Home » ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शेर शिवराज’ झळकणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर

‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शेर शिवराज’ झळकणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर

by Team Gajawaja
0 comment
शेर शिवराज
Share

‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी त्याच्या आगामी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव असुन चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २२ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती.

शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पालनं केलं आहे.

====

हे देखील वाचा: ‘मी वसंतराव’च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री!

====

याची झलक नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘शेर शिवराज’च्या पोस्टर व टीझरवर ही पहायला मिळते. प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार आपल्याला पहायला मिळतोय.

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे.

याविषयी बोलताना मुंबई मुवी स्टुडियोजचे निर्माते नितीन केणी सांगतात, ‘गेली २ वर्ष चित्रपटगृहांपासून प्रेक्षक दूर राहिलाय व त्यानंतर आलेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आणि आता २२ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल, यात आम्हाला शंका वाटत नाही’.

====

हे देखील वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते प्रेक्षकांच्या भेटीला

====

राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर म्हणाले, “आजची पिढी डिजिटल आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ, बखरी, पुस्तके यांची नितांत आवश्यकता आहेच पण त्याची आवड निर्माण होण्यासाठी चित्रपटाइतके दुसरे प्रभावी माध्यम नाही त्यामुळे ‘शेर शिवराज’ सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.