महाराष्ट्राचे कुलदैवत आणि आराध्य दैवत म्हणजे खंडोबा अर्थात मल्हार मार्तंड. याच खंडोबाचा मोठा उत्सव अर्थात खंडोबा नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात साजरे केले जाते. याच खंडोबाचे मुख्य देवस्थान असलेल्या महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. आजपासून हे खंडोबा नवरात्र सुरु होत आहे. येत्या चंपाषष्ठीपर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते. हे नवरात्र घरोघरी देखील बसवले जाते. चला जाणून घेऊया या नवरात्राबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल.
डिसेंबर महिना सुरु झाला असून मराठीमधील मार्गशीर्ष देखील सुरु झाला आहे. या महिन्याला खास महत्त्व आहे. याच महिन्यात खंडोबाचे नवरात्र आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. आजपासून अर्थात २ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरु झाला असून मार्तंडभैरव षडरात्रोत्सवचाही प्रारंभ झाला आहे. या दिवशी देव-दिवाळी देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात.
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत या सहा दिवसांच्या काळात हे खंडोबा नवरात्र साजरे केले जाते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. २ डिसेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत हे नवरात्र चालेल. ७ डिसेंबरला चंपाषष्ठी असून त्यादिवशी हे नवरात्र समाप्त होईल. चंपाष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो.
कृतयुगात मणी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, वर दिला की तुमचा कोणी पराभव करू शकणार नाही. त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. ऋषीमुनी करत असलेल्या होमात आणि तपश्चर्येत अडथळा आणून ते उध्वस्त करू लागले. ऋषीमुनींनी शेवटी देवांकडे मदत मागितली. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रुप घेत आपल्या सात कोटी सैन्यासह मणी आणि मल्ला या दैत्यांचा पराभव केला.
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरु होते. सहा दिवसांचे हे नवरात्र असून ह्याला चंपाषष्ठी असे म्हटले जाते. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठी पर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते.
कुळाचार प्रमाणेच सुघट व टाक असतात. दररोज माळी सुघट या घटावर लावल्या जातात. नंदादीप किंवा अखंडदीप प्रज्वलित केले जाते. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती अर्पण केली जातात. जेजुरी प्रमाणेच इतर देऊळात पण खंडोबाचा उत्सव साजरा होतो. वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्यात समावेश असतो आणि हेच नेवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केले जाते.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळद) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही आणि मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.
चंपाषष्टी षडरात्र हा श्री खंडोबाचा प्रमुख उत्सव मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदेस देवाची घट स्थापना होते व षष्टीस या उत्सवाची सांगता होते, खंडोबा कुलदैवत असणाऱ्या सर्वच घरांमध्ये हि घट स्थापना केली जाते, प्रतिपदेस घट स्थापना करून सहा दिवस हा उत्सव चालतो कुटुंब प्रमुख उत्सवात उपवास धरतात, रोज घटावर फुलांची माळ सोडली जाते, चंपाषष्टीस घटाचे उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात.