Home » इरफान खानचा असाधारण अभिनयप्रवास, टेलिव्हिजनपासून बॉलिवूड व्हाया हॉलिवूडपर्यंत

इरफान खानचा असाधारण अभिनयप्रवास, टेलिव्हिजनपासून बॉलिवूड व्हाया हॉलिवूडपर्यंत

by Team Gajawaja
0 comment
Share

‘तो आला त्याने पाहिले आणि जिंकून घेतले सारे’ असे बॉलिवूडमधील खूपच कमी कलाकारांबद्दल म्हटले जाऊ शकते. ही ओळ अगदी तंतोतंत लागू होते ती अभिनेता इरफान खानला (Irrfan Khan). इरफान खान नुसते नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर साधारण दिसणारी, कुरळ्या केसांची आणि बोलक्या डोळ्यांची लक्षवेधून घेणारी एक आकृती उभी राहते. बॉलिवूडमधल्या सो कोल्ड हिरो या कॅटेगरीमध्ये कधीही न बसणाऱ्या इरफान खानने केवळ त्याच्या प्रतिभेच्या, मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे आणि अढळ स्थान निर्माण केले. टेलिव्हिजनपासून सुरू झालेला इरफानचा प्रवास व्हाया बॉलिवूड थेट हॉलिवूडपर्यंत गेला. या मोठ्या आणि अवघड प्रवासात इरफानने अनेक चढ उतार पाहिले. मात्र आपल्या लक्ष्यावर ठाम राहत इरफानने न भूतो न भविष्यती असे डोळे दिपवणारी यश संपादन केले. आज (२९ एप्रिल) या हरहुन्नरी अभिनेत्याची दुसरी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने नजर टाकूया इरफानच्या अभिनय प्रवासावर. 

इरफान खानचा (Irrfan Khan) जन्म ७ जानेवारी १९६७ मध्ये राजस्थानमधील जयपूर येथे एका मुस्लिम पठाण कुटुंबियात झाला. त्याचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे होते. इरफानच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. पठाण असूनही इरफान लहानपणापासून शाकाहारी आहे. यामुळे इरफानचे बाबा त्याला नेहमी पठाणच्या घरी ब्राह्मण जन्माला आला असेच म्हणायचे. लहानपणापासूनच इरफानला क्रिकेटमध्ये खूपच रस होता. त्याने अनेक सामने देखील खेळले होते. मात्र त्याचे जवळचे नातेवाईक थिअटरमध्ये काम करायचे. एकदा तो जोधपूरला गेला त्याच्या नातेवाईक काम करत असलेल्या नाटकाचा प्रयोग पाहायला गेला आणि त्याच्यावर थिअटरचा मोठा प्रभाव पडला. पुढे त्याने एम.ए केल्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश केला. एम. ए. करत असतानाच त्याने एक टेक्निकल कोर्स देखील पूर्ण केला होता.

एन.एस.डी.मध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. पुढे कामाच्या शोधात तो मुंबईत आला. काम मिळेपर्यंत त्याने टेक्निकल कोर्स झाल्यामुळे एसी रिपेरिंगचे काम सुरू केले. असेच एकदा त्याला एसी रिपेअर करण्यासाठी थेट राजेश खन्ना यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. एका कार्यक्रमामध्ये त्याने स्वतः हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की, “मी राजेश खन्ना यांच्या घरी गेलो. बेल वाजवली आणि एका बाईने दरवाजा उघडला. तिने विचारले कोण पाहिजे मी म्हणालो एसी रिअरिंग तिने मला आत घेतले आणि माझे डोळे ते घर नाही बंगला पाहून पांढरे झाले. एवढे मोठे घर मी पहिल्यांदाच बघत होतो. मात्र सोबतच माझी नजर राजेश खन्ना यांना देखील शोधत होती. पण दुर्दैवाने ते त्यादिवशी घरी नव्हते.”  

एनएसडीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर इरफान खानला चित्रपटांमध्ये सर्वात पहिली संधी दिली ती मीरा नायर यांनी. मीरा यांनी त्यांच्या ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात इरफान यांना एक छोटी भूमिका दिली होती. त्यांच्या भूमिकेचे शूटिंग देखील झाले होते, पण नंतर शेवटच्या एडिटिंगमध्ये इरफान खान (Irrfan Khan) यांची भूमिका असलेला सीनचा चित्रपटातून काढून टाकण्यात आला. त्यानंतर इरफान खान लहानमुलांसारखे खूप रडले होते. पण यातून ते शिकले आणि त्यांनी पुन्हा नव्याने काम शोधण्यास सुरुवात केली. यातच त्यांना टेलिव्हिजनवर पहिली संधी मिळाली. 

‘श्रीकांता’ ही इरफान खानची (Irrfan Khan) पहिली मालिका होती. त्यानंतर इरफान ‘भारत एक खोज’, ‘कहकशां’, ‘सारा जहां हमारा’, ‘बनेगी अपनी बात’, ‘चाणक्य’, ‘अंगूरी’, ‘स्पर्श’ आणि ‘चंद्रकांता’ अशा अनेक गाजलेल्या आणि लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. इरफान ‘द ग्रेट मराठा’ या पानीपत युद्धावर आधारित मालिकेत नकारात्मक भूमिकेत झळकला होता. ‘लाल घास पर नील घोडे’ या दूरदर्शनवरील एका शोमध्ये इरफानने लेनिनची भूमिका साकारली होती. टीव्ही सीरिज ‘डर’मध्ये त्याने सायको किलरची भूमिका साकारली. नीरजा गुलेरी यांच्या ‘चंद्रकांता’ या मालिकेत त्याने बद्रीनाथचे पात्र साकारत बद्रीनाथचा जुळा भाऊ असलेल्या सोमनाथचीही भूमिका त्याने साकारली होती. या मालिकेने इरफानचे आयुष्य बदलले. 

टेलिव्हिजन करत असताना इरफान खानला २००१ मध्ये ‘द वॉरिअर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून त्याचा आयुष्याने कलाटणी घेतली आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढे त्याने ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’, ‘इंग्लिश मीडियम’ यांसारख्या जवळपास ५० चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. पानसिंग तोमर या सिनेमातील भूमिकेसाठी इरफान खानला राष्ट्रीय पुरस्कारने गौरवण्यात आले होते. इरफानचा ‘द लंचबॉक्स’ हा सिनेमा टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्रिटिक्स पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला.  

एकेकाळी इरफान खानकडे (Irrfan Khan) ‘ज्युरासिक पार्क’ हा हॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा त्याने कधी विचारही केला नसेल की एक वेळ अशी येईल की, तोच त्या सिनेमात काम करेल. इरफानने ज्युरासिक पार्कसोबतच द नेमसेक, लाईफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, स्लमडॉग मिलेनेयर आदी अनेक हॉलिवूड सिनेमांत काम केले. अभिनयात इरफान खानने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी भारत सरकारकडून २०११ साली त्याला ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

========

हे देखील वाचा – तुझ्या मातृभाषेत तयार होणाऱ्या चित्रपटांना हिंदीमध्ये डब करून का प्रदर्शित करतो?, अजयचा किच्चा सुदीपला सवाल

========

इरफान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने त्याची वर्गमैत्रीण सुतपा सिकंदरशी २३ फेब्रुवारी १९९५ मध्ये लग्न केले. इरफानच्या अनेक वाईट दिवसांमध्ये सुतपा त्याच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. इरफानने जेव्हा सुतपाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्यासाठी त्याने धर्म परिवर्तनाचीही तयारी दाखवली. पण त्याआधीच सुतपाच्या घरातल्यांनी लग्नासाठी मंजूरी दिली. यानंतर इरफानला धर्म बदलण्याची गरज पडली नाही. 

अशा या प्रभावी आणि जिवंत अभिनेत्याला २०१८ साली कॅन्सर दुर्धर आजाराने ग्रासले. या आजारावर उपचार घेण्यासाठी तो लंडनला गेला. मात्र या उपचारादरम्यानच २९ एप्रिल २०२० ला इरफानने खानने जगाचा निरोप घेतला. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.