Home » सीमोल्लंघन

सीमोल्लंघन

by Correspondent
0 comment
Eknath Khadase | K Facts
Share

सध्या सगळीकडेच सीमोल्लंघनाचे जोरदार वारे वाहत आहे. पण ते वेगवेगळ्या अर्थाने… प्रत्येकानं त्याच्या त्याच्या आयुष्यात सीमोल्लंघनाचे परिमाण आणि त्याची वेळ निश्चित केलेली आहे. त्याप्रमाणे त्याची वाटचाल होताना पाहायला मिळत आहे. मग सीमोल्लंघन नेमकं कसं कोणत्या क्षेत्रात होतंय…याबद्दल या लेखात आपण थोडी चर्चा करणार आहोत.

गेल्या तीन वर्षांपासून पक्षाने एक समृद्ध अडगळ म्हणून ज्यांना वागणूक दिली ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दसऱ्याआधीच सीमोल्लंघन केलं. त्याचा जोरदार धक्का भाजपला आणि त्यांच्या नेत्याला निश्चितच बसला आहे, परंतु, अजूनही ते मान्य करायला तयार नाहीत. महाराष्ट्रात जेव्हा लोकांना भाजपबद्दल काहीच माहित नव्हतं, अशा काळात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी आदी भाजपतल्या नेत्यांनी समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत भाजप पोहोचवण्याचं काम केलं. परंतु, गेल्या तीन वर्षात त्याच भाजपकडून त्यांना  जो काही कटू अनुभव आला, तो त्यांच्या ४० वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळातही आला नसेल, अशी वागणूक त्यांना मिळाली, असा खडसेंचा दावा होता. एकूण सगळं प्रकरण पाहिलं तर त्यात काहीअंशी तथ्य वाटण्यासारख्या अनेक बाबी होत्या. इतकं असूनही खडसेंचं भाजप प्रेम अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत अबाधित होतं. पण शेवटी एकतर्फी प्रेमात एकाला अपयश मान्यच करावं लागतं, असा अनुभव खडसेंनी घेतला. प्रत्यक्ष पाहता खडसेंचं हे काही एकतर्फी प्रेम नव्हतं. त्यांनी भाजपवर अगदी जीवापाड प्रेम केलं होतं. पण कधी कधी जीवापाड प्रेम करुनही एखाद्याचा केसाने गळा कापला जातो. तसंच काहीसं खडसेंच्याबाबतीत घडलं. अखेर खडसेंनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. खडसेंचं हे सीमोल्लंघन खऱ्याअर्थाने भाजपच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच आत्मचिंतन करायला लावणारं आहे. एकनाथ खडसेंसारखा नेता गमावणं काय असतं हे भाजपला आता नाही, तर काही दिवसांनी कळून येईल. त्याची झलक राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर खडसेंनी केलेल्या भाषणातून आली.

खडसेंच्या सीमोल्लंघनानंतर शिवसेनेतल्या काही नेत्यांनी पंकजा मुंडेंना सीमोल्लंघनासाठी आवाहन करत होते. कारण, मध्यंतरी जेव्हा पंकजा मुंडे नाराज होत्या. त्यावेळी परळीत घेतलेल्या एका जाहीर सभेत त्यांच्या व्यासपीठावरुन एकनाथ खडसे यांनी भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. त्यावेळी लोकांनी उत्स्फुर्तपणे त्यांना पक्ष सोडा, पक्ष सोडा अशा घोषणा देऊन साथ दिली होती. त्यावर खडसे मात्र, थोडं थांबा असं म्हणून त्या व्यासपीठावरुन पक्षातल्या नेत्यांना सूचक इशारा दिला होता. त्याचवेळी पंकजा मुंडे काहीतरी भूमिका घेतली अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. पण सपशेल फोल ठरली. गद्दारी करणं हे आपल्या रक्तात नाही, असं म्हणत समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या मनात जी खदखद होती, त्याला पंकजा मुंडेंनी पूर्णविराम दिला. पण खडसे मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले.

खडसेंनी जेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय़ घेतला त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. त्यातून पंकजाच्या मनात असलेलं शल्य कायम होतं. त्या फक्त दाखवून देत नव्हत्या. अशात त्यांच्या मनात वेगळी काहीतरी भूमिका जागृत व्हायला नको, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी जुळवून घेतल्याची गोष्ट समोर येते आहे. पक्षात खडसेंनंतर ओबीसी चेहरा हा पंकजा मुंडेंचा आहे. त्यांना जनमाणसात मिळणारा प्रतिसाद, मुंडेच्या कन्या यापलिकडे त्यांनी निर्माण केलेली स्वतःची ओळख ही त्यांची जमेची बाजू…. या गोष्टी पाहता फडणवीसांना त्यांच्याशी दिलजमाई करुन घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. तर याबाबत बरीच सविस्तर चर्चा झाली ती परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या घरी. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस बोर्डीकरांकडे मुक्कामी होते. त्याठिकाणी पंकजा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बरीच चर्चा होऊन काही मुद्यांवर दिलजमाई झाल्याची माहिती आहे. त्यामुळे किमान विचारांची देवाणघेवाण होत तेवढं तरी सीमोल्लंघन झालं, हेही नसे थोडके…

विजयादशमीच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात चीनचा मुद्दा उपस्थित करत सरसंघचालक मोहन भागवतांनी केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या. चीनकडून होत असलेलं सीमोल्लंघन थांबवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मोदी सरकारला सुनावले. म्हणजे त्यावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली की, केंद्र सरकार जो दावा करत होतं की, चीनने घुसखोरी केली नाही, परंतु, सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणातच हा मुद्दा उपस्थित केल्याने सरकारच्या दाव्याला पूर्णपणे छेद गेला आहे.

चिराग पासवान सारख्या तरुण नेत्याला नितीशकुमारांपासून दूर करुन स्वबळावर सत्तेत जाण्याचं स्वप्न बाळगून तिथं सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. परंतु, तेजस्वी यादवच्या झंझावातापुढे सत्तेसाठी कोण सीमोल्लंघन करणार याचा विचार बिहारमधील सर्वच राजकीय धुरिणांना करावा लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेवेळी युतीमध्ये एकत्र लढून शिवसेनेसोबत जी खेळी भाजपने केली. तसाच डाव त्यांनी बिहारमध्ये मांडल्याचं दिसत आहे. परंतु, हे सीमोल्लंघन त्यांच्यासाठी फार सोप्पं नाही. तरीही सीमोल्लंघनाची तयारी करणाऱ्या भाजपला यावेळीही अनेक धक्के पचवावे लागतील, अशीच काहीशी स्थिती तिथे पाहायला मिळत आहे.

तिकडे अमेरिकेतही ३ नोव्हेंबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. त्यात दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी आपलं नशीब आजमावणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनीही सीमोल्लंघनाची तयारी केली आहे. पण हे करत असताना भारतसोबतच चीनलाही त्यांनी त्यांच्या प्रचारात टीकेचं लक्ष्य केलं आहे. असं असताना देशांतर्गत मुद्दे बाजूला ठेवून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना असं वाटतं की, त्यात त्यांना यश मिळेल पण, त्यांचं मनासारखं सीमोल्लंघन काही होताना दिसत नाही. तरीही ते जोरदार आशा बाळगून आहेत. पण कदाचित डेमोक्रॅट पक्षाने तिथे सीमोल्लंघन केलं, तर तो ट्रम्प यांना चांगला धक्का असू शकेल.

अशा पद्धतीने देशविदेशात वेगवेगळ्या मुद्यांना धरुन सीमोल्लंघन होत आहे. पण असे सीमोल्लंघन होत असताना एखाद्या वाईटाचा नाश व्हावा असा उदात्त हेतू घेऊन प्रत्येकजण सीमोल्लंघनाची तयारी करत असतो. परंतु, त्यातील विचारात नेमकं कशाचं सीमोल्लंघन दडलं आहे, याचा अंदाज यायला मात्र थोडा उशीर लागतो हेही तितकंच खरं….

  • राजेंद्र हुंजे

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.