बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. सोनमने पती आनंद आहूजासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या बेबी बंप फोटोजमध्ये सोनम आणि आनंद दोघंही आनंदी दिसतायत. “तुझं स्वागत करण्यासाठी आम्ही आतूर आहोत”, असं कॅप्शन सोनम कपूरनं या फोटोजना दिलं आहे. सोनम-आनंदची ही गुड न्यूज कळताच बॉलिवूड कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.
काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये सोनम कपूरनं प्रेगनंन्सी फोटोशूट केलं आहे. सोनमने ही पोस्ट शेअर करताच खूशी कपूर आणि अंशुला कपूरनं पोस्ट खाली कमेंट करुन त्यांना शुभेच्या दिल्या आहेत. या दोघींसोबतच करीना कपूर खान, वाणी कपूर, दिया मिर्झा, रवीना टंडन, शनाया कपूर, भूमि पेडणेकर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, ताहिरा कश्यप आणि असंख्य कलाकारांनी सोनम-आनंदवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोनम कपूरची हीच पोस्ट अभिनेते अनिल कपूर यांनीही शेअर केली आहे. “आता तयारी करत आहे आयुष्यातील सगळ्यात रोमांचक भूमिकेची – आजोबा! आमचं आयुष्य बदलणार आहे आणि त्यासाठी उत्साहाने तयार आहे.” असं कॅप्शन देत अनिल कपूर यांनी आजोबा होणार असल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे.
====
हे देखील वाचा: Sharmaji Namkeen Trailer: ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’चा ट्रेलर पदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
====
सोनम कपूर आणि आनंद आहूजाने (Sonam Kapoor & Anand Ahuja) 2018 साली लग्न केलं होतं. त्यानंतर सोनमच्या चाहत्यांमध्ये अनेकदा सोनम प्रेगनंन्ट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. सोनम सध्या पती आनंदसोबत लंडनमध्ये राहत आहे. सोनम शोम मखीजा दिग्दर्शित ‘ब्लाईंड’ या सिनेमात दिसणार आहे.
‘ब्लाईंड’ हा 2011 सालच्या कोरियन सिनेमाचा रिमेक आहे. कार अपघातात दृष्टी गमावलेल्या एका महिलेच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे.
सोनम नेहमी तिच्या हटके स्टाईलिंगमुळे चर्चेत असते. कोणत्याही सोहळ्यातील रेड कार्पेटवर सोनमच्या ड्रेसकडे सगळ्यांचं कायम लक्ष असतं. सोनम प्रेगनंन्ट आहे म्हंटल्यावर तिच्या मॅटरनिटी ड्रेसेसबद्दलही उत्सुकता आहे.

====
हे देखील वाचा: किस्सा महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या रशियन भाषेतील गाण्याचा!
====
गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूर (Sonam Kapoor) सार्वजनिक ठिकाणी दिसणं टाळत होती. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत तिने तिच्या तमाम चाहत्यासोबत ती खरंच प्रेगनंन्ट असल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. गुड न्यूज शेअर करताच करीना कपूर खान म्हणाली, “तुमच्या दोघांसाठी मी खूप आनंदी आहे. आता आपली मुलं एकत्र खेळतील त्या दिवसाची मी वाट पाहत आहे.”
सोनम कपूरचे पती आनंद आहूजा एक उद्योगपती आहे. ‘स्टायलिश बिझनेसमॅन’ म्हणून आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर ट्विटर वॉर्समुळे तो कायम चर्चेत असतो. सोनम आणि आनंद यांनी दिलेल्या गुड न्यूजमुळे त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
– वेदश्री ताम्हणे