Home » ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्याबद्दलच्या रंजक गोष्टी

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्याबद्दलच्या रंजक गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dilip Kumar
Share

संपूर्ण जगामध्ये बॉलिवूड खूप लोकप्रिय आहे. आपल्या हिंदी सिनेसृष्टीला भरपूर मोठा इतिहास आहे. अनेक दशकं या इंडस्ट्रीने लोकांचे मनोरंजन केले आणि आजही करत आहे. या मोठ्या ११० वर्षांपेक्षा जास्त मोठ्या काळात बॉलीवूडने अनेक दिग्गज कलाकार आपल्याला दिले. याच दिग्गज कलाकारांपैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार.

भारतीय मनोरंजनसृष्टीचे पहिले सुपरस्टार अशी ओळख मिळवलेल्या दिलीप कुमार यांच्याशिवाय बॉलिवूडचा इतिहास हा कायम अपूर्ण आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि लुक्सने प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. आज जरी दिलीप कुमार आपल्यात नसले तरी त्यांचे सिनेमे त्याच्या आठवणी कायम आपल्या सोबत आहे. आज दिलीप कुमार यांची १०२ वी जयंती. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टींबद्दल.

११ डिसेंबर १९२२ दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता. दिलीप कुमार यांनी मोठ्या पडद्यावर वर्षानुवर्षे राज्य केले. लोकांना दिलीप कुमार धर्माने हिंदू वाटायचे पण त्यांचे खरे नाव युसूफ खान होते. चित्रपटसृष्टीत काम मिळावे म्हणून त्यांनी नाव बदलले. त्यांच्या अभियन्ता होण्याच्या इच्छेविरोधात त्यांचे वडील होते. मात्र तरीही दिलीप यांनी वडिलांचा विरोध झुगारून ते युसूफ खानपासून दिलीपकुमार झाले.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहम्मद युसुफ खान. दिलीप कुमार यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात वास्तव्यास होते. मात्र, दिलीप कुमार आणि त्यांच्या वडिलांमध्ये काही खटके उडाले आणि त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पेशावर सोडून दिलीप पुण्याला आले. या ठिकाणी त्यांनी काही काळ खाद्यपदार्थ विकण्याचे काम केले. पुढे ते मुंबईत आले. मुंबईमध्ये देखील ते एका कँटीनमध्ये काम करत होते.

मुंबईतील कँटीनमध्ये काम करत असताना त्यांची भेट अभिनेत्री देविका राणी यांच्याशी झाली. देविका राणी या ‘बॉम्बे टॉकीज’चे मालक हिमांशू राय यांच्या पत्नी होत्या. त्यांनी दिलीप कुमार यांना पाहताच क्षणी चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी देविका राणी यांनी त्यांचे नामकरण ‘दिलीप कुमार’ असे केले. १९४४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वारा भाटा’ या चित्रपटातून दिलीप कुमार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. नाव बदलल्यापासून दिलीप कुमार सुपरस्टारची शिडी चढत गेले.

‘ज्वारा भाटा’ मधून दिलीप कुमार यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र ते हताश झाले नाही. या सिनेमामुळे त्यांच्यासाठी मनोरंजन विश्वाची दारे उघडली गेली. यानंतर १९४७ मध्ये त्यांचा ‘जुगनू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभिनेत्री नूरजहाँ आणि शशिकला या मुख्य भूमिकेत होत्या. पुढे १९४९ मध्ये दिलीप कुमार यांनी ‘अंदाज’ या चित्रपटात राज कपूर आणि नर्गिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर दिलीप कुमार यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

दिलीप कुमार हे नाव आजही समोर आले किंवा ऐकले की लगेच ओघाने मधुबाला यांचा विचार यांचे नाव डोक्यात येतोच. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दिलीप कुमार यांचे मधुबालावर खूप प्रेम होते. तराना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम या चार सिनेमांमध्ये दिलीप कुमार – मधुबाला ही जोडी झळकली होती. याचदरम्यान ते प्रेमात आकंठ बुडाले.

मात्र दुर्दैवाने त्यांचे प्रेम बहरत असताना मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्या प्रेमाला कडाडून विरोध केला. मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना या दोघांचे नाते मंजूर नव्हते. त्यामुळेच त्यांनी मधुबाला यांना दिलीप कुमार यांच्याबरोबर नया दौर या सिनेमात काम करु दिले नाही. सिनेमा साईन करुन मग काम करण्यास नकार दिल्यामुळे निर्माता – दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले. दिलीप साहेबांनी मधुबालाऐवजी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते संपुष्टात आले. पुढे मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले.

दिलीप कुमार हे अनेक वैयक्तिक वादांशीही जोडले गेले आहेत. त्यांनी दोनदा लग्न केले होते. वयाच्या ४४ व्या वर्षी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नायिकेशी लग्न केल्याने ते वादात सापडले होते. १९६६ मध्ये दिलीप कुमार यांनी २२ वर्षीय सायरा बानोसोबत लग्न केले. मात्र, दिलीप कुमार यांनी सायरा बानूला सोडले आणि विवाहित असूनही दुसऱ्यांदा लग्न केले. अभिनेत्याने १९८१ मध्ये अस्मा रहमान यांच्याशी लग्न केले परंतु हे नाते फार काळ टिकले नाही आणि १९८३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सायरा बानो त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पत्नी म्हणून त्यांच्यासोबत राहिल्या.

दिलीप साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अफाट यश पाहिले. सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावी करणा-या दिलीप साहेबांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. आपल्या जीवनात दिलीप साहेबांनी तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता.

आपल्या अजोड अभिनयाने चित्रपटसृष्टीतील अनेक दशकं गाजवणा-या दिलीप साहेबांना १९९१ साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना १९९५ साली सन्मानित करण्यात आले होते. दीदार, देवदास, क्रांती, विधाता, दुनिया, कर्मा, इज्जतदार, आणि सौदागर हे दिलीप साहेबांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.