंका संबंधांवर दीर्घकाळापासून संस्कृती आणि धर्म या दोन गोष्टींचा जबरदस्त प्रभाव आहे. श्रीलंकेत ७५% लोकसंख्या ही सिंहली आहे, तर उरलेले २५% लोक हे तमिळ आहेत. सिंहली भाषेचं मूळ हे ब्राह्मी भाषेत आहे. या भाषा इंडो-आर्यन भाषा म्हणून ओळखल्या जातात. पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंहलीचा ‘सिंहा’ शब्द हा मूळ संस्कृत भाषेतला आहे. सिंहा म्हणजे सिंह, सिंहाचा प्रदेश म्हणून या प्रदेशाला विशेष महत्व आहे.
चीनकडून घेतलेलं भरमसाठ कर्ज, कोरोना परिस्थितीत सरकारने कमी केलेले कर अशा सगळ्या आघाड्यांवर या देशाचं सरकार अपयशी ठरते की काय, असं वाटत आहे. या सगळ्यात मग शेजारील देश या देशाला मदत करत आहेत का, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
भारतापूरतं बोलायचं झाल्यास भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केलं की, “भारत श्रीलंकेच्या पाठीशी नेहमीप्रमाणे भक्कमपणे उभा आहे.” परिणामी श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम झाला आहे. श्रीलंकेची परकीय गंगाजळीसुद्धा कमी होत चालली आहे आणि चालू वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये, तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडणार अशी परिस्थिती आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपकसे भारत भेटीवर आले होते. याचं कारण होतं, भारत श्रीलंकेला तातडीची आर्थिक मदत देणार होता. एवढंच काय तर, श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीसुद्धा भेट घेतली. भारत श्रीलंकेला अन्नधान्य, आरोग्य व सुरक्षेसंबंधित पॅकेज देणार होता, तसंच ऊर्जा सुरक्षेसंदर्भात सुद्धा मदत करणार अशी बोलणी झाली. भारत श्रीलंकेला कच्या तेलाचा पुरवठा करणार आहे. तसंच ट्रिंकोमाली ऑइल टॅंक फार्म बद्दल सुद्धा मदत करण्याची बोलणी झाली.
एक अत्यंत महत्वाची माहिती इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे रासायनिक खतांबाबतची. चीनने श्रीलंकेला मध्यंतरी मदत म्हणून रासायनिक खतांचा पुरवठा केला होता, पण ती खते इतकी निकृष्ट दर्जाची होती की श्रीलंकेला ही मदत नाकारावे लागली. शेवटी भारत पुढे आला आणि भारताने त्वरित श्रीलंकेला खतांचं बेल आऊट पॅकेज दिलं.
श्रीलंका तर एक उदाहरण आहे. अशी असंख्य उदाहरणं आहेत, ज्यामधे भारताने भेदभाव न करता नेहमीच शेजारी राष्ट्र असो किंवा पाकिस्तान सारखा देश असो सगळ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत केली आहे. याप्रकारे भारतीय परराष्ट्र धोरणाचा पाया आपण मजबूत करत आहोत आणि करत राहू.
भारत – श्रीलंका संबंधांमध्ये मध्यंतरी दुरावा आला होता, याचं कारण २०१५ ला श्रीलंकेतल्या निवडणुकीत भारताच्या ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेने ढवळाढवळ केली होती असा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात श्रीलांकन सरकारने काही व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. पण ही कटुता पुढच्या काळात तशीच राहिली नाही. भारत सरकारने मदतीचा हात पुढे केला. चीन हा देश बेभरवशाचा आहे याची पुरेपूर जाणीव श्रीलंकेला झाली आहे, असं आपण म्हणू शकतो.
हे ही वाचा: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भात सध्या चर्चेत असलेलं एसपीजी (SPG) नक्की काय आहे?
डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का?
भारतात २०१४ ला सत्तास्थापनेनंतर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील राष्ट्रांना बरोबर घेण्याचं वचन दिलं होतं, यानुसारच भारत सार्क देशांना मदत करत आहे. श्रीलंकेला भारत मदत करतो आहे आणि भविष्यातही करत राहील, अशी आशा बहुदा श्रीलंकन सरकारला असल्यामुळे भारतासाठी ही नामी संधी आहे. याप्रसंगी भारताने योग्य पावले उचलली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून चीनला दूर ठेवून भारत श्रीलंकेला भविष्यातसुद्धा मदत करत राहील…!
– निखिल कासखेडीकर