डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी पथाकडे वाटचाल सुरु केली आहे. 20 जानेवारी 2025 रोजी आता ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील हे जवळपास निश्चित झाले होते. यापूर्वी ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2017 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली होती. आठ वर्षानंतर व्हाईट हाऊस आणि पर्यायानं अमेरिकेवर ट्रम्पची सत्ता येणार आहे. 78 वर्षाचे ट्रम्प हे पिढीजात श्रीमंत आहेत. त्यांचे निवासस्थान म्हणजे, भव्य असा महाल आहे आणि हा महाल व्हाईट हाऊसपेक्षा अधिक मोठा आणि किंमती सामानानं सजवलेला आहे. गगनचुंबी इमारतींपासून ते कॅसिनो व्यवसायापर्यंत ट्रम्प आणि त्यांच्या परिवाराची गुंतवणूक आहे. अमेरिकेतील मोठे गृहनिर्माण प्रकल्प ते कॅसिनो निर्मितीमध्ये ट्रम्प यांच्या कंपनीचा मोठा हातभार आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प हे चांगले अभिनेते आणि बॉक्सर म्हणूनही ओळखले जातात. (Donald Trump)
जर्मनीमधून ट्रम्प यांचे आजोबा अमेरिकेच्या आश्रयाला आले होते. त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी बांधकाम व्यवसायाची सुरुवात केली. आता ट्रम्प यांची कंपनी सर्वात मोठी गृहनिर्माण कंपनी म्हणून ओळखली जाते. शिवाय अन्य व्यवसायातही त्यांचा वर चष्मा आहे. वडिलांकडून मिळालेला वारसा ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक स्वभावामुळे वाढवला. जिथे जाईन तेथे यश संपादन करेन असा दावा ट्रम्प यांचा असतो. त्यांच्या याच आक्रमक स्वभावामुळे चार वर्षानंतर ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होत आहेत. अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होणार हे आता जवळपास नक्की झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा राष्ट्राध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणण्यासारखे आहे. ट्रम्प कुटुंब हे मुळ जर्मनीचे. ट्रम्प यांचे आजोबा फ्रेडरिक हे जर्मनीचे रहिवासी होते. अशक्त असलेल्या फ्रेडरिक यांना कुठलेही काम जमायचे नाही, त्यामुळे त्यांच्या आईनं त्यांना केस कापण्याचे काम शिकवले. या कामात तरबेज झालेले फ्रेडरिक 16 व्या वर्षी अमेरिकेला आहे. कारण जर्मनीमध्ये प्रत्येक व्यक्तीला 3 वर्षाचा सक्तीची सैन्यभरती होती. अशक्त असलेल्या फ्रेडरिक यांनी सैन्य भरती टाळण्यासाठी 1885 मध्ये न्यूयॉर्क गाठले. हे ट्रम्प कुटुंब व्यवसायातच अधिक रमणारे. (International News)
त्यांच्या आजोबांनी केस कटींगमधून आलेले पैसे चक्क अलास्कातील खाणीत गुंतवले. त्याच खाणीत अगणित सोनं मिळालं, आणि ट्रम्प यांची भरभराट झाली. फ्रेडरिकनं 1902 मध्ये एलिझाबेथ क्राइस्ट नावाच्या जर्मन मुलीसोबत लग्न केलं. एलिझाबेथला अमेरिकेचं हवामान सोसलं नाही. तिला घेऊन फ्रेडरिक 1904 मध्ये जर्मनीमध्ये परत गेले. तिथेच वास्तव्य करण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र जर्मन सैन्यातील अधिकाऱ्यांनी फ्रेडरिकला देश सोडण्याचा आदेश दिला. यामुळे फ्रेडरिक जर्मनीमधून कायमचे अमेरिकेत आले, आणि कायमचे अमेरिकेचे झाले. फ्रेडरिक यांनी न्यूयॉर्कमध्ये आपला व्यवसाय सुरु केला. त्यांना तीन मुलं झाली. फ्रेड ट्रम्प हे फ्रेडरिकच्या तीन मुलांपैकी मधले. तेच डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील. फ्रेड 15 वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंब आणि व्यवसायाची जबाबदारी फ्रेड यांच्यांवर आली. त्यांनी 1927 मध्ये ‘एलिझाबेथ ट्रम्प अँड सन’ ही रिअल इस्टेट कंपनी सुरू केली. अल्पावधीतच न्यूयॉर्कमधील सर्वात यशस्वी तरुण व्यावसायिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली. मेरी ॲन मॅक्लिओड नावाच्या स्कॉटिश महिलेसोबत त्यांनी 1936 मध्ये लग्न केले. दरम्यान व्यवसाय वाढल्यानं फ्रेड यांची लोकप्रियता जशी वाढली तसेच त्यांच्याबद्दल वादही वाढले. (Donald Trump)
फ्रेड यांनी कृष्णवर्णियांना घरे देण्यास नकार दिला होता. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टिका करण्यात आली. फ्रेड आणि मेरी यांना चार मुले झाली. ट्रम्प यांचा जन्म 14 जून 1946 रोजी न्यूयॉर्क, अमेरिकेत झाला. डोनाल्ड यांच्या आधी फ्रेड जूनियर आणि दोन बहिणी आहेत. याशिवाय रॉबर्ट ट्रम्प नावाचा धाकटा भाऊ त्यांना होता. डोनाल्ड यांचे संगोपन त्यांच्या वडिलांनी अधिक केले आहे. त्यामुळे वडिलांच्या सोबत ते जास्त वेळ असायचे. याचाच परिणाम असा झाला की वडिलांच्या व्यवसायात लहानपणीच ते मोठ्या भूमिका बजावायचे. पुढे त्यांच्या मोठ्या भावानंही मला व्यवसायाची आवड नाही, मला पायलट व्हायचं आहे, म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात व्यवसायाचे सर्व अधिकार दिले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या व्यवसायाला अधिक व्यापक स्वरुप दिले. ट्रम्प हे लहानपणापासून अधिक आक्रमक होते. शाळेत त्यांच्याबद्दल तक्रारी वाढू लागल्यावर वडिलांनी त्यांना न्यूयॉर्क मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. 1964 मध्ये मिलिटरी स्कूलमधून उत्तीर्ण झाल्यानंतर ट्रम्प यांनी फोर्डहॅम विद्यापीठात दोन वर्षे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात इकॉनॉमिक सायन्समध्ये पदवी घेतली. या सर्वात ट्रम्प यांचा मोठा भाऊ अती मद्यपान केल्यामुळे मृत्यूमुखी पडला. त्यानंतर ट्रम्प यांनी आयुष्यभर दारू आणि किंवा सिगरेट घेणार नाही, अशी शपथ घेतली. (International News)
चेकोस्लोव्हाकियाची प्रसिद्ध मॉडेल इव्हाना बरोबर ट्रम्प यांनी 9 एप्रिल 1977 रोजी लग्न केले. या दोघांना डोनाल्ड जूनियर, मुलगी इवांका आणि धाकटा मुलगा एरिक अशी तीन मुलं आहेत. लग्नानंतर 8 वर्षींनी त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी मॉडेल मार्ला मॅपल्सबरोबर लग्न केले. ट्रम्प आणि मार्ला यांना टिफनी नावाची मुलगी आहे. पण हे लग्नही फारकाळ टिकले नाही. 1997 मध्ये ट्रम्प यांचा पुन्हा घटस्फोट झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी स्लोव्हेनियन मॉडेल मेलानिया नॉस हिच्याबरोबर 22 जानेवारी 2005 रोजी लग्न केले. मेलानिया आणि ट्रम्प यांना बॅरन ट्रम्प नावाचा मुलगा आहे. 2017 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मेलानिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झाल्या होत्या. आताही त्या 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी होणार आहेत. (Donald Trump)
तीन लग्न झाली असली तरी ट्रम्प यांचे वैयक्तिक आय़ुष्य अनेक वादांनी भरलेले आहे. अनेक महिलांबरोबर त्यांचे नाव जोडले गेले. त्यात काही पॉर्नस्टारही आहेत. ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष असलेले ट्रम्प यांचे अमेरिकेतील सर्वच प्रमुख शहरात गगनचुंबी टॉवर, कॅसिनो आणि हॉटेल आहेत. न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमधील 58 मजली ट्रम्प टॉवर, ताजमहाल कॅसिनो त्यांच्याच कंपनीने उभारले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1996 मध्ये मिस युनिव्हर्स, मिस यूएसए आणि मिस टीन यूएसए या तीन सौंदर्य स्पर्धांना भरपूर पैसा दिला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली. ट्रम्प यांनी 2004 मध्ये ‘द अप्रेंटिस’ हा टीव्ही रिॲलिटी शो सुरू केला. शोमध्ये निवडलेल्या स्पर्धकांना ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट मिळायचे. यासाठी ट्रम्पच स्पर्धकांना प्रश्न विचारायचे. या ट्रम्प शोचे 14 सीझन झाले. या शोच्या माध्यमातून ट्रम्प हे प्रसिद्ध मीडिया व्यक्तिमत्त्व बनले. शिवाय हॉलिवूड चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘होम अलोन 2: लॉस्ट इन न्यूयॉर्क’, ‘द लिटल रास्कल’, सेक्स अँड द सिटी सारख्या जवळपास 30 चित्रपट आणि मालिकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका केल्या आहेत. (International News)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !
====
एक कुस्तीगीर म्हणूनही त्यांची ओळख आहे. 1991 आणि 2004 मध्ये WWE मध्येही ट्रम्प यांनी आपला हात आजमावला होता. 2000 सालापासून ट्रम्प अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते. आपण अमेरिकेचे राष्ट्रपती होणार हे त्यांनी तेव्हाच आपल्या मित्रमंडळींमध्ये सांगितले होते. ट्रम्प यांनी 2015 मध्ये अधिकृतपणे अमेरिकेच्या राजकारणात उडी घेतली. त्यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेने ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली. अर्थात आत्ताही याच घोषणेवर ट्रम्प यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलही. 2017 मध्ये ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी स्थलांतराबाबत त्यांनी कठोर निर्णय घेतले. ट्रम्प अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या योजनेवर काम सुरू केले. मुस्लिम देशांतून अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घातली. मोठ्या कंपन्या आणि श्रीमंत व्यक्तींसाठी करात कपातही केली. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनशीबरोबर त्यांची असलेली मैत्रीही चर्चेत राहिली. 2020 च्या निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका ठेऊन जो बिडेन यांनी कशापद्धतीनं अमेरिकेचा -हास केला आहे हे अमेरिकन नागरिकांना पटवून दिले आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प हे रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. लवकरच ट्रम्प यांचा कार्यकाल कसा असेल हे स्पष्टही होईल. (Donald Trump)
सई बने