देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण देशभरातील होळीपेक्षा वृंदावन, मथुरा आणि बरसाना येथील होळी ही काही वेगळीच असते. या ब्रज होळीला पाहण्यासाठी देशासह जगभरातून लाखो भाविक येथे दाखल होतात. या भागात होळीचा सण एक दोन दिवस नाही तर चाळीस दिवस साजरा केला जातो. वसंतपंचमीपासून सुरु होणारी ही होळी साक्षात भगवान कृष्ण आपल्यासोबत आहेत, या भावनेनं ब्रजवासी साजरी करतात. या ब्रजमधील प्रत्येक गाव या होळीच्या रंगात रंगून जातं. ही होळी आता जगभर प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक या रंगात सामिल होतात. यावर्षी होळी खेळण्यासाठी 25 लाखांहून अधिक भाविक ब्रजमध्ये येण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. या भाविकांसाठी आता ब्रजनगरी तयार होत आहे. वसंत पंचमीपासून बरसाना, नंदगाव, वृंदावन, गोकुळ येथे होळीची सुरुवात होते. वसंत पंचमीच्या दिवसापासून पुढच्या प्रत्येक चाळीस दिवस येथे भगवान कृष्ण आणि राधारानी यांची होळी साजरी होते. सुरुवातीला या भागातच मर्यादित असणारी ब्रज होळीची लोकप्रियता जगभर झाली आहे. त्यामुळे लाखो भाविक बरसाना, नंदगाव, वृंदावन येथील होळीमध्ये सहभागी होण्यासाठी येऊ लागले आहेत. (Braj Holi)
या भागातील हॉटेलचे बुकींग आत्तापासून हाऊसफूल असून आता भाविक होमस्टे आणि आश्रमांमध्ये रहाण्यासाठी बुकींग करत आहेत. त्यातच प्रयागराजमध्ये महाकुंभ चालू असून या महाकुंभसाठी येणारे अनेक भाविकही वृंदावन मध्ये आले असून भगवान कृष्णाच्या होळीत सामिल होत आहेत. राधारानींचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या बरसानामध्ये वसंत पंचमीच्या मुहूर्तावरच होळी सुरु झाली आहे. या दिवशी बरसानाच्या लाडलीजी मंदिरात होळीचा खांब लावण्यात आला. त्याचवेळी भक्तांच्या अंगावर गुलाल आणि रंगांची बरसात करत येथे होळीचा उत्सव सुरु झाला. आता 28 फेब्रुवारी रोजी होळीची पहिली चौपाई लाडलीजी मंदिरात काढली जाईल. म्हणजेच होळीच्या निमित्तानं होळीची गाणी गायली जातात. राधारानी मंदिरातील या चौपाईमध्ये ढोल वाजवून राधीरानींचे गुणगान केले जाते. होळीसाठी 7 मार्चचा दिवस खास असेल. या दिवशी फाग निमंत्रण पाठवण्यात येईल. म्हणजेच या दिवशी मित्रांना होळी साजरी करण्यासाठी आमंत्रित केले जाते. (Latest News)
त्यानंतर लाडलीजी महालात लाडूमार होळी साजरी केली जाते. लाडलीजी मंदिरात आलेल्या भाविकांवर लाडू मारले जातात. हे प्रसादाचे लाडू घेण्यासाठीही मोठी गर्दी होते. 8 मार्च रोजी बरसानाची जगविख्यात लठ्ठमार होळी सुरु होईल. ही लठ्ठमार होळी या भागात आठवडाभर साजरी केली जाते. नंदगावमध्ये 9 मार्चला लठ्ठमार होळी साजरी होईल. 10 मार्च रोजी वृंदावनची प्रसिद्ध रंगभरणी होळी साजरी होईल. तसेच बांके बिहारी मंदिरात फुलांची होळीही खेळली जाईल. 11 मार्च रोजी द्वारकाधीश मंदिरात होळी खेळली जाणार आहे. तर यावेळी गोकुळातील प्रसिद्ध रमणरेतीमध्ये भाविक होळी खेळणार आहेत. अशाचप्रकारे प्रत्येक दिवसाला वृंदावन, बरसाना, नंदगाव, गोकुळ, मथुरा या भागात होळी पारंपारिक पद्धतीनं साजरी होणार आहे. (Braj Holi)
संपूर्ण ब्रजमध्य़े 13 मार्च रोजी होलिका दहन होऊन 14 मार्च रोजी धुळहरी म्हणजेच धुळवड साजरी होईल. अर्थात या नंतरही ब्रजमध्ये होळीचा रंग उतरत नाही. यानंतर येथे पारंपारिक हुरंगा खेळला जातो. याला चाबूकमार होळीही म्हणतात. भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलदेव यांच्या नावाने हुरंगा साजरा केला जातो. या भागातील प्रत्येक मंदिरात हा हुरंगा साजरा होतो. हा हुरंगा पाहण्यासाठीही मोठी गर्दी होते. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण, त्यांचा भाऊ बलदेव याची पत्नी रेवती हिच्यासोबत होळी खेळत असत. (Latest News)
=============
हे देखील वाचा : Prayagraj : महाकुंभमधील धर्म संसदेकडे देशाचे लक्ष
Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?
=============
बलदेव येथील गोस्वामी समाजातील तरुण आणि महिला आपल्यासोबत प्रत्यक्ष भगवान कृष्ण आणि बलदेव असल्याची भावना घेऊन पारंपारिक गाणी गातात. हा सर्व उत्सव 22 मार्च पर्यंत चालतो. वृंदावन येथे रंगनाथजींची होळी होऊन या होळीच्या उत्सवाची सांगता होईल. या सर्व होळीसाठी ब्रजभूमी तयार होत असून लाखो भाविक या होळीला येणार आहेत. त्यात कुंभमेळ्यातील भाविक सामिल होणार असल्यामुळे यावर्षी भाविकांचा आकडा 25 लाखांच्या पार जाणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. (Braj Holi)
सई बने