रावी नदी ही वायव्य भारत आणि ईशान्य पाकिस्तानमध्ये वाहणारी नदी आहे. ज्या पाच नद्यांवरून पंजाब राज्याचे नाव पडले त्यातली एक रावी नदी(Ravi River) आहे. या नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील ग्रेटर हिमालयातून होतो. पश्चिम-वायव्येकडील चंबा शहरातून ही नदी वाहते. जम्मू-काश्मीरच्या सीमेवरुन ती दक्षिण-पश्चिमेला वळते. मग ही नदी आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. तिथे ही रावी नदी लाहोरमधून वाहते आणि कमालियाजवळ पश्चिमेला वळते. नंतर ही नदी चिनाब नदीला मिळते आणि मग समुद्राला मिळते.
आज या रावी नदीच्या उगमाबद्दल आणि प्रवाहाबद्दल माहिती सांगण्याचा उद्देश म्हणजे, सध्या पाकिस्तानमध्ये याच रावी नदीवरुन वाद सुरु झाले आहेत. मुळ भारतातून उगम पावणा-या या रावी नदीच्या पाण्यावर पाकिस्ताननं हक्क सांगितला आहे. अर्थात तेथील काही नेत्यांनीच मग पाकिस्तानी सरकारला वास्तवाची जाणीव करुन देत, भारताचा रावी नदीवर हक्क असल्याचे सांगितले आहे.
रावी नदी (Ravi River) ही भारत आणि पाकिस्तानमधील शेतक-यांचे आशास्थान आहे. रावी नदीचे पाणी संपूर्ण प्रवाही क्षेत्रात सिंचनासाठी वापरले जाते. रावी नदीच्या प्रवाहावर अनेक कालवे बांधण्यात आले असून त्या पाण्याचा वापर करुन पंजाबमधील शेती उद्योग बहरला आहे. तशीच परिस्थिती पाकिस्तानही आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात याच रावी नदीच्या पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.
भारतात उगम पावणा-या या नदीचा उल्लेख ऋवेदातही आहे. ऋग्वेदात या नदीचे नाव परुषाणी आहे. तसेच तिला वैदिक आणि इरावती नावानंही संबोधण्यात आले आहे. रावी हा इरावतीचा अपभ्रंश आहे. ग्रीक लेखकांनी याच इरावतीला ‘हिरावतीस‘ असे म्हणत त्याचा ग्रीक साहित्यातही उल्लेख केला आहे. रावी नदीचे पाणी पाकिस्तानमधील सिंधू नदीमार्गे अरबी समुद्रात जाते. याच रावी नदीच्या पाण्यावरु सध्या पाकिस्तानमध्ये वाद सुरु आहे. (Ravi River)
१९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला होता. या जल करारावरुन पाकिस्तान कायम भारताला खोटे ठरवत आला आहे. आत्ताही तोच मुद्दा घेऊन रावी नदीवर पाकिस्ताननं आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता पाकिस्तानी सरकारच्या या खोट्या दाव्याला खुद्द पाकिस्तानमध्येच विरोध झाला आहे. पाकिस्तानच्या कायदामंत्र्यांनी पाकिस्तानी संसदेत रावी नदीवर भारताचा अधिकार असून त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. (Ravi River)
पाकिस्तानचे कायदा मंत्री आझम नजीर तरार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे बराच वाद निर्माण झाला आहे. सिंधू जल करारानुसार रावी नदीच्या पाण्यावर पहिला हक्क भारताचा आहे. पण ही गोष्ट पाकिस्तान मान्य करायला तयार नाही. भारताच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याचा विचार करणा-या पाकिस्तानला त्यांच्याच कायदेमंत्र्यांनी आरसा दाखवला आहे.
पाकिस्तानमध्ये कायम रावी नदीवर हक्क दाखवला जातो. तसेच भारतातर्फे रावी नदिवर उभारण्यात येणा-या प्रकल्पाचा आक्रमण असा उल्लेख करण्यात येतो. वास्तविक १९६० भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला, त्यात अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या. त्यानुसार रावी, सतलज आणि बियास नद्यांच्या पाण्यावर भारताचा दावा आहे. १९६० मध्ये दोन्ही देशांनी सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. त्याचवेळी, शाहपूर कंदी बॅरेज पूर्ण झाल्यामुळे भारताने रावी नदीचे पाणी पाकिस्तानला देण्यापासून रोखल्याचाही आरोप होत आहे. शाहपूर कंदी बॅरेज पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर आहे.(Ravi River)
=============
हे देखील वाचा : श्रीलंकेतही होणार ‘रामायण यात्रा’
============
जम्मू-काश्मीरला आता रावीतून १,१५० क्युसेक पाणी मिळणार आहे, जे आधी पाकिस्तानला दिले जात होते. त्यामुळे पाकिस्तान आता भारतावर सिंधू काराराचा भंग केल्याचा आरोप करीत आहे. भारताविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची तयारीही पाकिस्ताननं केली, मात्र त्यांच्याच कायदा मंत्र्यांनं त्यांना आरसा दाखवला आहे. (Ravi River)
रावीच्या पाण्यामुळे आता जम्मू काश्मिरला अधिक फायदा होणार आहे. या पाण्यामुळे जम्मू काश्मिरमधील कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील ३२००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. सिंचनासोबत येथे जलविद्युत प्रकल्पही उभारण्यात येणार आहेत. यामुळे या भागांचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. यालाच मुळात पाकिस्तानचा विरोध आहे.
सई बने