Home » Afghanistan : तालिबानचे डिजिटल लॉकडाऊन !

Afghanistan : तालिबानचे डिजिटल लॉकडाऊन !

by Team Gajawaja
0 comment
Afghanistan
Share

तालिबानच्या राजवटीखाली असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आता डिजिटल लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. इंटरनेटमुळे देशाच्या संस्कृतीला धक्का लागेल अशा गोष्टी समाजापर्यंत पोहचत असल्याचे सांगून तालिबानी सरकारनं अफगाणिस्तानमधील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केल्या आहेत. काबूल, उरुझगान, मजार-ए-शरीफ आणि हेरातसह अनेक शहरांमध्ये फायबर-ऑप्टिक इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आता देशभरात संपर्क यंत्रेणेसंदर्भात अन्य काही पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. तालिबान सरकारच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तान आणि जगाचा संबंध पूर्णपणे तुटल्यासारखा झाला आहे. उत्तर कोरियामध्येही इंटरेनटवर बंदी आहे. तिथे चोरुन मोबाईल वापरणा-यांना देहांताची शिक्षा देण्यात येते. आता त्याच वाटेवर अफगाणिस्तान जात आहे. (Afghanistan)

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं आता जगाबरोबर पूर्णपणे आपला संबंध तोडला आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. आत्तापर्यंत 43 दशलक्षाहून अधिक अफगाण नागरिकांची इंटरनेट सेवा डिस्कनेक्ट करण्यात आली आहे. याबाबत तालिबान सरकारनं आठवड्यापूर्वी एक आदेश जारी केला होता. त्यात इंटरनेटद्वारे देशात कशाप्रकारे पाश्चात्य संस्कृतीमधील वाईट गोष्टी येत आहेत, हे सांगितले होते. तेव्हाच तालिबान इंटरनेट सेवा कधीही बंद करणार अशी अटकळ व्यक्त करण्यात आली होती, ती अटकळ आता खरी ठरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तालिबानी अधिका-यांनी अफगाणिस्तानमधील विविध प्रांतांमध्ये फायबर ऑप्टिक कनेक्शन तोडली. त्यानंतर बाल्ख प्रांतीय प्रवक्ते अत्ता उल्लाह झैद यांनी फायबर ऑप्टिक सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली. इंटरनेट पूर्णपणे बंद आल्यावर संपर्क यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट नसल्यामुळे लॉकडाऊन सारखे वातावरण आहे. (International News)

या सर्वांचा अधिक परिणाम सरकारी यंत्रणांवर झाला आहे. संपर्काचे दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे अधिकारी आणि सरकारी कार्यालयामध्ये आलेल्या जनतेचेही हाल होत आहेत. येथील सरकारी कार्यालयात हतबल पणे बसलेले सरकारी कर्मचारी सध्या दिसून येत आहेत. संवादासाठी इतर कोणत्याही पद्धती किंवा व्यवस्था नाहीत. तसेच बँकिंग क्षेत्र, सीमाशुल्क, देशभरातील सर्व गोष्टींवर या डिजिटल लॉकडाऊनचा परिणाम होत आहे. अफगाणिस्तानमध्ये 9350 किलोमीटरचे फायबर ऑप्टिक नेटवर्क होते. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका समर्थक जे सरकार होते, त्या सरकारच्या काळात संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये हे इंटरनेटचे जाळे उपलब्ध करण्यात आले. यातून अफगाणिस्तान हा जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला गेला आणि तिथे व्यापारात वाढ झाली होती. मात्र तालिबानचे सरकार आल्यापासून अफगाणी जनतेवर रोज एखादे बंधन घालण्यात येत आहे. (Afghanistan)

ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून, तालिबान सरकारनं असे अनेक निर्बंध अफगाणी जनतेवर घातले आहेत. त्यातही महिलांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. महिलांच्या शिक्षणाच्या संधीही काढून घेण्यात आल्या आहेत. अशा काही महिला आता तिथे मोबाईलच्या माध्यामातून घरच्याघरी शिक्षण घेत होत्या. इंटरनेट बंद झाल्यामुळे या तरुणींच्या सगळ्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
आता पूर्णपणे इंटरनेट सेवा बंद झाल्याचा फटका काबुल विमानतळावरून उडणा-या विमानांनाही बसला आहे. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणाऱ्या किंवा येणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मोबाईल नेटवर्क बंद झाल्यामुळे अफगाणिस्तानमधील लोकांना व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांसाठी एकमेकांशी संपर्क साधता येत नाही. (International News)

=======

हे देखील वाचा :

Galapagos Affair : दोघे बेटावर गेले पण ती आली आणि भलतंच घडलं…

=======

इंटरनेट सेवा अशीच बंद राहिली तर येथील व्यापारालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच अफगाणिस्तानमध्ये बिकट परिस्थिती आहे, बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यात इंटरनेटच्या माध्यामातून जे उद्योग सुरु होते, ते बंद झाले तर तिथे भयाण परिस्थिती निर्माण होणार आहे. मदत आणि मानवतावादी मदत संस्थांसाठीही यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. अफगाणिस्तानमधील मुलांसाठी आणि महिलांसाठी या संघटना काम करत आहेत, त्यांना आता संपर्काचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्यामुळे या संघटना हतबल झाल्या आहेत. दरम्यान तालिबान सरकारनं असा निर्णय घेण्याच्या मागे अमेरिका असल्याची चर्चा सुरु आहे. अमेरिका पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये येण्यास उत्सुक असून अफगाणिस्तानमधील त्यांच्या गुप्तहेरांमार्फत माहिती घेण्यात येत आहे. ही संपर्क यंत्रणा तोडण्यासाठी तालिबान सरकारनं संपूर्ण देशात डिजिटल लॉकडाऊन जाहीर केल्याची चर्चा आहे. अर्थात या सर्वात तेथील सर्वसामान्य जनतेच्या हालाखीत अधिक भर पडली आहे. (Afghanistan)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.