२ जुलै ला १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांच्या x अकाऊंटवरुन एक पोस्ट पडली, ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, “भूतकाळातील परंपरेनुसार नव्या दलाई लामाची शोध आणि ओळखीची प्रोसेस होईल. भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देण्याचा एकमेव अधिकार गादेन फोडरंग ट्रस्टला आहे, या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा असा कोणताही अधिकार इतर कोणालाही नाही. दलाई लामा, धर्मशाळा, २१ मे २०२५.” दलाई लामा यांचं साध्या भाषेत म्हणणं होतं की, त्यांचा पुनर्जन्म आणि पुढचा उत्तराधिकारी कोण असेल, हे गादेन फोड्रांग ट्रस्ट ठरवेल आणि यात चिनी सरकारचा काहीही रोल नसेल. हे ऐकून चीन सरकार भडकलं. (Dalai Lama)
त्यांनी त्यावर रिसपॉन्स असा दिला की, “दलाई लामांचा पुनर्जन्म आमच्या परवानगीशिवाय होणारच नाही! आणि तो फक्त चीनमध्येच होणार, आमच्या ‘गोल्डन अर्न’ पद्धतीने आणि आमच्या कायद्याप्रमाणे!” आता या वरुन हा अंदाज तर नक्की येईल की, चीनचा या दलाई लामांच्या पुनर्जन्म प्रक्रिया निवडीला विरोध आहे. सध्या तिबेट आणि चीन वाद पुन्हा जोरदार चर्चेत आहे आणि हा वाद बरीच वर्ष सुरू आहे, इतकंच काय ? १९४९मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केलं आणि चीनच्या वाढत्या दडपशाहीमुळे १९५९ मध्ये दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला होता, कारण तेव्हा तिबेटमधली सिचुएशन खूप वाईट झाली होती. आताच काही दिवसांपूर्वीपासूनअशीसुद्धा चर्चा सुरू आहे की, या वेळेस एक नाही तर दोन दलाई लामांची निवड होऊ शकते. आता हे प्रकरण काय? चीन आणि तिबेटचा वाद काय? चीनने तिबेटवर आक्रमण का केलं? आणि सध्या चीन या दलाई लामांच्या घोषणेवर इतकी का भडकली? हे समजून घ्यायला आपल्याला थोडा इतिहास जाणून घेऊ.
तिबेटी बौद्ध परंपरेत दलाई लामांची निवड ही पुनर्जन्माच्या प्रक्रियेवर होते. त्यांच्यात असा विश्वास आहे की, दलाई लामंचं जेव्हा निधन होतं तेव्हा त्यांचा आत्मा नव्या मुलाच्या रुपात परत जन्म घेतो. आता तो मुलगा ते कसे ओळखतात, याची एक प्रोसेस आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म शोधण्यासाठी दैवी संकेत, स्वप्नं आणि दृष्टान्तांचा आधार घेतला जातो. १९३३ नंतर जेव्हा १३व्या दलाई लामांचा मृत्यू झाला, तेव्हा तिबेटच्या पंचेंन लामांना ल्हामो लात्सो तलावात दृष्टान्त दिसला. म्हणजे स्वप्नात नव्या पंचेन लामांचे संकेत दिसले. त्या नंतर जो दृष्टान्त झाला त्यावरुन लहान मुलाचा शोध सुरू झाला. तिबेटची राजधानी ल्हासावरुन काही लोकं त्या संकेतांवरून एका मुलाच्या शोधात तक्त्सेर गावात पोहोचली. तिथे त्यांना दोन वर्षांचा ल्हामो धोन्दुप सापडला. त्यांनी आजूबाजूचा अंदाज घेतला तेव्हा दृष्टांतातलं तेच घर होतं.(Dalai Lama)
आता तो दोन वर्षाचा मुलगा सापडला म्हणजे तो १३ व्या दलाई लामांचा पुनर्जन्म आहे का? हे अजून सिद्ध झालं नव्हतं. त्याची नंतर टेस्ट झाली, ज्यात त्याला एका आसनावर बसवलं गेलं आणि त्याच्या समोर काही वस्तु ठेवल्या. तो त्या वस्तु बघून म्हणाला, या माझ्या वस्तु आहेत. मग त्याच्या समोर छड्या ठेवल्या. एक छडी त्याने फेकून दिली आणि बाकी छडींमधून त्याने एक छडी उचलली आणि ती छडी उचलल्याबरोबर सगळे बौद्ध साधू त्या दोन वर्षांच्या मुलासमोर झुकले. त्याला प्रणाम केला, कारण ती छडी होती १३ व्या दलाई लामांची, ती त्याने बरोबर ओळखली होती आणि अशाप्रकारे तिबेटला १४वे दलाई लामा सापडले. ज्यांचं पूर्ण नाव ‘तेन्झिन ग्यात्सो.’ या ६ जुलै ते ९० वर्षांचे झाले.
१९१२ मध्ये तिबेटने त्यांच्या सैन्याला हाकलून दिलं कारण Qing राजवंशाचा अंत झाला आणि तिबेट स्वतंत्र झालं. त्यामुळे गोल्डन अर्न पद्धत या वेळेस वापरली गेली नाही. रेतिंग रिनपोचे यांनी रिपब्लिक ऑफ चायनाच्या सरकारकडे ल्हामो धोन्दुप यांना गोल्डन अर्नशिवाय मान्यता देण्याची विनंती केली, जी १९४० मध्ये मंजूर झाली. यामुळे ल्हामो धोन्दुप ऑफिशियली १४वे दलाई लामा झाले. आता ही गोल्डन अर्न पद्धत काय? तर चीनचं म्हणणं आहे की, दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार फक्त चिनी सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील बौद्ध नेत्यांना आहे. त्यांनी २००७ मध्ये कायदा केला की, सर्व वरिष्ठ बौद्ध लामांचा पुनर्जन्म चिनी सरकारच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाही. चीन ज्या “गोल्डन अर्न” पद्धतीबद्दल सांगतो, जी १७९३ मध्ये किंग राजवंशाने सुरू केली होती. यात संभाव्य उमेदवारांची नावं एका सोन्याच्या भांड्यात टाकून लॉटरीपद्धतीने त्यांना निवडलं जातं. (Dalai Lama)
आता थोडं आणखी मागे जाऊया. इतिहासात पाहिलं तर तिबेटमध्ये तीन प्रांत होते – वू-सांग, आमदो आणि खाम. ४,००० ते ५,००० वर्षांपूर्वीच पूर्व तिबेटच्या भागात मानव वस्ती सुरू झाली होती. त्यामुळे तिबेटी संस्कृती खूप प्राचीन आहे. सातव्या शतकात तांग राजावंश आणि तिबेट यांच्यात सीमा वाद सुरू झाले. पण ८२१ मध्ये दोन्ही देशांमध्ये औपचारिक शांतता करार झाला, त्यामुळे तिबेटी लोक तिबेटमध्ये, तर चिनी लोक चीनमध्ये सुखात राहायला लागले आणि हाच काळ तिबेटच्या इतिहासातला महत्त्वाचा काळ आहे, कारण याच काळात बौद्ध धर्माचा तिबेटमध्ये प्रवेश झाला. आता तिबेटवर आक्रमण कसं व्हायला लागलं ते बघूयात.
१२४० मध्ये मंगोलांनी तिबेटवर आक्रमण केलं. १२४७ मध्ये चंगेज खानचा नातू गोदान खान याने साक्या पंडित नावाच्या तिबेटी लामाशी भेट घेतली आणि त्यांच्या प्रभावाखाली येऊन बौद्ध धर्म स्वीकारला. याच काळात लामांच्या पुनर्जन्माची पद्धत सुरू झाली. ज्यात दलाई लामांना सर्वात मोठे धर्माचे गुरु मानलं गेलं. १७२० मध्ये चिनी चिंग राजवंशाने तिबेटवर आक्रमण केलं. यावेळी तिबेटचे दोन मोठे प्रांत खाम आणि आमदो पूर्णपणे चीनच्या ताब्यात गेलं. १७२४ पर्यंत तिबेटने हे दोन प्रांत गमावले. त्यांनंतर १९१२ मध्ये त्या वेळचे दलाई लामा म्हणाले, “आम्ही एक छोटा, धार्मिक आणि स्वतंत्र देश आहोत.” पण चीनला हे पटलं नाही. १९१४ मध्ये शिमला येथे ब्रिटन, चीन आणि तिबेट यांच्यात शिमला करार झाला, यात मॅक महोन लाइन फिक्स झाली. ब्रिटन आणि तिबेटने शिमला करारावर स्वाक्षरी केली पण चीनने केली नाही. मग पुढची ४० वर्षे म्हणजे १९१२-१९५०मध्ये तिबेट पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त राहिला. (Dalai Lama)
१९५० मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने तिबेटवर चामदो युद्धात आक्रमण केलं, ज्याला Battle of Chamdo म्हणतात. यामुळे तिबेटचं स्वातंत्र्य संपलं आणि १९५१ मध्ये दलाई लामांना दबावाखाली सेव्हन्टीन पॉइंट अॅग्रीमेंटवर साइन करावी लागली. तेव्हा त्यांचं वय १५ वर्ष होतं, पण याबाबतीत अजूनही वाद आहेत. या करारात तिबेटला स्वायत्तता आणि धार्मिक स्वातंत्र्याचं आश्वासन देण्यात आलं, पण चीनने ते पाळलं नाही.
उलट, PLA ने तिबेटमध्ये सैन्य तैनात केलं, तिबेटी मोनॅस्ट्रीवर हल्ले केले आणि खाम आणि अमदो प्रांतात लँड डिस्ट्रिब्यूशनसारखी कम्यूनिस्ट पॉलिसिस लादल्या. आता तिबेटी लोकांमध्ये चिनी दडपशाहीविरुद्ध राग वाढत गेला. खाम्पा आणि अमदो जमातींनी १९५६ मध्ये गुरिल्ला युद्ध सुरू केलं, ज्याला CIA चा सीक्रेट सपोर्ट होता. चिनी सैन्याने या बंडखोरांवर जोरदार कारवाई केली आणि हजारो तिबेटी मारले गेले. यामुळे ल्हासामध्येही तणाव वाढला. १० मार्च १९५९ ला ल्हासामध्ये एक अफवा पसरली की, चिनी सैन्य दलाई लामांना पकडून बिजिंगला नेणार आहे किंवा त्यांना मारणार आहे. कारण त्यांना बॉडीगार्डशिवाय चायनिज नाटकाच्या परफॉर्मेंसला बोलवण्याच्या आमंत्रणामुळे पसरली. यामुळे तिबेटी जनतेत प्रचंड संताप उसळला. जवळपास ३,००,००० तिबेटींनी नोर्बुलिंका पॅलेस वेढला आणि दलाई लामांना संरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरले. ही घटना ल्हासा बंड म्हणजे Lhasa Uprising म्हणून ओळखली जाते. (Dalai Lama)
१७ मार्च १९५९ला चिनी सैन्याने ल्हासाला घेरलं होतं आणि नीचुंग स्टेट ओरॅकलच्या म्हणण्यानुसार दलाई लामांनी त्याच रात्री पलायन केलं आणि भारताच्या दिशेने निघाले. १४ दिवसांच्या प्रवासानंतर ते अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचले. चिनी सैन्याने तिबेटमध्ये तिबेटी संस्कृती, धर्म आणि त्यांची आयडेनटिटी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोनॅस्ट्री नष्ट केले गेले आणि तिबेटी लोकांवर अत्याचार वाढले. दलाई लामांनी सांगितलं की, “तिबेटमध्ये राहून मी माझ्या लोकांचं आणि धर्माचं रक्षण करू शकत नव्हतो, कारण चिनी सरकार मला पूर्णपणे नियंत्रित करू इच्छित होतं.”
१० मार्च १९५९ च्या ल्हासा बंडानंतर चिनी सैन्याने ल्हासावर हल्ला केला. नोर्बुलिंका पॅलेसवर गोळीबार झाला आणि हजारो तिबेटी मारले गेले. मग दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला, कारण त्यांना तिबेटी बौद्ध धर्म आणि संस्कृती जपायची होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आश्रय देण्याचं वचन दिलं. तसं बघायला गेलं तर गौतम बुद्धांचा जन्म भारतात झाला आणि तिबेटी लोकांचा बुद्धांशी थेट संबंध येतो. म्हणून दलाई लामांना भारतात त्यांचं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य चालू ठेवणं शक्य होतं. दलाई लामांनी धरमशालामध्ये Central Tibetan Administration स्थापन केलं, जिथून त्यांनी तिबेटी ओळख आणि स्वायत्ततेचा लढा पुढे चालू ठेवला. (Dalai Lama)
===============
हे देखील वाचा : Mills to Mafia : म्हणून गिरणी कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला!
===============
भारताने १९५९ मध्ये दलाई लामांना आणि जवळपास १,००,००० तिबेटी निर्वासितांना आश्रय दिला. २६ मार्च १९५९ ला दलाई लामांनी नेहरूंना पत्र लिहिलं, ज्यात त्यांनी सेव्हन्टीन पॉइंट अॅग्रीमेंट रद्द केला आणि तिबेटमधील चिनी अत्याचारांचा पर्दाफाश केला. दलाई लामांनी तिबेट सोडल्यानंतर, २१ मार्च १९५९ ला PLA ने ल्हासावर जोरदार हल्ला केला. पोटाला पॅलेस, नोर्बुलिंका आणि जोखांग मंदिर यांच्यावर बॉम्बहल्ले झाले. जवळपास ८७,००० तिबेटी मारले गेले आणि हजारहून जास्त जणांना अटक झाली. २८ मार्चला रोजी चिनी सरकारने तिबेटी सरकार बरखास्त केलं आणि तिबेटला पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणलं.
१९६६-१९७६ दरम्यान, चीनने तिबेटी कल्चरवर मोठा हल्ला केला. ६,००० पेक्षा जास्त मोनॅस्ट्री नष्ट झाले, धार्मिक ग्रंथ जाळले गेले आणि तिबेटी भाषा आणि परंपरांवर बंदी आली. या काळात १२ लाख तिबेटी मरण पावले. त्यात चीनचा आणखी पराक्रम म्हणजे, १९९५ मध्ये दलाई लामांनी गेधुन चोएकी न्यिमा यांना ११वे पंचन लामा म्हणून मान्यता दिली, पण चीनने त्यांना पळवलं आणि ग्याल्त्सेन नोर्बू यांना नेमलं. पंचेन लामाला चीनने किडनॅप केलं, यावर आमचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला आय बटनवर तो विडिओ बघता येईल. यावरून कळतं की, चीनला तिबेटवर संपूर्ण कंट्रोल हवा होता. (Dalai Lama)
ज्यामुळे दलाई लामांना तिबेटमधलं धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात वाटलं. भारतात एक गोष्ट चांगली घडत होती की, दलाई लामांना जागतिक पातळीवर तिबेटच्या अत्याचारांबद्दल बोलता आलं. त्यांनी संयुक्त राष्ट्रांना आणि इतर देशांना तिबेटच्या सिचुएशनची माहिती दिली. १९५९ मध्ये UN ने तिबेटमधील मानवी हक्क उल्लंघनाचा निषेध केला आणि दलाई लामांनी १९८९ मध्ये नोबेल शांती पुरस्कार मिळवला.
आता जुलै २०२५ मध्ये दलाई लामांनी १५वा दलाई लामाची निवड गादेन फोड्रांग ट्रस्ट करेल, अशी घोषणा केली तेव्हापासून चीन तीव्र विरोध करतेय. यावरुन एक गोष्ट तर नक्की लक्षात येईल की, १९५९ मधील चिनी दडपशाही आणि दलाई लामांचं पलायन यामुळे तिबेटी स्वायत्ततेचा लढा आजही सुरू आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics