आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी गुरुवारी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव झाला. यात अर्जुनचे नाव होते. अर्जुनने (Arjun Tendulkar) प्रथमच आयपीएलच्या लिलावात भाग घेतला होता. गेल्या महिन्यातच त्याने सैय्यद मुश्तक अली टी-२० स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यामुळे तो आयपीएलच्या लिलावासाठी पत्र ठरला. अर्जुनने त्याची बेस किंमत २० लाख इतकी निश्चित केली होती. मुंबई इंडियन्सने त्याच किमतीला त्याला खरेदी केले. आता अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच. या चर्चेतला क्रिकेट जगतात उधाण आले आहे. कोण म्हणतय वडिलोपार्जीत पुण्यायी कामाला आली तर कोण म्हणतय एवढ्या मोठ्या सामन्यांत खेळण्यासाठी तो हकदार आहेच.
आयपीएल लिलावाच्या आधी देखील चर्चा होती की, अर्जुन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात जाईल.लिलावानंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर अर्जुनचे स्वागत केले.मुंबई संघाने स्वागत केल्यानंतर अर्जुनने देखील आभार व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्जुन म्हणतो, “लहानपणापासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, कोच, संघ मालक आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानतो. मुंबई पल्टन संघाचा भाग झाल्याबद्दल मी उत्साही आहे आणि लवकरच ब्ल्यू गोल्ड जर्सी घालण्याची वाट पाहतोय.”
तर दुसरीकडे नेटकरी ‘नेपोटीझम’ चा धागा धरुन अर्जुनवर टीकेची झोड उठवत आहेत. मोठ्या प्रमाणावर ट्विटरच्या माध्यमातून अर्जुनची आत्तापर्यंतची एकूण कारकीर्द आणि आयपीएल मध्ये खेळण्याची संधी या दोन्ही गोष्टींची तुलना करताना दिसत आहेत. यावर – सचिन तेंडूलकरचा मुलगा असला तरीही अर्जुनला स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल तरच मोठ्या स्तरावरील क्रिकेट खेळता येइल. अशा शब्दांत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने क्रिकेटमध्ये नेपोटीझम नसल्याच्या सांगितले आहे.नेपोटिझमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर चोप्राने आपले मत मांडले आहे. चोप्रा म्हणाले, जगभरात अनेक क्रिकेटपटू असे आहेत की, ज्यांची मुलेदेखील क्रिकेट खेळले आहेत. मात्र, त्यांना वडिलांच्या कामगिरीचा लाभ झाला नाही. तसेच या खेळाडूंनी कधीही आपल्या नावाचा वापर आपल्या मुलासाठी केला नाही. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत.
अर्जुनाची निवड झाल्यापासून पुन्हा एकदा नेपोटिझमबाबत वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लोक अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर टीका करीत आहेत, ते म्हणतात की तेंडूलकर या आडनावामुळेच अर्जुनला मुंबईच्या संघात सहज जागा मिळाली. यासह, अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनेही ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 23 वर्षीय सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘तुझ्याकडून हे यश कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हे तुझे यश आहे, मला तुझा अभिमान आहे.’ स्थानिक स्तरावर खेळलेल्या सामन्यांमध्ये अर्जुनने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याच आधारावर त्याची निवड झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशा वेळी मिळालेल्या संधीच तो कशाप्रकारे सोन करतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
शब्दांकन- शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: सचिन तेंडूलकर २०० धावांचा पहिला मानकरी !
=====