अवघ्या युरोपवर चेर्नोबिल नावाची दहशत पसरली आहे. गेल्या 39 वर्षापूर्वी झालेल्या एका घटनेची आठवण युरोपला होत आहे. 39 वर्षापूर्वी चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये झालेली अणु दुर्घटना मानवी इतिहासातील सर्वात भयानक घटनेपैकी एक ठरली. या दुर्घटनेत कितीजणांचा मृत्यू झाला, हे अद्यापही सांगता येत नाही. या अपघाताचे परिणाम नंतरची अनेक वर्ष येथील जनतेला भोगावे लागले. या अपघाताची गेल्या दोन दिवसापासून नव्यानं आठवण काढली जात आहे, कारण युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, रशियन ड्रोनने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केल्यामुळे युक्रेन आणि अवघ्या युरोपमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चेर्नोबिल दुर्घटना ही जगातील सर्वात मोठी आपत्ती मानली गेली होती. आता त्याच चेर्नोबिलवर हल्ला झाल्याचा युक्रेननं दावा केल्यामुळे 1986 पेक्षाही मोठी आपत्ती येऊ शकते, ही जाणीव झाली, आणि अनेकांचा थरकाप झाला. यापाठोपाठ भविष्यात अशा कोणत्याही आपत्ती टाळता याव्यात म्हणून अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी निश्चित प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. (Europe)
रशिया युक्रेन युद्धाला विराम देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला असतानाच आलेल्या एका बातमीनं अवघ्या युरोपात दहशत निर्माण झाली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाने चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला केल्याचे सांगताच एकच खळबळ उडाली. रशियन ड्रोनने चेर्नोबिल प्लांटच्या रेडिएशन शेल्टरला लक्ष्य केल्याचे झेलेन्स्की यांनी सांगत काही व्हिडिओही शेअर केले. त्यानंतर चेर्नोबिल प्लांटच्या चौथ्या पॉवर युनिटला लागलेली आग आटोक्यात आणल्याची माहिती युक्रेनच्या अधिका-यांनी दिली. पण भविष्यात असा हल्ला झाला तर गंभीर रेडिएशन गळती होऊ शकेल असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनेही पडताळणी करत हल्ल्याची पुष्टी केली. या संस्थेच्या अहवालानुसार रशियन ड्रोनने न्यू सेफ कन्फाइनमेंटच्या छताचे नुकसान केले आहे. हे छत किरणोत्सर्गी अवशेष जतन करण्यासाठी बांधले गेले होते. येथे रेडिएशनची पातळी सामान्य असली तरी या भागात शास्त्रज्ञ लक्ष ठेऊन आहेत. (International News)
या सर्व घटनेमुळे 26 एप्रिल 1986 या तारखेची सर्वांना आठवण झाली. 26 एप्रिल 1986 ही तारीख आत्तापर्यंच्या इतिहासातील युक्रेनसाठीची सर्वात वाईट तारीख ठरली आहे. या दिवशी 26 एप्रिल 1986 चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात एक मोठा स्फोट होऊन प्रचंड विनाश झाला. यात हजारो नागरिक प्रभावित झाले. तसेच पुढच्या अनेक पिढ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. वास्तविक 25 एप्रिल 1986 रोजी प्लांटच्या अणुभट्टी क्रमांक 4 ची चाचणी होणार होती. या काळात, चाचणीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून ऑपरेटर्सनी प्लांटची आपत्कालीन कोर कूलिंग सिस्टम बंद केली. ही चाचणी रात्रीच्या वेळी सुरू करण्यात आली जेव्हा कमी अनुभवी कामगार प्लांटमध्ये ड्युटीवर होते. चाचणी दरम्यान, प्लांटची ऊर्जा पातळी अनियंत्रितपणे खाली गेली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे 26 एप्रिल 1986 चा दिवस उगवला तोच युक्रेनसाठी काळा दिवस म्हणून. (Europe)
मुळात ही सर्व चाचणी होत असतांना प्लांटचे संचालकही उपस्थित नव्हते. या सर्वात ऊर्जा निर्मिती आणि वाफेचा दाब वाढल्याने, एकामागून एक अनेक स्फोट झाले. अनुभवी तज्ञ नसल्यानं या परिस्थितीत काय करावे याचे निर्णय उपस्थित असलेल्या कोणालाही घेता आला नाही. या सर्वात प्लांटच्या रिअॅक्टरचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या अपघातात 31 जणांचा तात्काळ मृत्यू झाला. मृतांचा हा आकडा कमी वाटत असला तरी चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे हजारो नागरिकांचा बळी पडला आहे. रेडियशनच्या संपर्कात आलेल्या या नागरिकांना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला. त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. अशा मृतांच्या थडग्यांनी युक्रेनचा एक भाग भरलेला आहे. 39 वर्षापूर्वी झालेल्या या घटनेची अजूनही दहशत युक्रेनी नागरिकांवर आहे. यानंतर हे संपूर्ण ठिकाण रेडिएशन बाधित म्हणून घोषित करण्यात आले, तोपर्यंत येथील सर्वांवरच रेडिएशनचा परिणाम झाला, आणि त्यांचा त्यात बळी गेला. आजही हे सर्व क्षेत्र किरणोत्सर्गमुक्त म्हणून घोषित केलेले नाही. (International News)
=============
हे देखील वाचा : Elon Musk : ओ एक्स !
Modi Trump : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत काय ठरलं?
=============
अशातच या चेर्नोबिलवर हल्ला झाल्याची बातमी आली आणि युक्रेन काय संपूर्ण युरोपमध्येच हाहाकार उडाला. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कीवच्या उत्तरेस 105 किलोमीटर अंतरावर आहे. 26 सप्टेंबर 1977 रोजी या अणुऊर्जा प्रकल्पाचा पाया घातला गेला. सोव्हिएत युनियनने येथे 1000 मेगावॅट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या बांधल्या आहेत. आता हा भाग युक्रेनच्या ताब्यात आहे. रशियाच्या ड्रोननं ज्या अणुभट्ट्यांवरील संरक्षक कवचाला धडक दिली, ते कवच 275 मिटर रुंद आणि 108 मिटर उंच आहे. या कवचाच्या माध्यमातून रेडिएशन गळती रोखण्यासाठी युक्रेननं 1.6 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. अर्थातच हा सर्व गदारोळ चालत असतांना रशियानं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आयएईएचे संचालक राफेल मारियानो ग्रीसी यांनी अणुउर्जी प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकाराच निष्काळजीपणा नको, असा इशारा रशिया आणि युक्रेन या देशांना दिला आहे. सध्या चेर्नोबिल प्रकल्प हाय अलर्टवर असून येथे शास्त्रज्ञांची मोठी टिम तैनात करण्यात आली आहे. (Europe)
सई बने