आपला देश विविधतेने संपन्न असा आहे. या देशात प्रत्येक राज्यानुसार, धर्मानुसार अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळेच वर्षभर रोजच देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात सण साजरे होतच असतात. नुकतेच आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने दिवाळीचे प्रकाशपर्व साजरे केले. आता देशाच्या अनेक भागामध्ये छट पूजा साजरी होत आहे. हा सण मैथिल, माघी आणि भोजपुरी लोकांचा सर्वात मोठा सण आहे असे म्हणतात. ही त्यांची संस्कृती आहे.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा सण साजरा केला जातो. छठ पूजेच्या दिवशी सूर्यदेव आणि षष्ठी मैया यांची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी महादेवाची देखील पूजा केली जाते. हा उत्सव बहुतकरून देशाच्या बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागांमध्ये सर्वाधिक साजरा केला जातो. यासोबतच नेपाळमध्येही हा सण साजरा केला जातो. या सणाला सूर्य षष्ठी असेही म्हणतात. छठपूजेचा सण मुलांसाठी ठेवला आहे. हे ३६ तासांचे निर्जला व्रत पाळले जाते.
मान्यतेनुसार, ही पूजा वेद आणि शास्त्रांच्या लिखाणाच्या आधीपासून साजरी केली जात आहे कारण ऋग्वेदात छठ पूजेसारख्या काही विधींचा उल्लेख आहे. यात सूर्यदेवाच्या उपासनेबद्दलही सांगितले आहे. त्यावेळी ऋषी-मुनी उपवास करून सूर्याची उपासना करतात, असेही सांगितले आहे. तथापि, छठचा इतिहास भगवान रामाच्या आख्यायिकेशी जोडलेला आहे.
लोककथेनुसार सीता आणि राम दोघेही सूर्यदेवाची पूजा करत असत. हे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात होते. वनवासातून परतल्यानंतर त्यांनी हे केले. तेव्हापासून छठ पूजा हा एक महत्त्वाचा हिंदू सण बनला आहे आणि दरवर्षी त्याच विश्वासाने साजरा केला जातो.
कार्तिक महिन्यात सूर्य त्याच्या नीच राशीमध्ये विराजमान असतो त्यामुळे सूर्यदेवाची विशेष उपासना केली जाते जेणेकरून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये. षष्ठी तिथीचा संबंध थेट मुलांच्या आयुष्यावर दिसून येतो. त्यामुळे सूर्य देव आणि षष्ठी पूजेमुळे अपत्य प्राप्ती आणि अपत्यांच्या आयुष्याची सुरक्षा केली जाते.
छठ पूजा वर्षातून दोनदा साजरी केली जाते. एक चैत्र महिन्यात आणि दुसरी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी, पंचमी तिथी, षष्ठी तिथी आणि सप्तमी तिथी. षष्ठी देवी मातेला कात्यायनी माता असेही म्हणतात. नवरात्रीच्या दिवशी आपण षष्ठी मातेची पूजा घरच्या सर्व सदस्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी केली करतो.
पौराणिक कथेनुसार, सूर्य देव आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो तसेच सुख आणि समृद्धी देतो. आरोग्य आणि समृद्धीसाठी लोक कठोर उपवास करतात आणि सूर्यदेवाची पूजा करतात. यामध्ये उपवास करणे, नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करणे, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करणे, तसेच सूर्याला जल अर्पण करणे यांचा समावेश आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात ३६ तासांचा उपवासही केला जातो. चार दिवसांचे महत्त्व पाहूया.
पहिला दिवस असतो ‘नहे खा’
कार्तिक शुक्ल चतुर्थीचा पहिला दिवस ‘नहे खा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्व प्रथम घर स्वच्छ केले जाते. यानंतर छठ व्रतात पवित्र स्नान करून पवित्र पद्धतीने तयार केलेले शुद्ध शाकाहारी भोजन घेऊन उपवास सुरू केला जातो. कुटुंबातील इतर सदस्यांनी उपवासाच्या जेवणानंतरच जेवण करण्याची पद्धत आहे. भोपळा, मसूर आणि तांदूळ हे पदार्थ अन्न म्हणून या दिवशी खाल्ले जातात.
दुसरा दिवस असतो ‘खरना आणि लोहंडा’
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन केले जाते. त्याला खरना म्हणतात. आजूबाजूच्या सर्व लोकांना या खरनाचा प्रसाद घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. प्रसादाच्या रूपात उसाच्या रसाने बनवलेली तांदळाची खीर, दुधासोबत, तांदळाचे पिठ आणि तुपासह चुपरी रोटी बनवली जाते. या दिवशी मीठ किंवा साखर वापरली जात नाही.
=========
हे देखील वाचा : गूढ पद्मनाभस्वामी मंदिराची चकित करणारी रहस्य
=========
तिसरा दिवस असतो ‘संध्या अर्घ्य’
तिसर्या दिवशी छठाचा प्रसाद घरीच बनवला जातो. यामध्ये थेकुआ आणि कासार सोबत इतर कोणताही पदार्थ बनवता येतो. हा पदार्थ उपवास करणाऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून बनवलेला असतो. छठासाठी वापरण्यात येणारी भांडी बांबूची किंवा मातीची असतात. संध्याकाळी, सर्व तयारीसह, बांबूच्या टोपलीमध्ये अर्घ्य सूप सजवले जाते. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य सूर्याला अर्घ्य देण्यासाठी घाटावर, नदीवर जातात.
चौथा दिवस असतो ‘प्रभात अर्घ्य’
चौथ्या दिवशी कार्तिक शुक्ल सप्तमीला सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. पहाटे पूजेचे सर्व साहित्य घेऊन नदीवर, घाटावर जाऊन पाण्यात सूर्यदेव बाहेर येण्याची श्रद्धेने वाट बघत उभे राहावे. सूर्योदय झाल्यावर छठ मैयाचा जप करून सूर्याला अर्घ्य द्यावे. शेवटी कच्च्या दुधाचा शरबत पिऊन आणि प्रसाद खाऊन उपवास सोडावा.
(वरील माहिती वाचकांच्या वाचनासाठी दिली गेली आहे. याबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही)