राजस्थान ही शौर्यभूमी आहे. याच भूमीला साजेशी अशी येथील मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये माता त्रिपुरा सुंदरी मंदिर मोठे प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध शक्तीपीठ असलेल्या या मंदिरात युद्धप्रसंगी स्थानिक राजे, महाराजे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असत. आजही या मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. अनेक राजकारणीही या त्रिपुरा सुंदरी माता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जातात. पौराणिक कथांमध्ये या मंदिराचा आणि देवीच्या महात्म्यांचा उल्लेख आहे. राजस्थानमधील बांसवाडा पासून जवळच असलेल्या राउल पर्वतरांगांमध्ये हे जागृत देवी मंदिर आहे. उमराई या गावातील त्रिपुरा सुंदरी शक्तीमंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची नेमकी निर्मिती कोणी केली हे सांगता येत नाही. मात्र देवीच्या मंदिराभोवती तीन किल्ले होते. शिवाय शक्तीपुरी, शिवपुरी आणि विष्णुपुरी या तीन पुरींमध्ये वसल्यामुळे देवीचे नाव त्रिपुरा सुंदरी असे पडल्याची माहिती येथील पुजारी देतात. (Devi Temple)
देवीच्या शक्तीपीठांपैकी एक असलेल्या त्रिपुरा माता मंदिरात भक्तांची कायम गर्दी असते. काळ्या पाषाणातील मातेची मुर्ती ही अठरा हात असलेली आहे. मातेच्या मंदिराचे दरवाजे मुख्य चांदीचे आहेत. माता भगवती त्रिपुरा सुंदरीच्या मूर्तीला अष्टदशा म्हणूनही वंदन केले जाते. या मूर्तीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. माँ सिंह, मोर आणि कमळाच्या पीठावर विराजमान आहे. (Devi Temple)
या त्रिपुरा माता मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, मातेची तीन रुपात वेगवेगळी पुजा करण्यात येते. कारण माता दिवसात तीन रुपात तिच्या भक्तांना दर्शन देते. सकाळी कुमारिका रूपात, दुपारी तरुणीच्या रुपात आणि सायंकाळी प्रौढ रूपात मातेचे दर्शन होते. यामुळेही या देवीला त्रिपुरा सुंदरी म्हणतात. हे मंदिर कनिष्क काळापासून प्रसिद्ध आहे. मात्र मंदिराची स्थापना नेमकी कोणी केली हे स्पष्ट नाही. प्रत्येक कालखंडात स्थानिक राजांनी मातेच्या मंदिरामध्ये काम केले. या मंदिराच्या उत्तरेकडील भागात सम्राट कनिष्काच्या काळातील शिवलिंग आहे. त्यामुळे सम्राट कनिष्कापूर्वीपासून हे स्थान असल्याचे सांगितले जाते. तिसर्या शतकापूर्वी येथे मातृदेवतेचे शक्तिपीठ असल्याचेही सांगितले जाते. तत्कालीन काळात या भागात ‘गडपोली’ नावाचे ऐतिहासिक शहर होते. ‘गडपोली’ म्हणजे दुर्गापूर. गुजरात, माळवा आणि मारवाडचे राज्यकर्ते या दुर्गापूर मधील त्रिपुरा सुंदरीचे उपासक असल्याचा दाखला मिळतो. ती हिच त्रिपुरा सुंदरी माता. (Devi Temple)
या मंदिराबाबत एक आख्यायिकाही सांगण्यात येते. माता त्रिपुरा सुंदरी ही गुजरातचा सोलंकी राजा सिद्धराज जयसिंग यांची देवी. देवीची पूजा करूनच सोलंकी राजा युद्धावर निघायचे. माळवाचा राजा जगदेव परमार याने आपले मस्तक कापून मातेच्या चरणी अर्पण केले होते. राजाच्या भक्तीवर खुश होत देवीनं जगदेवला पुन्हा जिवंत करुन विजयी होण्याचे आशीर्वाद दिले होते.
या त्रिपुरा मातेची मुर्ती ही अत्यंत भव्य आहे. देवीच्या मूर्तीच्या मागे, 42 भैरव आणि 64 योगिनींची अतिशय सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. तिच्या आभाळात नऊ-दहा लहान मूर्ती आहेत ज्यांना दासमहाविद्या किंवा नवदुर्गा म्हणतात. मूर्तीच्या तळाशी असलेल्या काळ्या आणि चमकदार संगमरवरी दगडावर श्री यंत्र कोरलेले आहे, याला स्वतःचे विशेष तांत्रिक महत्त्व आहे. मागच्या भागात त्रिवेद मंदिर, दक्षिणेला काली मंदिर आणि उत्तरेला आठ हातांचे सरस्वती मंदिर होते. त्याचे अवशेष आजही या मंदिर परिसरात आहेत. या देवीच्या मुर्तीसमोर अनेक नेतेही नतमस्तक झाले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हरिदेव जोशी, अमित शहा, वसुंधरा राजे, अशोक गेहलोत आदींचा समावेश आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मंदिराला कायम भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतात. (Devi Temple)
==========
हे देखील वाचा : ‘या’ धाममध्ये सप्तऋषींनी केली होती तपश्चर्या
==========
या मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते. मात्र नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी देशविदेशातून भक्त गर्दी करतात. नवरात्रीच्या काळात मंदिर परिसर आकर्षक पद्धतीने सजवला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस त्रिपुरा सुंदरी मातेची वेगवेगळ्या साजशृंगारात पूजा केली जाते. मंदिरात चोवीस तास भजन, कीर्तन, नामस्मरण करण्यात येते. पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर मंदिरात घटाची स्थापना केली जाते. अखंड ज्योती पेटवली जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला येथे हवन केले जाते. नवमी आणि दसऱ्याला देवीला ज्वारीच्या विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर पूजाअर्चा करून हा कलश मही नदीत पाण्यात सोडला जातो. देवीच्या या सगळ्या सोहळ्यासाठी राजस्थानसह देशभरातील भक्तांची गर्दी होते.
सई बने