Home » चीन देश बेरोजगारीच्या दिशेने…

चीन देश बेरोजगारीच्या दिशेने…

by Team Gajawaja
0 comment
Unemployment China
Share

जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे स्वप्न जगावर राज्य करायचे आहे. सुपरपॉवर अमेरिकेला मागे सारुन हा सुपरपॉवर किताब चीनला स्वतःच्या नावावर करायचा आहे. चीनने आपल्या या सत्तेच्या हावेपोटी अनेक देशांना कर्ज देऊन त्यांना अंकित केले आहे.  श्रीलंका, पाकिस्तान, आफ्रिकेतील काही देश, नेपाळ सारख्या देशांना चीननं विकासात्मक योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचे कर्ज दिले आहे. या देशांना अंकीत करु पाहणा-या चीनचे मात्र दिवाळे निघाले आहे, हे सांगितले तर खरं वाटणार नाही. मात्र चीनमध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढत आहे. येथील तरुणांना नोकरी नसून सुशिक्षित तरुण त्यांना अपेक्षित असलेल्या मानधनापेक्षा अत्यंत कमी मानधनात काम करत आहेत. कारण चीनमध्ये दर चार तरुणांमागे पाचवा तरुण बेरोजगार आहे. त्यामुळे एकानं नोकरी सोडली तरी ती नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण रांगेत आहेत. चीनच्या या अंतर्गत दिवाळखोरीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांची चुकलेली धोरणे कारणीभूत असल्याची टीका करण्यात येत आहे. कोरोनाचा फटका अवघ्या जगाला बसला. (Unemployment China)

जागतिक अर्थव्यवस्था या महामारीनं पार तळाला पोहचली होती. मात्र त्यातून सावरत आता सर्वच देशात कोरोना काळातला आर्थिक तूट भरुन काढण्यात येत आहे. असे असतांना नेमका जिथे या रोगाचा जन्म झाला आहे, त्या चीनला मात्र कोरोना महामारीदरम्यान निर्माण झालेला आर्थिक तोटा भरुन काढण्यात यश आलेले नाही. त्यातच चीनच्या सरकारचे धोरणही कारणीभूत ठरले आहे. आपल्या देशातील सुविधांवर भर देण्यापेक्षा सध्या चीन जागतिक सत्तेत अग्रभागी येण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सत्तेच्या स्पर्धेत चीनकडून करोडो रुपयांचा खर्च होत आहे.  त्यामुळे देशाची तिजोरी खाली झाली आहे. नवीन उद्योग चीनमध्ये येत नाहीत. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांनी चीनमधून आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकही कमी झाली आहे. सोबत नोक-यांची संधीही कमी झाली आहे. परिणामी चीनच्या तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. या सर्वाला शी जिनपींगच कारणीभूत असल्याची टीका आता खुलेआम चीनमध्ये होत आहे. (Unemployment China)  

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून चीनचा उल्लेख होतो. मात्र गेल्या काही वर्षांत चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. याचा परिणाम म्हणून चीनमध्ये दिवसागणिक बेरोजगार तरुणांची संख्या वाढली आहे. परिणामी युवकांमध्ये असंतोष वाढत आहे. चीनमध्ये मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला आहे. बेरोजगारीचा दर 20.8 वर गेल्यामुळे तरुणवर्ग हताश झाला आहे. चीनची अर्थव्यवस्था अतिशय धोकादायक वळणावर असल्याचे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक सत्तेच्या कारणास्तव चीननं उभारलेला आर्थिक सत्तेचा डोलारा कधीही कोसळण्याच्या बेतात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास चीनमध्ये भिषण परिस्थिती येऊ शकते. शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसू शकतो. (Unemployment China) 

चीनमध्ये 16 ते 24 वयोगटातील लोकांचा बेरोजगारीचा दर मे महिन्यात 20.8 टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. चीनमधील नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने यासंदर्भात निवदेन दिले आहे. त्यात चीनमधील बेरोजगारीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनमध्ये 2021 मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार शांघाय आणि बीजिंग सारख्या मोठ्या शहरात शिक्षीत तरुणांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. हा तेव्हाच्या कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यात अनेक तरुणांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाच्या नोक-या मिळत असल्याचेही नमूद होते. ही परिस्थिती कोरोनाच्या महामारीनंतर कमी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अलिकडेच झालेल्या संशोधनानुसार चीनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या साथीत चीनमध्ये करोडो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. त्या तरुणांचे नव्यानं पुनर्वसन करण्यात चीन सरकारला अपयश आले आहे. (Unemployment China) 

=========

हे देखील वाचा : दुबईमध्ये सध्या एका घराची विक्री चर्चेत

=========

नुकतेच चीन दौऱ्यावर गेलेले जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी झिमॉन यांनी चीनमध्ये वाढलेल्या बेरोजगारीवर (Unemployment China) चिंता व्यक्त केली आहे. जेमी झिमॉन यांच्या म्हणण्यानुसार चीनला आर्थिक नियोजनाची नितांत गरज आहे. चीनमध्ये जवळपास 1.16 कोटी विद्यार्थी नोकरी करण्यास तयार आहेत.  पण त्यांना नोक-या उपलब्ध नाहीत. मंदावलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र त्याचाही अपेक्षित असा परिणाम होतांना दिसत नाही. एकीकडे जगावर राज्य करण्यासाठी उत्सुक असलेल्या चीनची अंतर्गत स्थिती ही असंतोषानं भरलेली आहे. तरुणांना नोक-या नसल्यानं त्यांच्यामध्ये असंतोष वाढत आहे. यावर चीननं लक्ष द्यावं असा सल्ला चीनला अमेरिकेकडून देण्यात आला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.