Home » आयुष्याच्या शाळेत अशा घडल्या लता मंगेशकर 

आयुष्याच्या शाळेत अशा घडल्या लता मंगेशकर 

by Team Gajawaja
0 comment
Childhood stories of Lata Mangeshkar in Marathi
Share

लता मंगेशकर हे नाव आज भारतीय संगीतक्षेत्रात मैलाचा दगड आहे. असा आवाज होणे नाही, असं म्हणत लतादीदींनी संगीतविश्वात गारूड केलं आहे. आजवरच्या या यशस्वी प्रवासात मात्र लतादीदींना अनेक चढउतार, खाचखळगे, अपमान झेलावे लागले आहेत. 

दीनानाथ मंगेशकर यांच्या रूपाने असलेला वडिलांचा आधार गेल्यानंतर भावंडातील मोठ्या म्हणून लतादीदींनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, पण तेच खांदे मजबूत ठेवण्यासाठी दीदींनी त्यांच्या लहानपणातील अनेक कोवळे क्षण लोकांच्या बोलण्याने झालेल्या आघातांनी पचवले आहेत. 

खरंतर माणुसकी, भूतदया, संवेदनशीलता या संस्कारातच मंगेशकर कुटुंबात दीदींच्या वयाची बारा वर्षे सुखात गेली. पण जेव्हा बाबा गेले आणि घर चालवण्यासाठी दीदी समाज नावाच्या जगात वावरायला लागल्या तेव्हा व्यवहाराची भाषा, नियमांचे बोल सांगून अनेकांनी दीदींना मानसिक त्रास दिला. पण कष्टाची तयारी, परिस्थितीची जाणीव आणि आईवडीलांचे संस्कार यामुळे त्यांनी बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतीतूनच उत्तर दिले. 

लता मंगेशकर जेव्हा लहानपणातील मनावर व्रणासारख्या कोरलेल्या घटना सांगायच्या तेव्हा लतादीदींनी संघर्षवाट तुडवत गाठलेले यश खूप काही बोलायचे. 

….आणि दुधाचा पूर आटला

पंडीत दीनानाथ मंगेशकर जोपर्यंत हयात होते तोपर्यंत मंगेशकर कुटुंबाने अत्यंत सधन दिवस पाहिले. खायला प्यायला काहीही हयगय नव्हती. नाटकांच्या दौरयाच्या निमित्ताने ज्या शहरात पंडित दीनानाथ कुटुंबासमवेत जायचे त्या शहरातील सगळ्या चवीरवींचे पदार्थ ते मुलांना आणि माईंना खाऊ घालत असत. 

लता दीदींपासून हृदयनाथ यांच्यापर्यंत प्रत्येक भावंडांमध्ये दोन वर्षाचे अंतर असल्याने सगळीच अगदी पाठोपाठची. पाच मुलं, बाबा आणि माई अशी घरात सात माणसे होती पण दीदींच्या बाबांनी रोजचा दहा लिटर दुधाचा रतीब लावला होता. जेवताना कुंडा भरून दूध माईंनी सगळया मुलांना ताटात वाढायचेच असा बाबांचा दंडकच होता. अध्येमध्ये भूक लागली तरी मुलं ग्लासभर दूधच प्यायची. 

कधीकधी जेवताना वाटीत दूध उरायचे तेव्हा दीदींनी एकदा त्या वाटीतल्या दुधाने हात धुतला तेव्हा माई दीदींना ओरडल्या आणि म्हणाल्या अगं दूध पिऊन टाक असं हात धुवून वाया नको घालवू. तेव्हा बाबा माईंना म्हणाले होते की माझी लता राणी आहे. दुधातुपाची तिच्या आयुष्यात मी कधीच कमी पडू देणार नाही. तेव्हा दीदींनी बाबांना कडकडून मिठी मारली. दूध वाया घालवल्याबददल माफी मागितली पण बाबांनी आपल्याला राणी म्हटलेलं त्यांना खूप आवडलं. 

लतादीदीचं नव्हे, तर मीना, उषा, आशा आणि बाळ म्हणजेच हृदयनाथ या प्रत्येक लेकराला काहीच कमी पडू नये, यासाठी मास्टर दीनानाथ यांची धडपड सुरू असायची. लतादीदी भावंडात मोठ्या असल्याने बाबांची ही धडपड त्या जवळून पाहत आणि त्याविषयी प्रचंड जाणीव व आदर दीदींच्या मनात होता. 

बाबा गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस मंगेशकर भावंडे आणि आई माई हे कुटुंब सांगलीमध्ये वास्तव्य़ास होते. पण कोल्हापुरात हाताला काम मिळण्याच्या संधी अधिक असल्याने आणि मास्टर विनायक यांच्याकडून त्यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये नोकरीचा प्रस्ताव असल्याने लतादीदींनी कुटुंबासोबत कोल्हापूर गाठले. त्यावेळी दीदींचे वय होते १५ वर्षे. त्यांनी मास्टर विनायक यांच्याकडे काम सुरू केले.

बाळाला पोलिओ अन वेदना दीदींना

कोल्हापुरातील मंगळवार पेठेत खरी कॉर्नरला आनंदराव मेस्त्री यांच्या घराशेजारील एक घर लता मंगेशकर यांनी १५ रूपये महिना भाड्याने घेतलं. आशा, उषा, मीना, हृदयनाथ आणि माईंसोबत लतादीदींनी कोल्हापुरात बिऱ्हाड थाटलं. रोज सायकलने त्या मास्टर विनायक यांच्या शालीनी स्टुडिओमधील कंपनीत कामासाठी जायच्या. 

खरंतर पगार इतका तोकडा होता की १५ रूपये भाडे देतानाही खूप कसरत करावी लागायची. मीना, आशा व उषा यांनी विदयापीठ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, तर हृदयनाथांचे वय अजून शाळेत जाण्याचे नव्हते. शिवाय त्यांना पोलिओ झाल्याने सतत त्यांच्या पायातून पू येत असते. गल्लीत मुलं तेव्हा लपंडाव खेळायची. त्या खेळात हृदयनाथ सगळ्यात आधी सापडायचे. ते कुठे लपून बसलेत हे कळायला वेळ का लागायचा नाही याचे कारण जेव्हा इतर मुलांकडून लतादीदींना समजले तेव्हा आपण बाळ म्हणजे हृदयनाथावर उपचारही करू शकत नाही, याची खूप मोठे दु:ख लतादीदींना झाले होते. 

खेळणारी मुलं दीदींना म्हणाली, बाळच्या पोलिओ झालेल्या पायातून वाहणारा पू जिथेपर्यंत जमीनीवर सांडत जातो ना, आम्ही तिथे बाळचा माग काढतो आणि बाळ कुठे लपलाय हे आम्हाला लगेच कळतं. बाळच्या पायातील पू, त्याचा पोलिओ, औषधोपचारालाही पैसे नसल्याचे शल्य याचा फार मोठा परिणाम लतादीदींच्या मनावर झाला.

फी भरली नाही म्हणून….

विद्यापीठ हायस्कूलमधून उषा व मीना यांचे नाव कमी केल्याचा निरोप माईंना पाठवला. लतादीदी शाळेत विचारायला गेल्या तेव्हा फी भरली नसल्याने त्यांचे नाव कमी केल्याचे सांगितले. लतादीदी काही न बोलता तेथून आल्या. मागे काही वर्षापूर्वी विद्यापीठ हायस्कूलच्या निधीसाठी शाळेच्या व्यवस्थापनाने लतादीदींशी संपर्क केला होता तेव्हा लतादीदींनी शाळा व्यवस्थापनाला त्या दिवसाची आठवण करून दिली. दीदींनी निधी दिला, पण आजही त्या वर्षाचे रेकॉर्ड काढून बघा जिथे फी भरली नसल्याने माझ्या बहिणींचे नाव कमी करत असल्याची नोेंद असल्याचे दाखवून दिली. मीना व उषा यांचे शिक्षण थांबल्याचा तो दिवस दीदी विसरू शकल्या नाहीत

फळे खाल्ली नाही तर काही जीव जाणार नाही

दररोजचा मंगळवार पेठ ते शालिनी स्टुडिओपर्यंतचा सायकल प्रवास, आर्थिक परिस्थितीमुळे पोटभर अन्न मिळण्यात येणारी अडचण व दगदग यामुळे लतादीदींची तब्येत बिघडली. तो काळ होता १९४३ ते १९४७. पोटात अन्न कमी आणि त्यात सायकल प्रवासाच्या दगदगीने एकदा लतादीदींना खूपच अशक्तपणा आला. त्या डॉक्टरांकडे गेल्या तेव्हा औषधांसोबत फळे किंवा सुकामेवा खाण्याचा सल्ला डॉक्टारांनी दिला. 

====

हे देखील वाचालता मंगेशकर म्हणजे फक्त सात शब्द, सात सूर, सप्तरंगी वाटचाल इतकेच नव्हे तर बरेच काही आहे.

====

सुकामेव्याचा तर दीदींनी विचारच सोडून दिला, पण जर मास्टर विनायक यांनी पगार थोडा वाढवला, तर फळे खाता येतील या विचाराने दीदी मास्टर विनायक यांच्याकडे गेल्या. त्यावेळी विनायक हे फलाहार करत बसले होते. त्या काळात मास्टर विनायक यांच्यासाठी मुंबईहून चांगल्या दर्जाची फळे येत असत. 

=====

हे देखील वाचा: संगीत क्षेत्रातील एका सुरेल नक्षत्राचा अंत: लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

=====

दीदींनी डॉक्टरांचा सल्ला मास्टर विनायक यांना बोलून दाखवला. मला फळे खाण्यास सांगितले आहे तेव्हा पगारात पाच रूपये वाढवून द्यावे, असे दीदी सांगताच विनायक म्हणाले, कशाला हवीत फळे खायला. एक भाकरीच जास्त खा. माणसाने आपले अंथरूण पाहून पाय पसरावेत. फळे खाण्यासाठी पगारवाढ द्यायला जमणार नाही. मास्टर विनायक यांच्या त्या उत्तराने लता मंगेशकर माघारी फिरल्या. 

पुढे कित्येक दिवस पोटात आग पडली की कोल्हापुरातील गंगाराम चुरमुरेवाले यांच्याकडील चुरमुरे खाऊन त्यावर पाणी पित लतादीदी ढेकर द्यायच्या. बाजारात फळे दिसली की, त्यांना विनायक यांचे शब्द आठवायचे आणि फळे खाण्याची त्यांची इच्छाच मरायची.

अनुराधा कदम


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.