चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. मध्यंतरी चीनने अमेरिकेच्या पेंटागॉनवर फुगे सोडल्याचा आरोप करण्यात आला. या फुग्यांच्या माध्यमातून अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे कार्य चालणा-या इमारतीतून अमेरिकेतील संरक्षण विषयक माहिती गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. चीनने हे अमेरिकेने लावलेले आरोप फेटाळले. मात्र या दोन देशांमधील तणाव कमी होत असतानाच आता नव्यानं चीनची एक करामत पुढे आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका भागात चक्क पोलीस स्टेशनचा (Police Station) शोध लागला आहे. हे पोलीस स्टेशन (Police Station) चीनमधील नागरिक चालवत होते. यात चीनी पोलीस काम करत असून ते गुप्तहेर म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. चीनच्या या कृतीमुळे पुन्हा या दोन देशांमधील शत्रुत्व वाढणार आहे. न्यूयॉर्क शहरात मध्यवर्ती असलेल्या या चीनी पोलीस स्थानकातून अमेरिकन पोलीसांनी आता दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी चालू आहे.
चीन, अमेरिकेसह अन्य देशात गुप्तहेरी करत आहे. याबाबत अनेकवेळा पुरावे समोर आले, मात्र चिनी प्रशासनानं हे पुरावे नाकारत या घटनांचा निषेध केला आहे. आता तर चक्क चिनी पोलीसांची एक गुप्त चौकी अमेरिकेत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेचे न्यूयॉर्क हे प्रमुख शहर आहे. या शहरात चिनी पोलीसांची चौकी असल्याची माहिती मिळताच, त्यावर धाड टाकण्यात आली आणि सर्व बाबी समोर आल्या. अर्थात अमेरिकन पोलीसांची धाड पडताच या चौकीतील दोन्हीही अधिकाऱ्यांबरोबर चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी संपर्क तोडला होता. अमेरिकेतील या गुप्त चिनी पोलिस स्टेशनमुळे (Police Station) पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्कमध्ये चीनकडून हेरगिरी करण्याचा हा एक नवीन मार्ग असल्याचे उघड झाले आहे. आता फक्त न्यूयॉर्कमध्येच असे स्थानक होते की, अमेरिकेच्या अन्य शहरातही चिनने आपले गुप्त पोलीस स्थानक उभारले आहे, याची चौकशी चालू झाली आहे.
न्यूयॉर्कमध्ये चिनी पोलिस स्टेशन (Police Station) स्थापन करण्यात मदत केल्याप्रकरणी दोन नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही चिनी सरकारी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली काम करत होते. जगभर हेरगिरी करण्यासाठी चीन रोज नवनवीन युक्त्या अवलंबत आहे. अमेरिकेतील गुप्तचर फुग्यानंतर आता हा थेट पोलीस स्थानक (Police Station) स्थापन करण्याचा प्रकार सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे. न्यूयॉर्क शहरात चौकी स्थापन केल्याचा आरोप असलेल्या दोन व्यक्ती, चीनच्या सरकारी अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार आणि नियंत्रणाखाली काम करत होत्या. त्यांना या धाडीची खबर लागताच त्यांनी लगेच चीनबरोबर असलेले सर्व संपर्क साधने नष्ट केली आहेत.
यासंदर्भात अमेरिकेच्या संरक्षण विभागानं एक पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, 61 वर्षीय लिऊ जियानवांग आणि 59 वर्षीय चेन जिनपिंग यांच्यावर अमेरिकन अधिकाऱ्यांना न कळवता चीन सरकारचे एजंट म्हणून काम करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपी न्यूयॉर्कच्या चायनाटाऊन शहरात आपले पोलीस स्टेशन चालवत होते, त्यातून ते अमेरिकेच्या सार्वभौमत्वाशी खेळत होते, असा आरोप या दोघांवर लावण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या दोन चिनी नागरिकांना एफबीआयने अटक केली आहे. हे दोघंही अमेरिकेत राहून चिनी सरकारवर टीका करणाऱ्या चिनी नागरिकांना आणि परदेशी लोकांना धमकावत असत. त्यांच्यावरील आरोप खरे ठरल्यास दोन्ही चिनी नागरिकांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
याबाबत धक्कादायक माहिती अशी की, चीन, ब्रिटन आणि नेदरलँडसह जगभरातील 53 देशांमध्ये अशी 102 पोलीस स्टेशन (Police Station) चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटीनेही, नेदरलँड, कॅनडा, आयर्लंड, नायजेरियासह 21 देशांतील 25 शहरांमध्ये चीनने बेकायदेशीर पोलीस ठाणी उभारली असल्याचे पुरावे सादर कले होते. मार्चमध्ये कॅनडाने दोन संशयित पोलिस चौक्यांचा तपास करण्याची घोषणाही केली होती. त्यातून चीन संबंधित देशांमध्ये प्रस्थापित सरकारविरुद्ध वातावरण तयार करत असे. त्यातून निर्माण झालेल्या वादाचा फायदा मग चीन घेत असे.
======
हे देखील वाचा : समलैंगिक लग्नासंबंधित मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
======
अर्थात चीननं, अमेरिका आपले वर्चस्व राखण्यासाठी चिनी नागरिकांवर खोटे आरोप करत आहे. चीनची प्रतिमा मलिन करणे हा त्यांचा उद्देश असल्याचे स्पष्ट करत या घटनेत आपला हात नसल्याची भूमिका घेतली आहे. हा चीनी पोलीस स्थानक होते तिथे चिनी हॉटेल असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. एका हॉटेल मागे अशाप्रकारे काम चालू होते. एखाद्या चित्रपटाला साजेसे असे हे कथानक असले तरी भारतातही अशाप्रकारची अनेक चीनी पोलीस स्थानके (Police Station) असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यत भारतात झालेल्या अनेक आंदोलनात परकिय शक्तींचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही चीनचे नाव प्रामुख्यानं पुढे येतं. अशावेळी भारतातही अशी चीनी पोलीस स्थानके नाहीत ना? याचा शोध घेणे गरजेचे आहे.
सई बने