पावसाळा सुरू झाला की भाविकांना ओढ लागते ती देवाच्या भक्तीची. मग श्रावण सुरू झाला की भाविकांचा अगदी मंदिरात लोंढाच वाहू लागतो. पण श्रावण संपता संपताच प्रत्येकाला ओढ लागते, ती म्हणजे आपल्या लाडक्या बप्पाच्या आगमाची.
मग काय बप्पाच्या नावाखाली मंडळा-मंडळामध्ये मूर्तीची उंची किती असावी यामध्ये चुरस लागते. पण गेली दोन वर्षे कोरोनाने हाहाकार माजवल्याने शासनानेही सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्तींची उंची जास्तीतजास्त चार फूट इतकीच असावी असे बजावून सांगितले आहे.
त्यामुळे आता मंडळातील आपापसातील मूर्तीच्या उंचीची स्पर्धा तात्पुरती का होईना पण संपली आहे. पण तुम्हाला माहीत नसेल गणपतीची जगातली सर्वात उंच मूर्ती ही अगोदरपासूनच बनली आहे. आता ती मूर्ती कुठं आहे, हे माहीत आहे का? नाही ना? आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला ती मूर्ती नेमकी कुठे आहे हे सांगणार आहोत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणपतीची ही मूर्ती भारतात नसून परदेशात आहे. आता तुम्ही म्हणाल परदेशात पण नेमकी कोणत्या देशात? तर ही मूर्ती आहे थायलंड देशाच्या ख्लॉन्ग ख्वेन शहरात.
जगातली सर्वात उंच मूर्ती घडण्यामागेही तेवढाच मोठा रंजक किस्सा आहे. चला तर मग जाणून घेऊयात जगातली सर्वात उंच गणपतीची मूर्ती कशी घडली ते.
थायलंडमधील अयोध्या म्हणून सर्वत्र परिचित असणारे अयुथ्या साम्राज्यात ‘चाचोएंगशाओ’ नावाचे शहर १५४९ मध्ये वसवण्यात आले होते. या शहराची ‘चाचोएंगशाओ असोसिएशन’ ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असते.
या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातील गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती बनवायचे ठरवले. तशा पद्धतीने त्यांनी पाऊले उचलायला सुरुवात केली. आणि संस्थेला ख्लॉन्ग ख्वेन शहरात मूर्ती बसवायला ४० हजार वर्ग मीटर जागा मिळाली. या जागेवर आधी ‘गणेश इंटरनॅशनल पार्क’ बनवण्यात आले.
नंतर इथे जगातील सर्वात उंच गणपतीची मुर्ती बसवण्यात आली. गणेश इंटरनॅशनल पार्क आणि गणपतीची मुर्ती घडवायला तब्बल ४ वर्षे लागली होती. २००८ पासून सुरू झालेले काम २०१२ पर्यत चालू राहिलं.
चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवले आहे. स्थानिक इतिहासाचे संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आले आहे.
तसेच मूर्तीची माहिती पहायला गेले, तर आपल्याला समजते की ही मूर्ती प्रख्यात मूर्तिकार पिटक चर्लेमलाओ यांनी ही मूर्ती तयार केली आहे. याच सोबत कांस्य धातूच्या ८५४ वेगवेगळ्या भागांना जोडून बनवण्यात आलेल्या या मूर्तीची उंची ३९ मीटर इतकी आहे.
मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळ आणि मध्ये ओम दिसतो. तसेच थायलंडमध्ये ज्या ४ फळांना पवित्र कार्यात वापरले जाते ती फणस, आंबा, ऊस आणि केळी ही फळे बाप्पाच्या हातात दिसत आहेत.
तसेच बाप्पाच्या पोटाला साप वेटोळे घालून बसल्याचे आपल्याला दिसते व सोंडेत लाडू आणि पायाजवळ बाप्पाचे वाहन उंदीरही आपल्याला पहायला मिळतो.
– निवास उद्धव गायकवाड