दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे लाखो चाहते आहेत. आपल्या अभिनयानं आणि सौदर्यांनं या अभिनेत्रीनं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. नुकताच समंथाच्या यशोदा या आगामी चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला. त्यात डॅशिंग लूकमधल्या समंथाचे तिच्या चाहत्यांनी कौतुक केले. मात्र याच चाहत्यांचा समंथाच्या पुढच्या पोस्टमुळे काळजाचा ठोका चुकला आहे. कारण समंथानं सोशल मिडीयावर एक पोष्ट शेअर करत तिला मायोसायटिस (Myositis Disease) नावाचा आजार झाला असल्याचा उल्लेख केला आहे. या आजारात शरीरातील मांसपेशींना सूज येते आणि काहीवेळा भयंकर अशा वेदना सहन कराव्या लागतात. समंथा याच गंभीर आजाराला सामोरी जात असून तिने याबाबत एक भावनिक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. समंथाच्या आजाराची बातमी कळल्यावर चाहत्यांना जबर धक्का बसला असून समंथा लवकर बरी होण्यासाठी देवाचा धावा सुरु केला आहे.
आगामी यशोदा या चित्रपटामुळे समंथा सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. यावर चाहत्यांनी लाईकचा वर्षाव केल्यावर समंथानं आपल्या चाहत्यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर तिच्या आजाराची माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरापासून समंथा या मांसपेशीसंबंधी आजाराने त्रस्त झाली आहे. यासाठी तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समंथाने तिच्या रुग्णालयातील फोटो शेअर करत याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या फोटोसह समंथानं चाहत्यांना आवाहनही केलं आहे. यशोदा ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या आजाराचं निदान झालं आहे. त्यातून सावरण्यासाठी मला डॉक्टर मदत करत असून आपल्या सर्वांचे आशीर्वादही मला यातून बाहेर काढतील असा विश्वास समंथानं व्यक्त केला आहे.
समंथाच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याबरोबर हा मायोसासटिस आजार म्हणजे काय, याचाही शोध सुरु झाला आहे. मांसपेशींना सूज येते. सूज जशी वाढत जाते तशा वेदनाही प्रचंड वाढतात. या सर्वांमुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात. मांसपेशींवर हल्ला करणाऱ्या मायोसायटिस (Myositis Disease) या आजाराचा सर्वात जास्त परिणाम खांदे, नितंब आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंवर होतो. पण या आजारात वेदना शरीराच्या इतर भागातही होऊ शकतात. या वेदनांमुळे शरीरावर परिणाम होतो. काहीवेळा तर श्वास घ्यायला आणि अन्न गिळायला प्रचंड त्रास होतो. डोळ्यांच्या आसपास सूज येते. चेहरा सुजतो आणि त्यातही वेदना निर्माण होतात. या आजारात प्रामुख्यानं शरीरातील रोग प्रतिकारक शक्तिच नष्ट केली जाते. मायोसिटिसमुळे (Myositis Disease) शरीरात जेव्हा ऑटोइम्यून स्थिती निर्माण होते, तेव्हा ती शरीरातील चांगले आणि वाईट विषाणू यांच्यात फरक करू शकत नाही. त्यामुळे शरीरातील चांगल्या पेशी आणि रोगावर लढण्यासाठी उपकारक अशा पेशीही नष्ट होऊ शकतात. या आजारात होणा-या वेदना पहाता रुग्णाला स्टेरॉईड देऊन आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यासोबत नियमित व्यायाम, फिजियोथेरेपी गरजेची ठरते. या सर्वांचा ताळमेळ साधला तर हा आजार नियंत्रीत ठेवला जाऊ शकतो आणि त्यापासून होणा-या वेदनाही कमी होतात. मायोसायटिसवर (Myositis Disease) सध्यातरी कोणताही इलाज नसल्याचे सांगण्यात येते. यात स्नायूंची मोठी हानी होते. शरीरात दीर्घकाळ जळजळ होते. या जळजळीमुळे स्नायू कमकुवत होतात. मायोसिटिसचे विविध प्रकार आपल्या शरीरातील स्नायूंच्या विविध गटांवर परिणाम करतात. मायोसिटिस असलेल्या काही लोकांना स्नायू कमकुवत झाल्यांनं चालण्यासही त्रास होऊ शकतो. गुडघे आणि अन्ननलिकेसही त्रास होऊ शकतो. मायोसिटिस कशामुळे होतो हे तज्ञ निश्चित सांगत नाहीत. नियमीत व्यायाम हाच यावरील उपाय आहे.
==========
हे देखील वाचा : सावधान ! घोरण्याच्या सवयीवर माऊथ टॅपिंग ट्रेंड
==========
नियमीत सांधे किंवा स्नायू दुखत असतील, किंवा थकवा जाणवत असेल, श्वास घेण्यास किंवा गिळण्यास त्रास होत असेल तर अशांनी लगेच तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येते. ही सर्व मायोसिटिस (Myositis Disease) या आजाराची लक्षणं आहेत. या आजाराचे जेवढ्या लवकर निदान होते. तेवढ्याच लवकर यावर उपाय सुरु करता येतात.
समंथा रुथ प्रभू ही अभिनेत्री या आजारानं त्रस्त असल्याची माहिती मिळाल्यावर चाहत्यांना अधिक वेदना झाली आहेत. समंथा, तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. समंथाचे अभिनेता नागा चैतन्यशी झालेले लग्न गाजले होते. परंतु वैयक्तिक कारणांमुळे या दोघांमध्ये घटस्फोट झाला. समंथाला चित्रपट सृष्टीतील पदार्पणातच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. एकाच वर्षी सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारी समंथा ही अभिनेत्री रेवतीनंतरची दुसरी अभिनेत्री ठरली आहे. सध्या यशोदा व्यतिरिक्त, शकुंतलम या ऐतिहासिक चित्रपटात समंधा दिसणार आहे. या चित्रपटाआधीच समंथाच्या आजारपणाची बातमी आल्यामुळे तिचे चाहते चितेंत पडले आहेत. मात्र समंथाचा एकूण प्रवास आणि तिची लढाऊ वृत्ती पहाता या आजारावरही ती यशस्वीपणे मात करेल हे नक्की.
सई बने