अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती आज मोठ्या उत्सहाने आणि जल्लोषामध्ये संपूर्ण देशात साजरी होत आहे. शहाजी राजे भोसले आणि जिजाबाई भोसले यांच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३० रोजी पाच पातशाह्यांना गाडणारा शिवसुर्य शिवनेरी किल्ल्यावर उगवला. सुरुवातीपासूनच महाराज अतिशय हुशार आणि चाणाक्ष होते. छत्रपतींच्या जडणघडणीमध्ये त्याच्या मातोश्री जिजाबाई भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. यंदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी करत आहोत. (Chhatrapati Shivaji Maharaj)
छत्रपती शिवाजी महाराजांचा काय आणि किती महिमा वर्णावा? रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, मात्र तरीही त्यांनी कधीच कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव केला नाही. जातींमध्ये भेदभाव केला नाही. एक आदर्श राजा म्हणून आज शेकडो वर्षांनंतरही महाराजांचे नाव घेतले जाते. हीच ती काय माझ्या राजाची खरी मिळकत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Story)
महाराजांबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो, पाहत आलो, वाचत आलो. त्यांचे शौर्य आणि त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व हे कायम समाजाला प्रेरणा देणारे आणि योग्य दिशा देणारे आहे. मात्र महाराजांच्या वंशाबद्दल, त्यांच्या घराण्याबद्दल जास्त माहिती कोणालाच नसेल. शहाजी राजे ते फारफार तर संभाजी राजे यांच्यापर्यंत लोकांना माहिती असेल. आज महाराजांच्या जयंतीच्या औचि त्याने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आजपर्यंतची वंशावळ जाणून घेणार आहोत. (Chhatrapati Shivaji Maharaj Family Tree)
भोसले घराण्याची सुरुवात बाबाजी भोसले (Babaji Bhonsle) यांच्यापासून झाल्याचे संदर्भ आहेत. बाबाजी भोसले यांचा जन्म सन १५३३ मध्ये झाला. निजामशाहीच्या काळात त्यांनी बाबाजी भोसले यांनी निजामशाहीमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध केली. शाही सुलतानाने या कर्तबगारीबद्दल त्यांना नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव गावची जहागीर दिली. बाबाजी मोठे सदाचारी आणि धर्मशील होते. त्यांना मालोजी (Maloji Raje) आणि विठोजी (Vithoji) असे दोन पुत्र होते. मालोजीचा जन्म १५५० साली झाला तर विठोजी याचा जन्म १५५३ मध्ये झाला. हे दोघेही मोठे हुशार आणि सद्गुणी होते.
फलटणचे देशमुख जगपाळराव निंबाळकर यांनी मालोजीराजे यांची हुशारी पाहून त्यांची बहिण दिपाबाई यांचा मालोजीराजे यांच्याशी विवाह लावून दिला. भाऊ विठोजी यालाही शिलेदारी मिळाली होती. विठोजी याचे लग्न होऊन आठ मुले झाली. मात्र मालोजी यांना संतती नव्हती. मालोजीराजे आणि दीपाबाई यांनी पुत्रप्राप्तीसाठी अनेक दानधर्म, नवससायास केले त्यानंतर त्यांना दैवीकृपेने पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि त्यांनी या मुलाचे नाव ठेवले शहाजी (Shahaji Raje Bhonsle). काही काळाने त्यांना दुसरा मुलगा झाला त्यांनी त्याचे नाव शरीफजी ठेवले. मालोजीराजे यांनी मेवाडच्या भवानीप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानले.
शहाजी राजे सुरुवातीपासूनच अतिशय हुशार, देखणे आणि कीर्तिवान होते. त्यांची वाणी देखील खूपच मधुर होती. मात्र वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे काका विठोजीराजे यांनी त्यांना अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले. पुढे काही काळाने शहाजीराजे यांचा जाधव घराण्यातील जिजाबाई (Jijabai Bhonsle) यांच्याशी विवाह झाला. त्यांना सहा मुली आणि दोन मुलगे अशी एकूण आठ अपत्ये झाली. यातलेच एक होते छत्रपती शिवाजी महाराज तर दुसरे होते संभाजी राजे. शहाजीराजे यांचा पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी याबाबतीत कीर्ती सर्वदूर वाढत गेली. थोरला मुलगा संभाजी याची जबाबदारी शहाजीराजे तर शिवाजीराजे यांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईं यांनी घेतली होती.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मानस त्यांच्या मातोश्रींसमोर व्यक्त केला. आणि त्या दिशेने त्यांनी हालचाल सुरु केली. हळूहळू स्वराज्य आणि महाराजांची कीर्ती पसरू लागली. स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी त्यांची सेना तयार केली. यात त्यांना संपूर्ण साथ मिळाली ती त्यांच्या आईसाहेब जिजाबाई यांच्याकडून. महाराजांची वंशावळ पुढील प्रमाणे.
शहाजी महाराजांनी तीन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी जिजाबाई यांना संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन पुत्र होते. तर दुसऱ्या पत्नी असलेल्या तुकाबाई यांना व्यंकोजी उर्फ एकोजी राजे तर नरसाबाई यांना संताजी राजे हे पुत्र होते. शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. अफजल खानाने दगाफटका केल्यामुळे संभाजी राजे हे १६५५ साली कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारले गेले.
पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सई बाई (निंबाळकर), सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), लक्ष्मीबाई (विचारे), काशीबाई (जाधव), सगुणाबाई (शिर्के), गुनवातीबाई (इंगळे), सकवारबाई (गायकवाड) यांच्याशी ८ लग्न झाली. त्यांना संभाजी राजे आणि राजाराम राजे ही दोन मुले तर सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर या सहा मुली होत्या.
=======
हे देखील वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj : जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टराज्ञींबद्दल!
=======
छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई (Yesubai) होते आणि त्यांना शाहू (Shahu) नावाचा एक मुलगा होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या तीन पत्नी होत्या. ताराबाई, जानकीबाई, आणि राजसबाई. ताराबाईंचे पुत्र शिवाजी द्वितीय. राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी संभाजी या आपल्या मुलाला कोल्हापूरच्या (Kolhapur) गादीवर बसवले. संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहु महाराज हे सातारा (Satara) गादीचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराज १७४९ मध्ये निपुत्रिक वारले. त्यांच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईंचे नातू) गादीवर आले. रामराजासुद्धा निपुत्रिक होते त्यामुळे त्यांच्या जागी दुसरे शाहू हे दत्तक पुत्र गादीवर आले आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह छत्रपती बनले.
साताऱ्याचे उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज मानले जातात. ते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र आहे. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत. सध्या कोल्हापूर संस्थान शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे. युवराज संभाजी राजे त्यांचे चिरंजीव आहेत.