बौद्ध धर्मात बुद्ध पौर्णिमेला (Buddha Purnima) अनन्यसाधारण महत्व आहे. भगवान बुद्धाचा जन्म, मृत्यू आणि ज्ञानप्राप्ती याच दिवशी झाली असा समज आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार, प्रचार करण्याचे काम त्यांच्या अनुयायामार्फत सातत्याने केले जाते. बुद्ध पौर्णिमेला (Buddha Purnima) वेसाक किंवा बुद्ध जयंती म्हणून देखील संबोधले जाते.
भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी येथे झाला असे मानण्यात येते. शाक्य राजाचा राजा शुद्धोधन आणि त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी जन्माला आलेल्या या अपत्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच महाराणी महामाया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर छोट्या सिद्धार्थचे पालनपोषण त्यांची मावशी, गौतमीने केले.

इ.स ५४७ मध्ये भगवान बुद्धांचे लग्न यशोधरा या सुंदर राजकुमारीसोबत लावून देण्यात आले. त्यांना राहुल नावाचा एक मुलगा देखील झाला. असं म्हणतात की, एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली होती की, सिद्धार्थ एकतर मोठा राजा होईल, नाहीतर खूप मोठा ज्ञानी संन्याशी होईल. राजा शुद्धोधनांनी सिद्धार्थ राजा व्हावा यासाठी त्यांना महालातच ठेवण्यास, जीवनाच्या वास्तवापासून दूर ठेवण्यास सुरुवात केली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षापर्यंत भगवान बुद्ध जगापासून दूर आपल्या सुखासीन आयुष्यातचं राहिले.
एके दिवशी बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही हादरवून टाकणारी दृश्ये बघितली. त्यांना एक म्हातारा माणूस, एक प्रेत, एक संन्यासी अशी काही दृश्ये दिसली. जीवनाची वास्तवी होरपळ पाहून ते विचारात पडले आणि आपल्या सुखासीन जीवनाचा त्याग करून ते ज्ञानप्राप्तीसाठी निघाले. त्यानंतर गौतम बुद्धांनी वयाच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत अखंड प्रवास केला.(Buddha Purnima)
यादरम्यान ते उपवास करायचे. उपवासाचे प्रमाण एवढे भयंकर वाढले होते की दिवस झाडाचं एक पान खाऊन निघायचा. अशा तीव्र उपवासामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला, शरीर अस्थिपंजर होऊन गेले. एके दिवशी बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निर्णय भगवान बुद्धांनी घेतला. एकोणपन्नास दिवसाच्या अखंड साधनेनंतर वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्या वृक्षाखाली बसून बुद्धाने ज्ञानसाधना केली त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे संबोधले जाते.(Buddha Purnima)
ज्ञानी बुद्धांनी सारनाथ येथील पाच अनुयायांना पहिला उपदेश दिला, त्याला धम्मचक्रपरिवर्तन म्हणून संबोधले जाते. बौद्ध धर्माची स्थापना केल्यानंतर सहाव्या शतकात बुद्धांनी जवळपास एक लाख लोकांना धर्माची दीक्षा दिली. बुद्धांनी आपल्या शिकवणीत चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाचा सातत्याने उल्लेख केला.(Buddha Purnima)
=========
हे देखील वाचा : आतापर्यंत या कलाकारांनी साकारल्या आहेत हनुमानाच्या भूमिका!
=========
वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत बुद्धांनी धर्माचा प्रसार केला, उपदेश देण्याचे काम केले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धांनी आपला देह सोडला. इसवी सन पूर्व ४८३ मध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे बुद्धांचे परीनिर्वाण झाले. बुद्धांच्या मृत्युनंतर जगभरात फार मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार झाला. बुद्धांचा जन्म, मृत्यू आणि ज्ञानप्राप्ती एकच दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी झाली होती म्हणून बुद्ध पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे.