छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतच आलो आहोत, पण शिवरायांच्या काळातच चक्क धुमकेतू दिसला होता, ग्रहण झाले होते, ताऱ्यांची स्थिती वेगळी होती, भूकंप झाला होता, हे सर्व तुम्हाला कदाचित माहिती नसावं. ‘शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित’, श्री शिवभारत ग्रंथात नोंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीची ही नोंद आहे. शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ यांच्यापोटी जन्मलेलं ते कोवळं पोर भविष्यात पाच पातशाह्या, बलाढ्य मुघल साम्राज्य, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी अशा परकीय आक्रमणांना हाणून पाडेल, याचा विचारसुद्धा त्यावेळी कुणी केला नसावा. (Chhatrapati Shivaji Maharaj)
शिवरायांचा पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य, त्यांची नीती, धोरण, त्यांच्या विविध गुणांवर मोठ्या प्रमाणात लिखाण झालं आहे. अगदी समकालीन साहित्यापासून ते आजची आधुनिक युवा पिढीदेखील शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करताना दिसून येते. ज्येष्ठ बंगाली इतिहास संशोधक सुरेंद्रनाथ सेन आपल्या ‘द फॉरेन बायोग्राफिज ऑफ शिवाजी” या पुस्तकात म्हणतात “शिवराय जिवंत असतानाच त्यांची कीर्ती युरोपिय देशांपर्यंत पोहोचली होती’, हा सगळा त्यांच्या पृथ्वीवरील जीवनाचा भाग ! पण भारताच्या इतिहासात ध्रुव ताऱ्यासारखं अढळपद मिळवणारे शिवराय हयात असताना आकाशाची स्थिती काय होती, याची माहिती फार कमीच उपलब्ध आहे. (Top Stories)
शिवरायांचा इतिहास १६व्या शतकातला. याच १६व्या शतकात आयझॅक न्यूटन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ झाला तर इटलीचा प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि फिजीसिस्ट गॅलिलिओ गॅलिली याने टेलेस्कोपचा क्रांतिकारी शोध लावला. मात्र त्याच्याही हजारो वर्षांपूर्वी टेलेस्कोप नसतानाही ग्रह, तारे, नक्षत्र, यांचा अचूक अभ्यास करण्याची ‘ज्योतिषशास्त्र’ ही पद्धत आपल्या पूर्वजांनी शोधून काढली होती. सुरुवातीला आपण ज्युलियन आणि ग्रेगोरियन या इंग्रजी कॅलेंडर्स बाबत जाणून घेऊ. आजच्या काळात ग्रेगोरियन कॅलेंडर जगमान्य असल तरी, त्याचा १० दिवसांचा घोळदेखील जगप्रसिद्ध आहे. इस.वी.सन ३२५ पासून सुरु झालेल्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये काही त्रुटी असल्यामुळे पोप ग्रेगरीने ४ ऑक्टोबर १५८२ चा पुढचा दिवस १५ ऑक्टोबर १५८२ असावा, असाच विचित्र फतवा काढला. त्यामुळे कॅलेंडरमध्ये १० दिवसांचा फरक पडला. शिवरायांच्या जन्मतिथीची १९ फेब्रुवारी १६३० ही दिनांक ज्युलियन कॅलेंडरनुसार आहे, पण ग्रेगोरियननुसार ती १ मार्च १६३० असायला हवी. पण आपण १९ फेब्रुवारी हीच दिनांक निश्चित करून घेतली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)
शिवरायांच्या शिवनेरीवरील जन्मतिथी वेळी आकाशाची स्थिती जणू अशी काही होती, पूर्व क्षितिजावर सिंह, कर्क आणि मिथुन या राशी होत्या, तसंच मंगळ हा ग्रह होता तर पश्चिम क्षितिजावर मिन, मेष आणि वृषभ या राशी होत्या आणि बुध व शुक्र हे ग्रह होते. भारतीय दिनांक फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ आणि ज्युलियन दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी (आजच्या वेळेनुसार) सूर्यास्त झाल्यानंतर सात वाजता माँसाहेब जिजाऊ यांनी एका तेजस्वी सूर्याला जन्म दिला, ज्याचं नाव होतं शिवाजी शहाजी भोसले ! (Top Stories)
शिवरायांच्या ५० वर्षांच्या आयुष्यात अनेक रोमांचक प्रसंग आले आहेत. यामध्ये पुरंदरचं युद्ध, प्रतापगडचं युद्ध, साल्हेरचं युद्ध, कोंढाण्याचं युद्ध, शंभूराजांचा जन्म, सुरतेची लूट, आग्र्याचा प्रसंग, राज्याभिषेक आणि इतर प्रसंगांच्या वेळी आकाशाची स्थिती कशी होती, याचं वर्णन समकालीन बखर, कागदपत्र आणि आधुनिक व अचूक अशा स्कायमॅप प्रो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळालं आहे. शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी चार किंवा जास्त ग्रह आणि सूर्य परस्परांच्या जवळ होते. यामध्ये २० ऑगस्ट १६४८ रोजी पुरंदरच्या युद्धावेळी शुक्र, गुरू, चंद्र, सूर्य आणि बुध अगदी जवळ होते. तर १६ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या लुटीवेळी सूर्य, बुध, गुरू, शनि आणि शुक्र हे जवळ होते.
शिवकाळात एकूण १९ सूर्यग्रहणांची नोंद करण्यात आली आहे. यातील पहिला सूर्यग्रहण (खंडग्रास) १९ एप्रिल १६३२ रोजी झाला होता तर शेवटचा सूर्यग्रहण (खंडग्रास) ३० मार्च १६८० रोजी झाला. यामध्ये १७ खंडग्रास सूर्यग्रहण आणि २ कंकणाकृती सूर्यग्रहणांची नोंद आहे. महत्त्वाचं म्हणजे यात एकही खग्रास सूर्यग्रहण नोंदवलं गेलं नाही. खग्रास सुर्यग्रहणाचा कालावधी सहसा फार कमी असतो, त्यामुळे त्याची नोंद करण्यात आली नसावी. माँसाहेब जिजाऊ यांची १६ जानेवारी १६६५ रोजी सुवर्णतुला झाली, यादिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण घडले होते आणि शिवरायांच्या निधनाच्या ३ दिवसांपूर्वी म्हणजे ३० मार्च १६८० रोजी एका खंडग्रास सुर्यग्रहणाची नोंद करण्यात आली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)
शिवकाळात धूमकेतू दिसल्याच्याही काही नोंदी आहेत. यापैकी एक नोंद समर्थ रामदास स्वामी यांच्या या श्लोकात मिळते,’अकस्मात मागे भूमिकंप झाला, नभामाजी तारेंसी शेंडा निघाला’! समर्थ म्हणतात, अचानक भूकंप झाला आणि आकाशामध्ये ताऱ्याला शेंडी असलेली एक गोष्ट दिसून आली.
शिवरायांच्या निधनाची सभासद बखरमध्ये नोंद आहे, त्यात कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, ‘राजीयांचे देहावसान झाले, ते दिवशी पृथ्वीकंप जाहला, गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून जाला. रात्री जोड इंद्रधनुष्ये निघाली.’ आता यातही भूकंप आणि धूमकेतू या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. तर या दोन्ही घटना अगदी खऱ्या असण्याची दाट शक्यता आहे, असं तत्कालीन संदर्भावरून दिसून येतं. (Top Stories)
================
हे देखील वाचा : Afghanistan To India : विमानाच्या चाकाला लटकून तो अफघाणवरून भारतात आला पण…
================
१६८० साली एका मोठा धूमकेतू ज्याला ‘न्यूटन्स कॉमेट’, ‘कर्च्स कॉमेट’ किंवा ‘द ग्रेट कॉमेट’ म्हणतात, तो पृथ्वीजवळून गेला होता. या धूमकेतूचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ गॉटफ्राईड कर्च याने लावला होता. दुसरी गोष्ट म्हणजे २ एप्रिल १६८० रोजी महाडमध्ये भूकंप झाल्याची नोंद ‘कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स (=>M.०.३) इन पेनिनसुलर इंडिया’ यात करण्यात आली आहे. याचा अर्थ शिवरायांच्या निधनावेळी भूकंप झाल्याची आणि धूमकेतू दिसल्याची या दोन्ही घटना घडल्या असाव्यात, असा अनुमान लावता येतो. चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ (हनुमान जयंती) ग्रेगोरियन दिनांक ३ एप्रिल १६८० रोजी दुपारी १२ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नावाचा स्वातंत्र्यसूर्य मावळला. ते हयात असताना जर हॅलेचा धूमकेतू दिसला असता, तर त्याची नोंद निश्चितच झाली असती, पण हॅलेचा धूमकेतू १६०७ आणि १६८२ साली पृथ्वीजवळून गेला होता. (Chhatrapati Shivaji Maharaj)
आकाशात उत्तरेकडे दिसणारा चमकदार ध्रुव तारा (Polaris star photo) (पोलारिस) सर्वांनाच माहिती आहे. पण शिवजन्माच्या वेळी म्हणजेच ३९० वर्षांपूर्वी तो ध्रुवस्थानापासून आणि अक्षरेषेपासून थोडा दूर होता. मात्र आज तो ध्रुवस्थानाच्या अगदी जवळ आहे. म्हणजे शिवरायांच्या काळापासून आतापर्यंत एका ताऱ्याची जागादेखील बदलली आहे. शिवरायांच्या आज्ञेने ‘करणकौस्तुभ’ हा खगोलशास्त्रीय ग्रंथ रचणारे गणिती आणि खगोल अभ्यासक कृष्ण दैवज्ञ यांनी या ग्रंथात एक श्लोक लिहिला आहे,
प्रकुरू तत्करणं ग्रहसिध्दये। सुगम दृग्गणितैक्य विधायिवत्।
इति नृपेन्द्रशिवाभिधनोदितः। प्रकुरुते कृति कृष्णविधिज्ञराट्।।
याचा अर्थ आकाशाचं निरीक्षण आणि गणिती यांची जोड साधून ग्रहसिद्धी करणारा एक सुगम ग्रंथ तयार करण्याची आज्ञा नृपेंद्र शिवाजी यांनी मला दिली. कृष्ण विधिज्ञ या ग्रंथांचा प्रारंभ करीत आहे. ज्योतिषशास्त्र, पंचांग, गणित, खगोल याबाबतही शिवरायांचा दृष्टिकोन किती व्यापक होता, हे यातून दिसून येतं.या करणकौस्तुभमध्ये मध्यमग्रहसाधन, सूर्यचन्द्रस्पष्टीकरण, पंचतारास्पष्टीकरण, त्रिप्रश्न, चन्द्रग्रहण, सूर्यग्रहण, उदयास्त, ग्रहछाया, ग्रहयुति, नक्षत्रछाया अशा प्रकारचे १४ अध्याय होते.(Chhatrapati Shivaji Maharaj)
आपण नेहमी शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत आलो आहोत, मात्र आकाशाएवढ्या शिवप्रभूंचं आकाशासोबत असलेल्या नात्याबाबत कित्येक जण अनभिज्ञ आहेत. शिवरायांच्या काळातही अनेकांना आकाशाचं कुतूहल असावंच, नाहीतर जगद्गुरू तुकोबारायांनी ‘अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा नांदे नंदाघरी’ ही अभंगाची ओळ रचलीच नसती. यामध्ये अनंत ब्रह्मांडे म्हणजेच Multiverse आणि आज अनेक शास्त्रज्ञांनी ‘Multiverse Theory’ हा संभाव्य सिद्धांत मांडला आहे. शिवराय प्रत्येक क्षेत्रात पारंगत असलेले महान व्यक्तिमत्त्व होते. या महान इतिहासाची खगोलशास्त्राशी निगडित असलेली दुसरी बाजू शिवप्रभूंच्या चरणी अर्पण !
संदर्भ
खगोलीय शिवकाल – मोहन आपटे आणि पराग महाजनी
सभासद बखर – कृष्णाजी अनंत सभासद
राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
दासबोध – समर्थ रामदास स्वामी
करणकौस्तुभ – कृष्ण दैवज्ञ
कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स (=>M.०.३) इन पेनिनसुलर इंडिया – एस. के. गुहा आणि पी. सी. बसू
इंडियन हिस्ट्री काँग्रेस (Vol. ७५) – इनायतुल्लाह खान
कॉमेट टेल्स फ्रॉम इंडिया (एन्शिएन्ट टू मेडिएव्हल) – रमेश कपूर
स्काय मॅप प्रो ८ – ख्रिस मॅरीयॉट (ज्युलियन टू ग्रेगोरियन कॅलेंडर)
विकिपीडिया
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics