अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य भूकंपाने हादरुन गेले. येथे भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 एवढी मोजण्यात आली. भूकंपामुळे या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आणि नागरिकांना समुद्रकिना-याजवळ जाण्याला बंदी घालण्यात आली. या भुकंपाचे धक्के सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत जाणवले. येथून सॅन फ्रान्सिस्को 435 किलोमीटर अंतरावर आहे. या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यानंतर काही हलके भूकंपाचे धक्केही बसले. काहीवेळानंतर या भागातील त्सुनामीचा दिलेला इशारा मागे घेण्यात आला. मात्र या एका घटनेनं कॅलिफोर्नियाच्या किना-यावर गेल्या महिन्यात सापडलेल्या ओअरफिशच्या कथा पुन्हा रंगू लागल्या. नोव्हेंबर महिन्यात कॅलिफोर्नियाच्या किना-यावर एक दुर्मिळ ओअरफिश आढळून आला होता.
वाईट बातमी आणि आपत्तीची सूचना देणारा मासा म्हणून या माशाची ओळख आहे. यापूर्वीही दोनवेळा कॅलिफोर्नियामधील समुद्रकिना-यावर अशाच प्रकारचा मासा आढळून आला होता. ओअरफिश आढळून आल्यावर काही दिवसात भयंकर असा भुकंप येतो, असे बोलले जाते. आता झालेला भुकंप आणि ओअरफिश यांचा नक्की संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. समुद्राच्या खोल तळात रहाणारा हा मासा सहसा कधीही समुद्रकिना-यावर दिसत नाही. मात्र तो जेव्हा जेव्हा समुद्रकिना-यावर दिसतो, त्यानंतर काही दिवसांच्या अवघीनं विनाशकारी भुकंप येतो. त्यामुळे या माशाचा प्रजातींचा अभ्यास केल्यास समुद्राच्या खोल तळाशी होत असलेल्या भुकंपलहरींचा अंदाज घेता येऊ शकेल, अशीही चर्चा आहे. अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. कोस्टल हम्बोल्ट काउंटीमधील फर्न्डेल या लहान शहराजवळ सकाळी 10:44 वाजता भूकंप झाला. यानंतर भूकंपाचे अनेक हलके धक्केही जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर सॅन फ्रान्सिस्को आणि ओकलंड दरम्यानचा समुद्राखालील बोगदाही बंद करण्यात आला. या भुकंपाच्या धक्क्यानं या भागातील इमारतीही चांगल्याच हादरल्या.
या भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सामान जमिनीवर पडले. या भागात नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अनेक दुकानांची सजावट करण्यात आली होती, त्या सर्व सजावटीचे या भूकंपामुळे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांना आणि भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. यापूर्वी 2022 मध्ये उत्तर कॅलिफोर्नियामध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. कॅलिफोर्नियाचा उत्तर-पश्चिम झोन भूकंपाच्या सर्वात संवेदनशील झोनमध्ये येतो. या भागात 3 टेक्टोनिक प्लेट्स आढळतात. त्याच भूकंपाचे उगम मानण्यात येतात. या प्लेट्स सतत गतीमध्ये राहतात आणि जेव्हा त्या एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप येतो. यावेळी झालेल्या 7.0 तीव्रतेच्या भूकंपामुळे सुमारे 40 किलोमीटरच्या परिघात जोरदार हादरे जाणवले. या भागात सुमारे 50 लाखांहून अधिक नागरिक रहातात. या सर्वांना समुद्रापासून दूर रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या सर्वात काही काळ समुद्रकिना-याची पहाणी विशेष पथकाकडून करण्यात आली. त्सुनामी येणार असेल तर त्या समुद्रकिना-यावर येणा-या लाटा पाणी आत खेचून घेतात. तशापैकी कुठलिही परिस्थिती नसल्यामुळे मग हा इशारा मागे घेण्यात आला.
====
हे देखील वाचा : मराठीतला पहिला रॉकस्टार !
========
यानंतर कॅलिफोर्नियामधील नागरिकांना निश्वास टाकला असला तरी तिथे आता पुन्हा ओअरफिशच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ऑगस्ट पासून कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ ओअरफिश मिळत आहेत. गेल्या महिन्यातही असाच दुर्मिळ मासा मृतावस्थेत मिळाला होता. या माशाला डूम्सडे फिश किंवा कयामतचा मासा म्हणूनही ओळखले जाते. कारण हा मासा दिसल्यावर काही दिवसातच महाभयंकर असा भूकंप होतो, अशी धारणा आहे. गेल्या काहीवर्षापूर्वी जपानच्या किना-यावर असेच हे ओअरफिश मृतावस्थेत मिळाले आणि नंतर तिथे भूकंप आणि त्सुनामी यांचे तांडव झाले. कॅलिफोर्नियाच्या किना-यावर आढळणा-या या माशांमुळे कॅलिफोर्नियातही असाच प्रलयकारी भूकंप येणार अशी भविष्यवाणी करण्यात येत होती. आता ही भविष्यवाणी सत्य झाली आहे. त्यामुळे ओअरफिश आणि भूकंप यांचे नाते पुन्हा एकदा दृढ झाले आहे. खोल समुद्रात रहाणा-या या माशांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास व्हावा अशी मागणीही करण्यात येत आहे. खोल समुद्रात होणा-या बदलांमुळे हे मासे समुद्रकिना-यावर येतात. अशी घटना क्वचित घडते, मात्र त्यामागे प्रलयाकारी भुकंपाची सूचना असते. त्याचा अभ्यास झाल्यास संभाव्य भुकंपाची माहिती आधी मिळू शकते अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सई बने