Home » भूतान होतंय हाऊसफूल्ल…

भूतान होतंय हाऊसफूल्ल…

by Team Gajawaja
0 comment
Bhutan
Share

उंच पर्वत आणि सुंदर दऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या भूतानला सध्या पर्यटकांचा स्वर्ग म्हणण्यात येत आहे.  भूतानच्या सौदर्याची जगभर चर्चा असून भूतानला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यातही भारतीय पर्यटक मोठ्या संख्येनं या डोंगर – द-यांमध्ये वसलेल्या देशाला भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. (Bhutan)

दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक भूतानला भेट देत आहेत.  या देशाबाबत भारतीयांमध्ये अनोखी उत्सुकता आहे.  तेथील शांतता, पर्वतांचे सौदर्य आणि भूतानमधील (Bhutan) मंदिरांना बघण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत.  मुख्य म्हणजे, भूतानला भेट देण्यासाठी भारतीय पर्यटकांना विशेष कागदपत्र तयार करावी लागत नाहीत.  त्यामुळे पर्यटक या छोट्या देशात एक आठवड्याहून अधिक दिवस राहण्यास पसंती देत आहेत.  

भूतान हा हिमालयाच्या डोंगररांगांनी व्यापलेला देश आहे.  या देशात अजूनही राजाचा शब्द अंतिम आहे. राजांनी बनवलेले नियम तेथील जनता प्राणपणानं जपते.  भूतानमध्ये येणा-या पर्यटकांनाही हे नियम लागू होतात.  पण तरीही पर्यटक भूतानला पसंती देतात. भारतीयांना भूतानमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नाही. 

भूतान (Bhutan) सरकारनं 1974 मध्ये महसूल वाढवण्यासाठी पर्यटनाची योजना जाहीर केली.  भूतानची संपन्न संस्कृती आणि परंपरा बघण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करु लागले.  1974, मध्ये जेव्हा भूतान सरकारनं आपला देश पर्यटकांसाठी खुला केला, तेव्हा फक्त 287 पर्यटकांनी भूतानला भेट दिली.  मात्र आता 2023 मध्ये याच भूतानला लाखो पर्यटक भेट देत आहेत. 

मुख्य म्हणजे, वर्षाचे बाराही महिने, भूतानला पर्यटक भेट देऊ शकतात. त्यातही नोव्हेंबर पासून या छोट्या देशात पर्यटकांसाठी सर्वोत्तम असे वातावरण असते.  यामुळे नोव्हेंबर पासून सुरु झालेला भूतानधील पर्यटन महोत्सव मे अखेरीसही सुरु असतो.  अलिकडील काही वर्षीत भूतानमध्ये वर्षअखेरीसही पर्यटक गर्दी करतात.  येत्या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठीही भूतानमध्ये पर्यटकांनी गर्दी केली आहे.  त्यातही भारतीय पर्यटकांची संख्या मोठी आहे.  

भूतानमधील (Bhutan) अनेक स्थळे ही भारतातील पर्यटन स्थळांची आठवण करुन देणारी आहेत.  आकारानं लहान असलेल्या भूतानमध्ये अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत.  येथे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे ती बुद्धाची भव्य मुर्ती.  डोरदेन्मा शाक्यमुनी येथे ही बुद्ध मूर्ती आहे. जगातील सर्वात उंच बुद्ध मुर्ती असल्याची माहिती आहे.  सुमारे 169 फूट उंच असलेली ही मुर्ती बघण्यासाठी जगभरातील पर्यटक येऊन नतमस्तक होतात.  

याशिवाय भूतानमध्ये मिनी स्वित्झर्लंड आहे.  हे पर्यटनस्थळ पर्यटकांचे सर्वाधिक आवडीचे आहे.  जकार किंवा जख्मर असा त्याचा उल्लेख होतो.   मठांनी वेढलेले हे एक अतिशय आकर्षक धार्मिक केंद्र आहे.  भूतानमधील या शांत आणि धार्मिक स्थळांनी वेढलेल्या पर्यटन स्थळाचे वातावरण वर्षभर पर्यटकांना सुखावणारे असते.  येथील मठांमध्ये राहून शांतीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येतात.  

याशिवाय बुमथांग हे भूतानमध्ये भेट देण्याच्या आणखी एक सर्वोत्तम स्थळ आहे.  येथील टेकड्यांवर ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.  विशेष करुन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी या स्थळी पर्यटकांची गर्दी असते.  त्यातही फेब्रुवारीमध्ये येथे भुतानी भटक्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाला देशविदेशातील पर्टकत उपस्थित असतात.  

भूतानची राजधानी थिम्पूमध्येही पर्यटकांची मोठी गर्दी असते.  हे शहर वांगचू नदीच्या काठावर आहे.  या शहराच्या मध्यभागी चार समांतर रस्ते आहेत.  राजधानीचे शहर असल्यामुळे थिम्पूमध्ये पर्यटकांसाठी अनेक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.  मुख्य बाजारपेठ, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सरकारी कार्यालये, स्टेडियम्स आणि सुंदर बगिचे, यांनी हे शहर सजलेले आहे. (Bhutan)

=============

हे देखील वाचा : थंडीत आलिया भट्ट सारखा ग्लो हवायं? ‘या’ टिप्स करा फॅालो

=============

या शहराचे वास्तुशास्त्र अनोखे आहे.  येथील बहुमजली इमारतीही  भूतानच्या पारंपारिक स्थापत्य शैलीचा वापर करीत बांधल्या गेल्या आहेत.  त्या बघण्यासाठी आणि त्यात वास्तव्य करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येतात.  भूतानच्या पोचू आणि मुंचो या दोन मुख्य नद्या आहेत.  या नद्यांकाठी पर्यटकांसाठी अनेक बगिचे तयार करण्यात आले आहेत. भूतानमधील वास्तुकलाही अत्यंत पारंपारिक आहे.  आजही वास्तुकला येथे जपण्यात आली आहे.  पर्यटकांसाठी हेच मुख्य आकर्षण आहे.  (Bhutan) 

अनेक भारतीय आज मोठ्या संख्येनं भूतानला पहिली पसंती देत आहेत.  तेथे जाण्यासाठी एका परवान्याची गरज भासते.  मात्र हा परवाना सोमवार ते शुक्रवार याच दरम्यान मिळतो, याची काळजी घेण्याचे आवाहन पर्यटकांना करण्यात येते.  कारण भूतानमध्ये शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे वार असल्यामुळे येथे सर्व कार्यालये या दोन वारी बंद असतात.   

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.