“मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायची, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं, मग इतर ठिकाणी कोण बघणार? नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार? राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत, तिथला साधा आढावा घेतला नाही, मुंबई-पुण्याइतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का?” असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरुन फडणवीसांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारला धारेवर धरला.
पुण्यातल्या जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला, उमदा पत्रकार गेला, मात्र त्याची एन्ट्रीच केलेली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“ज्याप्रकारे अनेक विषय काढत आहात, त्यावरुन तुम्हाला कोरोनाविषयीच्या मागण्यांवर बोलायचं नाही हे दिसत आहे. राज्यातील अनेक विषय आहेत, जे आठ दिवस संपणार नाहीत. मात्र आम्हालाही समजतं. महाराष्ट्र सर्वात नंबर एक आहे, मात्र कोरोनातही व्हावा, हे वाटलं नव्हतं. पाच राज्य मिळून 70 टक्के मृत्यू आहेत, मात्र त्यात 50 टक्के महाराष्ट्राचे आहेत” असे फडणवीस म्हणाले.
“कमी टेस्ट करुन संख्या कमी दाखवण्याच प्रयत्न होत आहे, मुंबईचा मृत्यूदर किती आहे ते पाहा, कोरोना संसर्ग दर जास्त दिसून येत आहे. डॉक्टरांचे पगार होत नाहीत, त्यांना सुविधा देणार नाहीत. सरकारचं पूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष नाही. पुणे-मुंबईपुरते राज्य सीमित आहे का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये होणाऱ्या मृत्यूविषयी देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. कोव्हिड सेंटर आहे की मृत्यूचं आगार, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.
“महाराष्ट्रात सातत्याने 20 टक्के संसर्ग दर असून, देश आणि अन्य राज्यांच्या तुलनेत तो कितीतरी अधिक आहे. काल तर संसर्गाचा दर 25 टक्के होता. ही स्थिती भयावह आहे” असं फडणवीस म्हणाले.
“जम्बो कोव्हिड सेंटर आहेत की, कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या फॅसिलिटी आहेत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला, हे वारंवार बाहेर आलं आहे. बीकेसी कोव्हिड सेंटरचा विचार केला, तर कालच वर्तमानपत्रात बातमी आली, गेल्या महिन्यात तिथला मृत्यूदर 37 टक्के होता. आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मृत्युमुखी पडत असेल, तर या कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं चाललं काय आहे? कशासाठी ते सुरु केलं आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
51
previous post