मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले. जवळपास ४ वर्ष या निवडणुका रखडलेल्या होत्या आणि अखेर आता हे निश्चित झालं की मुंबईवर कुणाची सत्ता असणार आहे. भाजपाने महाराष्ट्रात जवळपास सर्वच महानगरपालिकांवर विजय मिळवत ठाकरे Brand चाही निकाल लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ठाकरे बंधू क्लीन बोल्ड झाले. इथे फडणवीस यांच्या राजकारणाने मुंबईचं पूर्ण वातावरण फिरवलं. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करावी लागली, यामध्ये फडणवीस यांचीच रणनीती होती. राज ठाकरे यांचं मुंबईतलं वर्चस्व २०१७ च्याच मनपा निवडणुकीत संपुष्टात आलं होतं. त्यामुळे त्यांना इथे युती करणं भाग होतं, कारण भाजपा-शिंदे गटसारख्या बलाढ्य युतीसमोर त्यांचा निभाव लागणं संभव नव्हतं. दुसरीकडे मुंबईत राज ठाकरे यांची युती झाल्यामुळे कॉंग्रेससुद्धा वेगळी झाली होती. मुंबईत स्वबळावर लढल्यामुळे त्यांनाही याचा फटका बसला सोबत त्यांची मुस्लीम वोटबँक होती, तीसुद्धा पूर्णपणे फुटली.

राज ठाकरे यांच्यामुळे उबाठाला दुसरा फटका बसला तो सर्व अमराठी मतदार राजविरोधात एकवटले हा ! जर राज उद्धव एकत्र आले नसते तर जो मतदार कदाचित घरी बसला असता तो त्वेशाने मतदानासाठी बाहेर पडला आणि त्याने महायुतीच्या झोळीत भरभरून मते टाकली. राज यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच शिल्लक उबाठा सेनेतही दुफळी माजवली. दोघा भावांचे प्रभावक्षेत्र एकच असल्याने एकेका जागेसाठी दोन्ही सेनामधील कार्यकर्त्यांनीही एकमेकांविरोधात तलवारी उपसल्या. त्याचा फायदा शिंदे यांच्या शिवसेनेला झाला. त्यांना आयतं ‘कवायती सैन्य’ प्राप्त झालं आणि शिंदे गट ३० जागांवर निवडून आले. पहायला गेलं तर राज ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना एक दमडीचा फायदा झाला नाही. राज यांची मते उबाठाला ट्रान्सफर झालीच नाहीत. सध्या भारतीय कसोटी क्रिकेट संघ जसा आपल्या घरच्या खेळपट्टीवर परदेशी संघाकडून मार खात आहे त्याप्रमाणे राजनी उद्धव यांचा घरच्या मैदानात पराभव घडवून आणला.
हे देखील वाचा
महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
अदानी यांच्या मागे लागून राज यांनी प्रचार भरकटवला त्यामुळे उद्धव ठाकरेंना ‘करून दाखवले’ची टेप वाजवण्याची संधीच मिळाली नाही. शेवटी देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांना जे पाहिजे होते तेच घडून आले. सलग २५ वर्ष सत्तेत बसलेल्या उद्धव ठाकरेंकडून मुंबई महानगरपालिका त्यांनी खेचून आणली. अनेक मराठी माध्यमांनीही मोठ्या प्रमाणात ठाकरे बंधूंच्या बाजूने बातम्या चालवल्या होत्या. पण त्याचाही फारसा फरक पडला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक सभा, त्यांची रणनीती मुंबईचा विजय खेचून आणण्यासाठी कामी आली. दुसरीकडे फडणवीस यांनी शिंदेना पण त्यांचे ‘इप्सीत’ साध्य करण्यास मदत केली. आता शिंदे कॉलर ताठ करून म्हणू शकतात की ‘असली’ शिवसेना त्यांचीच आहे. मुंबई बाहेरचा प्रदेश पादाक्रांत केल्यावर उद्धवसेनेचा मुंबईचा आखरी गड ढासळल्यामुळे ‘भगवा’ आता’बाळासाहेब भवनावर अधिक दिमाखात फडकू लागेल.

एकंदरीत महाराष्ट्रानं पुन्हा एकदा फडणवीसांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई, मराठवाडा, विदर्भासह सर्व भागांत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. मराठी, अमराठी आणि जेन झीनं फडणवीसांना पसंती दाखवल्याचं चित्र आहे. शेवटी काय तर दोन्ही ठाकरे Brand एकत्र येऊनसुद्धा काहीच फायदा झाला नाही. मराठी अस्मिता हा विषय घेऊन निवडणूक घेतल्या, पण त्यातही दोन्ही पक्षांना नुकसानच सोसावं लागलं आणि या सर्वांचा फायदा भाजपाला पुरेपूर झाला. त्यामुळे आता २५ वर्षात इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा ‘मराठी’ महापौर या गादीवर बसणार आणि भारतातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिका सांभाळणार एवढं नक्की !
