Home » शीर्षकामधून चित्रपटाची कथा सांगणारा मनस्वी कलावंत – आशिष तांबे

शीर्षकामधून चित्रपटाची कथा सांगणारा मनस्वी कलावंत – आशिष तांबे

by Team Gajawaja
0 comment
Ashish Tambe
Share

आशिष तांबे (Ashish Tambe)! कॅलिग्राफी शिकणाऱ्यांसाठी हे नाव चांगलंच परिचयाचं असेल. पांघरूण, नाय वरन भात लोन्चा… , मारवा अशा अनेक चित्रपटांच्या शीर्षकासाठी त्यांनी काम केलं आहे. आता चित्रपटांसाठी कॅलिग्राफीचं काम म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण या क्षेत्रात कॅलिग्राफर्सना प्रचंड काम आहे.  त्याबद्दल आशिष यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

आशिष तांबे (Ashish Tambe) २०२० सालापासून मराठी चित्रपटांसाठी शीर्षक लिहिण्याचं काम करतात. त्यांना पहिली संधी मिळाली ती पांघरूण चित्रपटाच्या गाण्यांच्या शीर्षकासाठी. पब्लिसिटी डिझायनर आणि कार्टूनिस्ट सुशांत देवरुखकर यांनी महेश मांजरेकर यांना आशिष यांचं नाव सुचवलं आणि ते काम त्यांना मिळालं. याआधी त्यांनी कोणत्याही चित्रपटासाठी काम केलं नव्हतं पण, शॉर्टफिल्म्स आणि व्हिडीओ सॉंग्जसाठी मात्र बऱ्यापैकी काम केलं होतं

चित्रपट, मालिका अथवा नाटकांचं शीर्षक पाहिलं तर ते वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि स्टाईलमध्ये लिहिलेलं असतं. पण हे आकार-उकार केवळ स्टाईल म्हणून नसतात. त्यामागे खूप मोठा अभ्यास असतो. याबद्दल सांगताना आशिष म्हणाले, “चित्रपटाचं शीर्षक लिहिताना त्याचा जॉनर आणि कथा नीट समजून घ्यावी लागते. उदा. ‘पांघरूण’ चित्रपटाच्या शीर्षकांमधला ‘रु’ ज्या पद्धतीने फिरवला आहे. त्यामधून कोणीतरी चुकांवर अथवा एखाद्याच्या अंगावर मायेने पांघरूण घालतंय, असा भास होतो.”   (Calligrapher Ashish Tambe)

शीर्षकाची स्टाईल ठरवताना फक्त कथेचाच आधार असतो. पोस्टर आधी मिळत नाही. आधी शीर्षक तयार होतं मग पोस्टर कारण पोस्टर हे पब्लिसिटी डिझाईनचं काम असतं. त्यामुळे केवळ कथेच्या आधारावर शीर्षकाची स्टाईल ठरवताना नेमका कसा विचार करता, या प्रश्नावर ते म्हणाले, “विचार म्हणजे इथे तुमचा कलात्मक दृष्टिकोन प्रचंड महत्त्वाचा असतो. उदा. कथा रोमँटिक असेल, तर गुंतलेल्या लाईन्स किंवा विरह असेल तर दुरावलेल्या लाईन्स दाखवाव्या लागतात. हॉरर चित्रपट असेल तर त्यामध्ये काय आहे म्हणजे रक्त दाखवायचं की आणखी काही, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. मी कधीही कथा समजून घेतल्याशिवाय काम करत नाही.  

शीर्षक दोन पद्धतीने तयार करतात कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी. टायपोग्राफी शिकायची तर आधी कॅलिग्राफी शिकावीच लागते. अक्षरं लिहिता आली तर ती तयार करता येतात. पूर्वी हाताने अक्षरं लिहिली जात आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे सगळंच सोपं झालं आहे. टॅब, कोरल ड्रॉ असे अनेक पर्याय उपब्ध आहेत. तरीही कॅलिग्राफी शिकावीच लागते. मी अजूनही टायपोग्राफी शिकतोय. पूर्वी वेगवेगळे ब्रश, इंक, पेन्सिल्स, स्केल यांची गरज लागायची, पण आता सॉफ्टवेअरमुळे या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञान कितीही विकसित झालं, तरी तुमची कल्पकता महत्त्वाची आहे.”

या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधींबद्दल बोलताना आशिष म्हणाले, “इथे खूप चांगल्या संधी आहेत. उत्तम करिअर घडू शकतं. मात्र स्ट्रगल खूप आहे. तुमचं काम, कलात्मक दृष्टिकोन याच्या जोडीने कॉन्टॅक्टस वाढवायला हवेत. तुम्हाला तुमचं वेगळेपण सिद्ध करावं लागतं. मुख्य म्हणजे या क्षेत्रात काम करायचं तर ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करणं आवश्यक आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं काम लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. ‘मारवा’ चित्रपटाच्या वेळी मी वैभव जोशी सरांना कामाबद्दल विचारलं तेव्हा ते लगेच तयार झाले कारण त्यांनी माझं काम बघितलं होत. त्यांची गाणी मी कॅलिग्राफी करून माझ्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करायचो. एकुणातच त्यांना माझं काम माहिती होतं आणि त्यांना ते आवडलंही होतं त्यामुळे मला लगेच संधी मिळाली.  

या क्षेत्राबद्दल भरभरून बोलणाऱ्या आशीष यांनी सुरुवातीचे काम महेश मांजरेकरांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत केलं आहे. आता त्यांना रवी जाधव, नागराज मंजुळे, मुक्ता बर्वे यांच्यासाठी काम करायचं आहे. बॉलिवूडचा मात्र त्यांनी अद्याप विचार केलेला नाही. तसंच इंग्लिश अक्षरांपेक्षा जास्त मजा देवनागरी मध्ये अक्षरं लिहिताना येते. इंग्लिश थोडं कठीण आहे. देवनागरीमध्ये लिहिताना मॉडिफिशन करायला वाव भरपूर असतो, असं ते आवर्जून सांगतात. 

=======

हे देखील वाचा – आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत चहावाल्याच्या मुलीने मिळवले रौप्यपदक 

=======

चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी राजकीय क्षेत्रातही कॅलिग्राफीचं काम केलं आहे. “या क्षेत्रात अनेक संधी आहेत परंतु तंत्रज्ञान वाढीचा वेग बघता पुढचं काही सांगता येत नाही. तंत्रज्ञानामुळे कल्पकता कमी होते कारण सगळं आयतं मिळतं. कागद आणि शाई वापरण्यातली मजा कशातच नाही. मात्र स्पर्धेत टिकायचं तर, ते शिकून घेणं आवश्यक आहे. या क्षेत्रातले अनेक उत्तम काम करणारे कलाकार हालाखीचे जीवन जगतायत. जे काम आम्ही आयपॅड वर करतो ते काम हे कलाकार हाताने सहजपणे करतात पण त्यांना तेवढं लाइमलाईट मिळालं नाही.” असं सांगताना आशीष यांनी खेदही व्यक्त केला आहे. 

आशिष तांबे (Ashish Tambe) २०११ पासून अक्षरगणेश देखील करतात. अक्षरांमधून गणपती हा गणपतीच वाटायला हवा असा त्यांचा आग्रह असतो. या क्षेत्रात त्यांचा आत्ता कुठे प्रवास सुरु झाला आहे. मेहनत आणि कलात्मकता या दोन्ही गोष्टींसाठी आग्रही असणाऱ्या आशिष यांच्यापासून यशाचं आकाश फार लांब नाही. 

– मानसी जोशी 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.