गेल्या काही महिन्यापासून देशभरात डिजिटल अटक होत असल्याच्या बातम्या वाढल्या आहेत. मुंबईमध्ये सायबर क्राइम विभागात डिजिटल अटक झाल्याच्या घटनांची नोंद होत आहे. मध्यप्रदेशमध्ये एका मोठ्या अधिका-याच्या सुनेला डिजिटल अटक करुन तिच्याकडून लाखोंची रक्कम उकळण्यात आली. ऑनलाईन व्यवहार होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढले असतांनाच डिजिटल अटक सारख्या घटनांची वाढ होणं चितांजनक आहे. यात एखादेही चुकीचे बटन प्रेस झाल्यास मोबाईलच्या माध्यमातून बॅकेतील लाखोंची रक्कम गायब होत आहे. या सर्वांमुळेच डिजिटल अटक म्हणजे नेमकं काय, आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती घ्यायला हवी. (Digital Arrest )
डिजिटल अटक होण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मुंबईत अशाच दोन गुन्ह्यांमध्ये दोन वृद्धांकडून सुमारे 15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. यात एका 77 वर्षीय महिलेला महिनाभर डिजिटल अटकेत ठेवण्यात आले होते. यात फसवणूक करणाऱ्याने कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून 3.8 कोटी रुपये हस्तांतरित केले होते. याप्रकरणी सुरुवातीला या वृद्ध महिलेनं ऑनलाइन गुंतवणूक खात्यात नफा जमा झाल्याचे पाहून काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा तिला 20 टक्के कर जमा करण्याचा मेसेज आला. या महिलेने हे पैसे ट्रान्सफर केल्यावर ते संबंधित फसवणूक करणा-या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाले. याप्रकरणी सायबर पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे एका अन्यही वृद्धेची फसवणूक झाल्यानं मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी डिजिटल अटक संदर्भात जनजागृती मोहीम सुरु केली आहे. (Social News)
डिजिटल अटक म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. डिजिटल अटक म्हणजे व्हॉट्सॲप कॉलवर केले जाणारे ब्लॅकमेलिंग. यात सायबर ठग, पोलिस किंवा सरकारी विभागाचे अधिकारी म्हणून लोकांचा भावनिक आणि मानसिक छळ करतात. या व्यक्ती कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत काहीतरी वाईट घटना झाल्याचे सांगतात. स्क्रीनवर आलेली व्यक्ती ही शक्यतो पोलीसांच्या वेशात असल्यामुळे सुरुवातीला भीती वाटते, आणि या भीतीतूनच काही चुका घडतात. याचा फायदा हे सायबर ठग घेतात आणि त्यातून लाखो-करोडो रुपयांची फसवूणक होते. यासाठी कुठल्याही अनोळखी नंबरवरुन फोन आल्यास तो फोन उचलणे टाळले पाहिजे. जर चुकुनं असा फोन उचलला गेलाच तर त्यांच्या माहितीवरुन लगेच घाबरुन त्यांनी मागितलेली माहिती शेअर करु नका. शिवाय फोनवर लांबलचक संभाषण टाळण्याच्या सूचनाही पोलीसांनी केल्या आहेत. शिवाय TrueCaller सारख्या ॲपद्वारे अनोळखी नंबरवरून येणारा कॉलची पडताळणी करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या फसवणुकीच्या घटना वाढल्यावर व्हॉटसअँपने एक नवीन फिचर जोडले आहे. या फिचरचे नाव, अननोन कॉल सायलेंट असे आहे. (Digital Arrest )
=====
हे देखील वाचा : जय हो !
========
हे फिचर चालू करताच अज्ञात आणि स्पॅम कॉल आपोआप म्यूट केले जातील. तथापि, नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कॉल कोणत्या नंबरवरून आला आहे हे कळू शकणार आहे. एवढी काळजी घेऊनही तुम्हाला कोणताही धमकीचा फोन किंवा मेसेज आलाच तर अजिबात घाबरुन न जाता, नजीकचे पोलीस ठाणे वा 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे. याशिवाय http://www.cybercrime.gov.in यावर ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधाही आहे. डिजिटल अटक सारख्या सायबर गुन्ह्यात वृद्ध, सेवानिवृत्त व्यक्ती अधिक बळी पडत असल्याची नोंद आहे. अनेकवेळा जास्त नफ्याच्या हव्यासापायी पैशांची गुंतवणूक केली जाते. तिथूनही असाच सायबर फसवणुकीची घटना घडते. ब-याचवेळा फसवणुकीसाठी येणारे हे फोन भारताच्या कानाकोप-यातून येतात. मात्र कंबोडिया, फिलीपिन्स आणि तैवानमधून फोन करून डिजिटल पद्धतीने अटक करून भारतातील लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या घटनाही वाढत आहेत. अशा डिजिटल अटक घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिक बळी पडत असल्याची घटना वाढत आहेत. त्यामुळे हातातील स्मार्ट फोन हा वापरतांना काळजी घ्यावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे. आपल्या बॅंकेतील खात्यांची वा गुंतवणुकीची कुठलिही माहिती अशा अनोळखी फोनवरुन देऊ नये, तरच या घटनांना अटकाव होईल, असेही पोलीसांनी स्पष्ट केले आहे. (Social News)
सई बने