अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणी असले तरी त्यांची ओळख ही एक उद्योजक म्हणून आहे. ट्रम्प यांची रिअल इस्टेट, हॉटेल्स, कॅसिनो आणि इतर व्यवसाय क्षेत्रात अब्जोंची गुंतवणूक आहे. रिअल इस्टेट कंपन्यांसाठी ट्रम्प ओळखले जातात. शिवाय मीडिया, मनोरंजन आणि कपडे यासारख्या इतर व्यवसाय क्षेत्रातही ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक आहे. (Donald Trump)
हे सर्वच ट्रम्प कुटुंबिय उद्योगात आहे. ट्रम्प यांच्या या उद्योगाची महती सांगण्याचे कारण म्हणजे, कारण डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्यपूर्वेच्या दौ-यावर आहेत. हा मध्यपूर्व दौरा अमेरिकेसाठी किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्यात येत असले तरी, या दौ-यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्देश मात्र संशयाच्या भोव-यात आला आहे. कारण ट्रम्प यांचा हा मध्यपूर्व देशांचा दौरा फक्त त्यांच्या कुटुंबियांच्या व्यावसायिक हितसंबंधासाठी असल्याचा आरोप आता होत आहे. ट्रम्प यांच्या मुलाचा आणि जावयाचा व्यापार या देशांमध्ये आहे. त्यासंबंधीची बोलणी कऱण्यासाठी ट्रम्प सौदी अरेबिया आणि कतारमध्ये आल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदाच मध्यपूर्वेच्या देशांमध्ये दौ-यावर आहेत. त्यांचा हा दौरा अनेक अर्थांनं महत्त्वपूर्ण मानला गेला. (International News)
त्याआधी एडेन नावाच्या अमेरिकन सैनिकाची हमास या दहशतवादी संघटनेच्या तावडीतून सुटका करण्यात ट्रम्प यांना यश आले. त्यामुळे हा त्यांचा दौरा आधीच चर्चेत आला होता. मात्र आता ट्रम्प यांच्या या दौ-यावर त्यांच्याच देशातून प्रश्नचिन्ह विचारण्यात येत आहेत. त्याला पहिले कारण ठरले ते कतारमधून ट्रम्प यांना मिळालेले अलिशान विमान. कतारच्या राजघराण्यानं त्यांच्या वापरातील अलिशान विमान ट्रम्प यांना भेट स्वरुपात दिले. आता ट्रम्प यांच्या पुढच्या सगळ्या परदेश दौ-यामध्ये हेच विमान वापरण्यात येणार आहे. मात्र दहशतवाद्यांच्या विरोधात आपण लढा देणार हे सांगणारे ट्रम्प कतार सारख्या देशाकडून भेट कसे घेऊ शकतात, हा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. कारण याच कतार देशाकडून हमास या दहशतवादी संघटनेला उघडपणे आर्थिक मदत देण्यात येते. या आरोपानंतर ट्रम्प यांचा हा दौरा म्हणजे, राजकीय नाही तर व्यावसायिक असल्याचे स्पष्ट होत आहे. (Donald Trump)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखाती दौऱ्यामध्ये त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना अधिक फायदा होणार आहे. सौदी अरेबिया, कतार आणि युएईच्या दौऱ्यामध्ये ट्रम्प त्यांच्या मुलांचा आणि जावयाचा व्यवसाय सुरू करण्याच्या काही योजनांची निश्चिती करणार आहेत. ट्रम्प कुटुंबिय रिएल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते. सौदी अरेबियामध्ये सध्या परदेशी पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. यात ट्रम्प यांची कंपनीही उत्सुक असून या दौ-यातून ट्रम्प सौदी आणि कतारमध्ये मोठी हॉटेल बांधण्याच्या करारावर सह्या करणार असल्याचीही माहिती आहे. सौदी अरेबिया, कतार आणि युएईमध्ये 2017 मध्येही ट्रम्प दौ-यावर गेले होते. तेव्हा ते अमेरिकेचे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. तेव्हाही त्यांनी सौदीमध्ये अशाच प्रकारचे करार केले होते. आत्ता इस्रायल सारख्या मित्र देशाला लांब ठेऊन ट्रम्प यांनी कतारला जवळ केल्यामुळे याबाबत अधिक चर्चा सुरु झाली. (International News)
ट्रम्प ऑर्गनायझेशनने अलीकडेच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे $530 दशलक्षचा लक्झरी प्रकल्प सुरू केला आहे. हा अमेरिकन कंपनीनं सौदीमध्ये केलेला सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार ठरला आहे. हा करार दार ग्लोबल नावाच्या कंपनीसोबत झाला आहे. ही कंपनी सौदी रिअल इस्टेट कंपनी दार अल अर्कानची आंतरराष्ट्रीय शाखा आहे. याशिवाय ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी रियाधमध्ये आणखी दोन प्रकल्प सुरु करण्यासाठी सौदी सरकारबरोबर बोलणी सुरु केली आहेत. ट्रम्प यांच्या दौ-यात या प्रकल्पांच्या कराराच्या अंतिम मसुद्यावर सह्या होणार असल्याची माहिती आहे. असेच काही करार कतारमध्येही करण्यात येणार आहेत. (Donald Trump)
=======
हे देखील वाचा : Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ
Vegetarian : ८०० वर्षांपासून शाकाहारी असलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव
=======
डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगाची सर्व कमान सध्या त्यांची मुले डोनाल्ड ज्युनियर आणि एरिक ट्रम्प यांच्याकडे आहे. शिवाय ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे सुद्धा सौदी अरेबियामधील मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. या सर्वांच्या योजनांवर स्वतः डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दौ-यात अंतिम निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प 16 मे पर्यंत या देशांमध्ये असून हा त्यांचा सर्वात मोठा दौराही ठरणार आहे. त्यामुळेच या दौ-यामागचे सत्य लवकरच बाहेर यायला हवं, अशी मागणी आता अमेरिकेतील ट्रम्प विरोधक करत आहेत.
सई बने