Home » दोन देशांमध्ये कुत्रे ठरले वादाचे कारण….

दोन देशांमध्ये कुत्रे ठरले वादाचे कारण….

by Team Gajawaja
0 comment
South Korea and North Korea
Share

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया (South Korea and North Korea)हे दोन देश पारंपारिक विरोधक देश म्हणून परिचित आहेत.  त्यातही उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन याच्या सणकी स्वभावानं अख्खं जग परिचित आहे.  याच किम जोंगनं काही वर्षापूर्वी दक्षिण कोरियाला एक भेटवस्तू दिली होती.  परस्परांचे विरोधक असलेल्या या दोन देशांमध्ये मध्यंतरी मैत्रिपूर्ण वातावरणात चर्चा झाल्या होत्या.  या चर्चांसाठी एकत्र आलेल्या या दोन देशांच्या नेत्यांना एकमेकांना भेटवस्तू दिल्या.  त्यातल्याच एका भेटवस्तूनं आता दोन देशात तणाव निर्माण केला आहे.  उत्तर कोरियाच्या किम जोंगनं तत्कालीन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांना चक्क कुत्रे भेट स्वरुपात दिले होते.  आता याच कुत्र्यांच्या पालनपोषणाचा खर्च जमत नसल्यानं त्यांना सोडून देण्याचा विचार माजी अध्यक्ष करीत आहेत.  पण हे कुत्रे काही सामान्य नाहीत.  किम जोंगनं दिलेली ही भेट रस्त्यावर सोडली तर त्याचे काय परिणाम होतील…किम जोंग त्याबदल्यात काय करेल याचा नेम नाही, याची जाणीव दक्षिण कोरियाला आहे.  त्यामुळेच या कुत्र्यांमुळे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये (South Korea and North Korea)पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांनी 4 वर्षांपूर्वी  हे कुत्रे 2018 मध्ये दक्षिण कोरियाचे तत्कालीन अध्यक्ष मून जे-इन यांना भेट म्हणून दिले होते.  आता या कुत्र्यांचा खर्च दक्षिण कोरियाच्या नव्या अध्यक्षांनी करायला नकार दिला आहे,  आणि त्यातूनच सगळा पेच निर्माण झाला आहे.  या कुत्र्यांची जात  पुंगसान, किंवा फुंगसान म्हणून ओळखली जाते.  कोरियामधील शिकारी कुत्र्यांची ही एक जात आहे.  हे कुत्रे अतिशय दुर्मिळ समजले जातात  आणि त्यामुळेच त्यांची किंमतही लाखात आहे. काहीवेळा उत्तर कोरिया-चीन सीमेवरून या कुत्र्यांची तस्करीही केली जाते.  याच पुंगसान कुत्र्यांची जोडी, गोमी आणि सॉन्गगँग ही दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये (South Korea and North Korea)सध्या चर्चेत आहे. दक्षिण कोरियाला भेट म्हणून मिळालेली ही कुत्र्यांची जोडी,  तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मून आपला कार्यकाळ पूर्ण करून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले तेव्हा आपल्यासोबत घेतली.  दक्षिण कोरियाचे नवे अध्यक्ष म्हणून युन सुक येओल यांनी मे महिन्यात शपथ घेतली.  मात्र नव्या अध्यक्षांकडे या कुत्र्यांना न पाठवता मून यांनी ते सांभळण्याचा निर्णय घेतला.  हाच निर्णय पुढे त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरला.  

दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मून यांनी आता या कुत्र्यांच्या जोडीला सोडण्याची घोषणा केली आहे.  विद्यमान राष्ट्रपतींकडून कायदेशीर आणि आर्थिक मदत न मिळणे हे प्रमुख कारण आहे. या कुत्र्यांच्या संगोपनाचा खर्च सरकारी बजेटमधून होणार होता.  असा करारही झाला होता.  मात्र  सध्याचे  अध्यक्ष युन सुक-योल यांच्या प्रशासनाच्या विरोधामुळे सरकार आता हा खर्च देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मून यांनी केला आहे.  या कुत्र्यांना सोडून देण्यासाठी मूनही तयार नाहीत.  कारण ते त्यांच्याबरोबर भावनिकरित्या जोडले गेले आहेत.  त्यांनी सोशल मिडीयावरुन या कुत्र्यांबाबत वाटणा-या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  पण प्रेमळ भावनांमुळे त्यांचा खर्च भागवता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  किम जोंग उनकडून हे कुत्रे भेट म्हणून मिळाल्यावर मून जे-इन आणि त्यांची पत्नी किम जंग-सुक यांनी या कुत्र्यांबरोबर अनेक चांगले क्षण व्यतित केल्याचे म्हटले आहे.  या कुत्र्याच्या जोडीसाठी एकूण 2.5 दशलक्ष वॉन ($1,800) मासिक अनुदान देण्यासाठी आता दक्षिण कोरियाचे सरकार मूनशी चर्चा करत आहे.  दक्षिण कोरियाच्या नवीन अध्यक्षांकडे पहिल्यापासून चार कुत्री आणि तीन मांजरी आहेत.  त्यातच या दोन कुत्र्यांचा खर्च त्यांना नको आहे.  

=======

हे देखील वाचा : No Shave November दरम्यान पुरुष मंडळी केस आणि दाढी का करत नाहीत?

=======

हे सर्व कुत्र्यांचे प्रकरण चालू असतांनाच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये (South Korea and North Korea)दोन महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. उत्तर कोरियाने 2 महिन्यात अनेक बॅलेस्टिक मिसाईल चाचण्या करून युद्धाची परिस्थिती निर्माण केली आहे. प्रत्युत्तरादाखल दक्षिण कोरियाला पाठिंबा देताना अमेरिकेनेही लष्करी सराव पुन्हा सुरू करण्याची भाषा केली आहे. या सर्व तणावात कुत्र्यांच्या भेटीनं भर घातली आहे.  या सर्वांत उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन याचे मत काय होईल याचाही विचार सुरु आहे.  आधीच सणकी नेता म्हणून किम जोंगची ओळख आहे.  आपल्या कट्टर विरोधकांना त्यांनी कुत्रे भेट दिले होते.  कुत्रे असले तरी भेट ही भेटच असते.  आणि आपल्या दिलेल्या भेटीला रस्त्यावर अनाथांसारखे कोणी सोडून दिले तर हा सणकी नेता काय करेल याचा नेम नाही.  त्यामुळे कुत्र्यांमुळे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात तणाव निर्माण झाला आहे.  या कुत्र्यांच्या पालनाचा खर्च बघता कोणी प्राणीमित्रही त्यांच्यासाठी पुढे आला नाही.  त्यामुळे या दोन देशात आता कसे वातावरण राहिल हे केवळ या कुत्र्यांचे पालनपोषण कोण आणि कसे करते यावर अवलंबून रहाणार आहे.  

पुंगसान कुत्र्यांची ओळख शिकारी म्हणूनही आहे.  अगदी वाघ, अस्वल यांची शिकार करण्यासाठीही या पुंगसान कुत्र्यांचा वापर करण्यात येतो.  आता हे शिकारी कुत्रे दोन देशांमधील युद्धाला खतपाणी घालत असल्यानं दोन्ही देशातील जनता धास्तावली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.