आजच्याच दिवशी २४ फेब्रुवारी २०१० ह्या दिवशी सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा द्विशतक म्हणजे २०० धावा केल्या, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यासुद्धा नाबाद. सचिन तेंडुलकरचे हे द्विशतक त्याने पुरे केले ते ५० षटके खेळून आणि २५ चौकार आणि ३ षटकरांच्या सहाय्याने. त्याने हे नाबाद द्विशतक १४७ चेंडूमध्ये केले.
हे द्विशतक त्याने ग्वालीयरच्या कॅप्टन रूप सिंह स्टेडियम वर केले. त्या सामन्यांत तो सामनावीर ठरला तर त्यावेळचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ग्वालीयर मध्ये असणाऱ्या रस्त्याला सचिन तेंडुलकर मार्ग हे नाव दिले. सचिन तेंडुलकरच्या आधी सर्वात जास्त धावांचा हा रेकॉर्ड १९४ धावांचा होता तो दोघांचा. ते दोघे म्हणजे १९९४ मध्ये बांगला देश मध्ये पाकिस्तानच्या सईद अन्वर याने केला होता तर २००९ मध्ये झिम्बावेच्या चार्ल्स कॉवेन्ट्री याने केलेला होता.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आत्तापर्यंत किती धावा केल्या, किती शतके केली हे सर्वांना तोंडपाठ असणारच परंतु आपण त्याच्या खेळण्याच्या मानसिकतेचा विचार करणार आहोत आणि त्याच्या खेळाबद्दलच्या पॅशनचा.
त्यावेळी त्याच्या साथीला महेंद्रसिंग धोनी होता, तो पण धावा करत होता, १९० नंतर सचिनला नीट स्ट्राईकही मिळत नव्हता, शेवटची धाव त्याला शेवटच्या चेंडुवर चोरटी धाव घ्यावी लागली.

अर्थात १७५ धावा झाल्यावर त्याच्या मनाने घेतले आपण २०० धावा करायच्याच. ही जिद्द मनात केली आणि ती पुरी केली.
पॅशन म्हणा डिव्होशन म्हणा त्या गोष्टीसाठी असणे आवश्यक असते. ते त्याच्याकडे होते अर्थात ते रक्तात भिनलेले हवे, त्याच्या लहानपणीचीच गोष्ट सांगतो. तो साहित्य सहवास मध्ये रहात असे, चौथ्या मजल्यांतर टेरेस होती, तेथे कधीकधी क्रिकेट खेळत असे. चेंडू खाली गेला की हा भाई सर्व जिने उतरून तितकेच जिने चढून चेंडू घेऊन येत असे कितीतरी वेळा होत असे पण क्रिकेटची जबरदस्त पॅशन असे, आणि त्याचा त्याला कंटाळा, आळस येत नसे कारण मनात खेळण्याची जबरदस्त आग असे, हीच गोष्ट त्याला यशस्वी करण्यास कारणीभूत निश्चित ठरली असणार.
सचिन तेंडुलकर या भारतीय क्रिकेटपटूने नंतर २०० धावांचा रेकॉर्ड केला. सचिन तेंडुलकर २०० धावा १४७ चेंडूत, रोहित शर्मा २०९ धावा १५८ चेंडूत, वीरेंद्र सेहवाग २१९ धावा १४९ चेंडूत तर पुन्हा रोहित शर्मा २६४ धावा १७३ चेंडूत.
परंतु २०० धावांचा पहिला मानकरी सचिन तेंडुलकरच ठरला तो २४ फेब्रुवारी २०१० मध्ये.
–सतीश चाफेकर