नुकताच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा बिग बॉस मराठीचा फिनाले संपन्न झाला. बारामतीच्या गुलकीत धोका फेम सुरज चव्हाणने बिग बॉसच्या पाचव्या सीझनचे जेतेपद पटकावले. सुरजचा हा शो जिंकणार याचा अंदाज जवळपास सगळ्यांनाच आला होता. त्यामुळे सुरज जिंकल्यानंतर अनेकांना आनंद झाला. त्याच्यावर मनोरंजन, राजकारण आदी सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा आणि अभिनंदनच वर्षावच जणू चालू आहे, असे असूनही एक गट मात्र असा आहे, ज्यांना सुरज जिंकल्याचा आनंद झाला नाही.
सुरजपेक्षा जास्त चांगले खेळाडू होते ज्यांनी हा शो जिंकल्या पाहिजे होता. तसेच सुरजने केवळ दयेच्या जोरावर शो जिंकल्याचे अनेकांचे मत आहे. सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरूपात याबद्दल पोस्ट देखील शेअर केली आहे. आता याच असमाधानी लोकांवर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते असलेल्या किरण माने यांनी सडकून टीका करत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. माने यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून आपले मत आणि सुरज जिंकल्यानंतरच आनंद व्यक्त केला आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “मराठी मनोरंजन क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी हे कुणाला मिळावं याची गणितं आपल्या डोक्यात फिट्ट करून दिली गेलेली आहेत. टीव्ही रिॲलिटी शो मध्ये लायक नसूनही एखाद्या शहरी, गोर्यापान, चलाख पोराला ट्राॅफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटत नाही… म्हणजे ‘तो विनर नव्हताच’ वगैरे ट्रोलींग होतं, पण ‘होता है, चलता है’ असं वाटून विषय संपतो.
..पण गरीब, ओबडधोबड, गावरान, भाबड्या माणसानं ट्राॅफी उचलली की लै गदारोळ होतो. ‘गरीबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय’, ‘त्याला हे यश टिकवताच येणार नाही’ अशा टिप्पण्या सुरू होतात. ‘आता दारिद्र्य दाखवुन रडारडी करा आणि ट्राॅफी मिळवा’ अशी हेटाळणी केली जाते. मनोरंजनाच्या गोर्यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना ‘उपरा’ वाटतो. सुरज चव्हाणविषयी जे निगेटिव्ह बोललं जातंय त्याचं मुळ कारण हे आहे !
एक विसरू नका भावांनो, सुरज बिगबाॅसच्या घरात आला तेच मुळात स्वबळावर ! बिगबाॅसच्या ऑफरला सुरूवातीला ‘नाही’ म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता हे ही लक्षात घ्या. इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातला नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा.
अनेकांनी अशी टीका केलीय की सुरज खेळलाच नाही. तर बिगबाॅस हा ‘टास्क’ जिंकण्याचा खेळ नाही. बिगबाॅस हा विपरित परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या-बोलण्यातनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा खेळ आहे. म्हणून तर हिंदी-मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्राॅफी उचललेल्या कित्येकांना लोक विसरून गेले…
View this post on Instagram
पण मनं जिंकलेले कित्येक लोक प्रेक्षकांच्या काळजात आहेत. अठरा वर्षांपुर्वी बिगबाॅस हिंदीचा पहिला सिझन राहुल राॅयनं जिंकला होता. पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एन्टरटेनमेन्ट क्विन आहे आणि रवि किशन भोजपुरीत सुपरस्टार आहे. सुरज ट्राॅफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता !
यश-प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे ‘टॅलेन्ट’ पाहिजे, अंगी ‘कर्तृत्व’ पाहिजे आणि ‘संधी’ मिळाली पाहिजे. या तिन्हीत सुरज यशस्वी ठरला. आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते… ती दाखवली तर तो टिकेलही.
किमान आत्ता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहोणार्या बदकांमध्ये गांवखेड्यातनं नितळ-निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला ‘कुरूप वेडा’ ठरवू नका. कदाचित आत्तापर्यन्तच्या काॅमेडियन्स, परफाॅरमर्स, एन्टरटेनर्सना बुक्कीत टेंगुळ आणणारा तो एक ‘राजहंस’ ठरू शकतो.
लब्यू सुरज… होऊन जाऊदे झापुक झुपूक !”
=======
हे देखील वाचा : नवरात्राची सहावी माळ – देवी कात्यायनी पूजन
=======
किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना योग्य म्हटले आहे तर काहींनी पुन्हा सुरज जिंकल्याचा आनंद असला तरी त्यापेक्षा चांगले खेळाडू होते जे हा शो जिंकू शकले असते, असे देखील म्हटले आहे. दरम्यान किरण माने यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले असून, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश करत त्यांच्या राजकारणातल्या प्रवासाला सुरुवात केली आहे.