Home » Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !

Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !

by Team Gajawaja
0 comment
Tenzin Gyatso
Share

तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा आणि चीनचे सरकार यांच्यामधील वाद नव्यानं उफाळून आला आहे. त्याला कारण ठरले आहे ते दलाई लामा यांनी थेट चीन सरकारला दिलेले आव्हान. दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण नेमणार यावरुन सध्या वाद सुरु आहे. चीन हा अधिकार आपला असल्याचे सांगत आहे. तर दलाई लामा हे आपला उत्तराधिकारी नेमण्यासाठी पारंपारिक पद्धतीचाच वापर करणार, यावर ठाम आहेत. चीन सरकारच्या दडपशाही विरुद्ध आता दलाई लामांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भावी लामा कोण असेल ते आम्हीच ठरवणार हे सांगून दलाई लामा यांनी माझा उत्तराधिकारी हा मुक्त जगात जन्माला येईल, त्याच्यावर कुठलिही दडपशाही चालणार नाही, असे खुले आव्हान चीन सरकारला दिले आहे. (Tenzin Gyatso)

दलाई लामा यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे चीनी सरकारनं नाराजी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्ष तिबेटवर वर्चस्व मिळवण्यासाठी चीनकडून हरप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. तिबेटमधील लहान मुलांना जबरदस्तीनं चीनमधील शाळांमध्ये भरती करण्यात येत असून याद्वारे तिबेटी भाषा, संस्कृती संपवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यातच तिबेटमध्ये सर्वोच्च आध्यात्मिक दर्जा असलेल्या दलाई लामांच्या उत्तराधिका-यांच्या नियुक्तीमध्येही चीनने आपणच निवडलेल्या मुलाची उत्तराधिकारी म्हणून घोषणा करावी असा दबाब टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण तिबेटमध्ये चीन विरोधात अधिक नाराजीचे वातावरण पसरले आहे. तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा आणि चीन सरकार यांच्यातील वाद आता अधिक गडद झाला आहे. गेली अनेक वर्ष चीनची दडपशाही सहन करणा-या दलाई लामा यांनी थेट चीन सरकारला आव्हानच दिले आहे. (International News)

दलाई लामांचा उत्तराधिकारी हा ‘मुक्त जगात’ जन्माला येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांचे ‘व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकात चीन सरकारची तिबेटवर होत असलेली दडपशाही आणि पंचेम लामांचे चीननं केलेले अपहरण या सर्वांबाबत दलाई लामा यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. तिबेटमध्ये दलाई लामांच्या उत्तराधिका-याची निवड ही परंपरागत पद्धतीनं होते. त्यासाठी पुनर्जन्माचे काही दाखले तपासण्यात येतात. चीनचा या सगळ्या पद्धतीला विरोध आहे. चीन सरकारनं 15 वा दलाई लामा नेमतांना त्यांची मंजूर असणे आवश्यक असल्याचे याआधीही सांगितले आहे. चीननं याधीही दलाई लामांनी घेतलेले निर्णय नाकारले आहेत. शिवाय दलाई लामांचा उत्तराधिकारी नेमण्याची धमकीही दिली आहे. (Tenzin Gyatso)

सध्याचे दलाई लामा हे 14 वे दलाई लामा आहेत. त्यांचे मूळ नाव तेन्झिन ग्यात्सो असून 1959 मध्ये ते वयाच्या 23व्या वर्षी हजारो तिबेटी लोकांसह भारतात पळून आले. अवघे दोन वर्षाचे असतानाच त्यांची ओळख ही 13 वे दलाई लामा यांचे उत्तराधिकारी म्हणून करण्यात आली. दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याची परंपरा शतकानुशतके एक दीर्घ अशी आध्यात्मिक प्रक्रिया आहे. तिबेटी नागरिकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यातूनच नवीन दलाई लामा निवडले जातात. बालवयातच ही निवड होते, आणि ज्या मुलाला हा मान मिळतो, त्यानंतरचा काळ या बाल दलाई लामाचा अभ्यास काळ असतो. तिबेटी संस्कृती, परंपरा यांचा अभ्यास त्याला करावा लागतो. शिवाय जगभरातील अनेक भाषांचा अभ्यासही दलाई लामांचा असतो. तिबेटमध्ये जगातील सर्वात जुनी हस्तलिखिते आहेत. तिबेटी संस्कृतीनं याचे जतन केले आहे. दलाई लामा हे या सर्वांचे उत्तराधिकारी मानले जातात. (International News)

=============

हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..

Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?

=============

त्यामुळेच दलाई लामांना तिबेटी नागरिक आपला सर्वोच्च आध्यात्मिक नेते मानतात. नवीन दलाई लामांची निवड हा बाह्य जगाला अत्यंत किचकट असा विषय वाटत असला तरी तिबेटमध्ये हजारो वर्षापासून ही परंपरा जपण्यात आली आहे. नवीन दलाई लामाच्या शोधात तिबेटी बौद्ध भिक्षूंनी पाहिलेल्या दृष्टान्तांचे, चिन्हेंचे आणि स्वप्नांचे अर्थ लावण्यात येतात. यासाठी मागील दलाई लामा हे संकेत देऊन जातात. 13व्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर, त्यांचा चेहरा हा पूर्वेकडे होता. त्यामुळे भावी दलाई लामा हा पूर्व दिशेहून येतील, असे मानले गेले. त्या दरम्यान जन्मलेल्या मुलाची धार्मिक प्रक्रियेतून चाचणी घेण्यात येते. ही सर्व प्रक्रिया गुप्त असते. त्यामुळेच या सर्वाला चीनचा विरोध असून यामध्ये आपल्या अधिक-यांचा समावेश करावा अशी चीनची सुरुवातीला मागणी होती. आता भावी दलाई लामांनाच त्यांनी विरोध सुरु केला आहे. या सर्वावर दलाई लामांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर मात्र सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे. (Tenzin Gyatso)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.