भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुदामा यांची जिथे भेट झाली, त्या बेट द्वारकेमध्ये नव्यानं भारतीय पुरातत्व विभाग उत्खनन करत आहे. अरबी समुद्रात असलेल्या या बेटाचा पौराणिक काळाशी संबंध आहे. भगवान श्रीकृष्णांच्या काळात येथे भव्य असे बंदर असल्याची माहिती आहे. बेट द्वारका हे द्वारका शहराच्या उत्तरेस आहे. द्वारकेपासून बेट द्वारकेला जाण्यासाठी वर्षापूर्वी बोटीचा वापर करण्यात यायचा. मात्र आता बेट द्वारकेला जाण्यासाठी सुदर्शन ब्रीज तयार करण्यात आला आहे. तेव्हापासून बेट द्वारकेला जाणा-या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. (Dwarka)
आता याच बेट द्वारकेवर भारतीय पुरातत्व विभागानं संशोधन सुरु केले असून या बेटावरील पौराणिक संदर्भाच्या वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे. गुजरातमधील द्वारका आणि बेट द्वारका येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून पुरातत्वीय संशोधन सुरु करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरु असलेल्या या संशोधनात तीन महिला डायव्हर्सचाही समावेश करण्यात आला आहे. एएसआयचे अतिरिक्त महासंचालक प्रा. आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या या संशोधनात बेट द्वारकाच्या भोवती असलेल्या समुद्रातून पौराणिक वारसा असलेल्या वस्तू शोधण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. अपराजिता शर्मा, पूनम विंद, डॉ. राजकुमारी बारबिना यांचा समावेश आहे. हे संशोधन भारतीय पुरातत्वशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरण्याचा विश्वास पुरातत्व विभागानं व्यक्त केला आहे. (Latest News)
यातून द्वारका आणि आसपासच्या ऐतिहासिक स्थळांचे पौराणिक महत्त्व सिद्ध करता येणार आहे. बेट द्वारका हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत राजा म्हणून घालवलेल्या काळात त्यांचे मूळ निवासस्थान हे बेट द्वारकेत असल्याची माहिती आहे. बेट द्वारकेचे दुसरे नाव बेट शंखोदरा आहे. कारण हा सर्व समुद्रकिनारा अनेक प्रकारच्या शंख शिंपल्यांनी भरलेला आहे. येथे आधीही झालेल्या संशोधनातून अशा अनेक वस्तू मिळाल्या आहेत, ज्यातून प्राचीन संस्कृतीची व्याप्ती समजून घेण्यास मदत झाली आहे. यापूर्वीही 2005 ते 2007 मध्ये द्वारकेच्या समुद्रकिना-यावर संशोधन कऱण्यात आले. यामध्ये भले मोठे दगडी नांगर आणि इतर महत्त्वाचे पुरातत्वीय अवशेष सापडले आहेत. मात्र द्वारकेतील द्वारकाधीश मंदिराभोवती मोकळ्या जागेचा अभाव असल्याने, हे उत्खनन थांबवण्यात आले. त्यानंतर एकदा उत्खनन झाले, त्यात द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ 10 मीटर खोल आणि 26 थर असलेल्या रचना सापडल्या आहेत. (Dwarka)
शिवाय लोखंडी आणि तांब्याच्या वस्तू, अंगठ्या, मणी आणि मातीची भांडी सापडली आहेत. हा मोठा शोध होता. तेव्हापासून भारतीय पुरातत्व विभाग द्वारका आणि बेट द्वारका परिसरात उत्खनन करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या विभागानं नऊ संशोधकांची टिम तयार केली असून भगवान श्रीकृष्णाच्या राज्याचे जुने बंदर म्हणून ओळखले जाणा-या बेट द्वारकेमध्ये नव्यानं उत्खनन सुरु झाले आहे. भगवान श्रीकृष्णांचा या बेट द्वारकेमध्येच कुटुंबासह मुक्काम असायचा, तेव्हा हे सर्वात प्रख्यात आणि व्यस्त असल्याचीही माहिती आहे. येथेच भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे. त्यापैकी एक मंदिर वल्लभाचार्यांनी बांधल्याची माहिती आहे. हे बेट मौर्य साम्राज्याच्या काळातील असल्याचेही सांगितले जाते. आता गुजरात राज्यातील इकोटुरिझमसाठी विकसित केलेले बेट द्वारका हे पहिले स्थान झाले आहे. सुदर्शन ब्रीजमुळे येथे येणा-या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढही झाली आहे. (Latest News)
=======
हे देखील वाचा : Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!
=======
भारतीय पुरातत्व विभागान येथे सुरु केलेल्या उत्खननात ज्या पौराणिक वारसा असलेल्या वस्तू मिळाल्या आहेत, त्यांच्यासाठी येथे भव्य असे संग्रहालयही उभारण्याची तयारी असल्याची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेच्या सागरी पुरातत्व केंद्राने बेट द्वारका किनाऱ्यावर आणि खोल समुद्रातही अनेक शोध मोहीमा केल्या आहेत. त्यातून मातीची भांडी, कलाकृती, मण्यांचे दागिने सापडले. 1982 च्या सुमारास 580 मीटर लांबीची संरक्षण भिंत सापडली. ही भिंत 1500 ईसापूर्व काळातील असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय अनेक दगडी नांगर आणि उद्ध्वस्त जहाजांचे अवशेषही समोर आले. त्यामुळेच या बेट द्वारकेच्या पोटात काय दडलंय, याबाबत संशोधकांना कायम उत्सुकता लागून राहिली आहे. आता नव्यानं होत असलेल्या संशोधनातूनही अशाच पौराणिक वारसा सांगणा-या वस्तू समोर येण्याची आशा आहे. (Dwarka)
सई बने