दीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाना मुहूर्त लाभला. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान झाले व ९ फेब्रुवारीला निकाल लागले. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांनी दणदणीत विजय मिळवला. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनी मिळून जिल्हा परिषदेच्या एकूण ७३१ जागांपैकी सुमरे ५५० जागा मिळवून प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उबाठा सेना यांना चारी मुंड्या चित केले. या विजयात भाजपचे यश विशेष उठून दिसते. या यशाचे निर्विवाद मानकरी आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कुशल संघटक असलेले महाराष्ट्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण ! २०१४ सालापासून ते आजतागायत भाजपने महाराष्ट्रातील क्रमांक १ चा पक्ष हे स्थान अबाधित राखले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा खूप कमी यश मिळाल्याने महाविकास आघाडीची सरशी झाली होती. पण भाजपने त्वरित आत्मपरीक्षण करून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची दुरुस्ती केली आणि त्याचा परिणाम २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला.

२०२४ च्या विधासभा निवडणुकीत भाजप सहयोगी सदस्यांच्या साथीने १३७ जागापर्यंत पोहोचला. बहुमताच्या १४५ या आकड्यापासून भाजप हाकेच्या अंतरावर होता. विधानसभा निवडणुकीत जो सिलसिला चालू झाला तो २०२५ मध्ये झालेल्या नगरपालिका/नगरपरिषद निवडणुका तसेच २०२६ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुका यात कायम राहिला. शेवटी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी भाजपच्या यशोमालिकेवर कळस चढवला. आता पुढील ३ वर्षें महाराष्ट्रात कुठलीही सार्वत्रिक निवडणूक नाही त्यामुळे २०२९ पर्यंत भाजप निर्विवादपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. भाजप हा आत्तापर्यंत शहरी पक्ष मानला जात होता. पण या निवडणुकांमुळे भाजपने ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा आपली पाळेमुळे घट्ट रोवली असल्याचे दिसून आले. ग्रामीण महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात सिंचन योजनाना गती दिली. वर्षानुवर्षे रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले. शेतकऱ्यांना फक्त रात्री पाणीपुरवठा होत असे. आता दिवसा सुद्धा पाणी पुरवठा सुरु झाला आहे. ७.५ एच. पी. पर्यंतच्या पंपाना वीज बिलातून सूट दिली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना आता दिवसा विदयुत पुरवठा करणे चालू केले. शेत तळ्यांची योजना मोठ्या प्रमाणात राबवून जमिनीची जलसंधारण क्षमता वाढवली. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसानभरपाई दिली. या जोडीला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, शौचालये बांधणे, उज्वला योजना, लखपती दीदी यासारख्या जनकल्याणकारी योजना प्रभाविपणे राबवल्या आणि मतदारांपर्यंत आपली कामगिरी पोचवली. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा चांगले यश मिळाले.

मध्यंतरी झालेले मराठा आरक्षण आंदोलन, ओ बी सी समाजाचे आंदोलन यामुळे भाजपला मोठा फटका बसेल असा विरोधकांचा अंदाज होता. पण वर उल्लेखिलेल्या जन कल्याणकारी योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी भाजपच्या मागे ठामपणे उभे राहिले त्यामुळे आंदोलनांचा प्रभाव फार काळ टिकला नाही. भाजप व महायुतीच्या झंझावतापुढे महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. निव्वळ जातीपातीचे राजकारण करून यापुढे यश मिळणार नाही हाच संदेश या निवडणुकीने काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प.) या पक्षांना दिला. भाजपला शिवसेना व राष्ट्रवादी (अ. प.) या पक्षांची चांगली साथ मिळाली. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्युच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी (अ. प.) गटाला सहानुभूतीच्या लाटेचा चांगला फायदा मिळाला.एकूणच भाजपचे यश हे उत्तम संघटन, योग्य समन्वय व केलेले काम यांची सांगड घातल्याचे फलित आहे.
हे देखील वाचा
Maharashtra Politics : ‘महाराष्ट्रात भाजपाचा ‘गुजरात पॅटर्न’?
एकंदरीत पहायचं झालं, तर वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या आणि केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना जनतेने ओळखलं आणि नाकारलंसुद्धा… महाराष्ट्राची खरी ताकद हा ग्रामीण भागच आहे. गाव, गावकरी आणि शेतकरी जगला तरच राज्य जगेल, हिच नीती भाजपाने अवलंबली. एकंदरीत शहर असो वा ग्रामीण भाग सगळीकडे आता भाजपाचाच डंका आहे.
लेखक – रघुनंदन भागवत
