२ डिसेंबर १९८४ ची रात्र, भोपाळमध्ये गुलाबी थंडी पडते तसंच वतावरण होतं. जेवण खावण करून लोकं गाढ झोपले होते. संपूर्ण शहर झोपलं होतं. पण भोपाळच्या पूर्वेच्या मध्यभागी एक फॅक्टरी, यूनियन कार्बाइड जागी होती. या फॅक्टरीत कीडे मुंग्यांना मारण्यासाठी कीटकनाशक बनवलं जायचं. रात्री १ वाजले असतील, अचानक यूनियन कार्बाइड फॅक्टरीमध्ये एका टॅंकचा स्फोट झाला. आणि फॅक्टरीवरून विषारी गॅसचं एक ढग भोपाळच्या काही भागांमध्ये पसरलं. काही सेकंदातच लोक घराबाहेर येऊन खोकत, उलट्या करत, सैरावैरा धाऊ लागले. कुठे धावत आहेत हे पण त्यांना नव्हतं माहिती. कारण धावणाऱ्यांचे डोळे जळत होते, श्वास घेता येतं नव्हता. आणि बघता बघता रस्त्यांवर अनेक लोकं बेशुद्ध पडलेले दिसले. काही लोकं हॉस्पिटलच्या दिशेने धावले, पण हॉस्पिटल आधीच खचाखच पूर्ण भरलं होतं. डॉक्टरांना काय उपाय करावा? या माणसांना काय औषध द्यावी आणि किती लोकांना द्यावी, हे काहीच कळत नव्हतं. कारण गर्दी खूप होती. ३ डिसेंबरचा दिवस उजाडला भोपाळ शहराला स्मशानाचं रूप आलं होतं. अनेक मृतदेह रस्त्यावर पडले होते. झाडांची पानं गळून पडली होती. ही गोष्ट आहे जगातल्या सर्वात Worst Industrial Disaster ची, भोपाळ गॅस ट्रॅजडीची. एका रात्रीत कसं एक संपूर्ण शहर गुदमरलं? जाणून घेऊया. (Bhopal Gas Tragedy)
MIC म्हणजे मिथाइल आइसोसायनाईट हाच तो विषारी गॅस, ज्याचा वापर कार्बेरिल कीटकनाशक बनवण्यासाठी केला जायचा. १९८०च्या काळात किटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या याचा वापर करत नव्हत्या, कारण तो विषारी गॅस होता. फक्त UCIL यूनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड हीच कंपनी त्याचा वापर करत होती. त्याचं कारण होतं, कार्बेरिल बनवण्यासाठी MIC गॅस वापरला तर खर्च कमी येतं होता. आणि तसंही त्या काळात कीटकनाशकांची मागणी कमी झाली होती. यामुळे UCIL कंपनीने MIC चं उत्पादन सुरूच ठेवलं आणि न वापरलेल्या MIC गॅसचा ढीग E६१० या एका टॅंकमध्ये वाढतंच राहिला. जिथे ४० टन MIC चाच वापर असायला हवा होता. त्या दिवशी या E६१० या टॅंकमध्ये MIC ४२ टन पेक्षा जास्त होता. (Social News)
टॅंकमध्ये केमिकल प्रोसेस दरम्यान काही अडचण आली, तर कोणत्याही सुरक्षिततेची व्यवस्था नव्हती. आणि जे नको व्हायला हवं होतं, तेच झालं. टॅंकमध्ये केमिकल प्रोसेस दरम्यान अडचण आलीच. E६१० प्रमाणापेक्षा बाहेर पाणी शिरलं, ज्यामुळे गॅस आणि पाण्याची केमिकल रिएक्शन होऊन टॅंक मधलं प्रेशर वाढलं. टॅंकच तापमान ४ ते ५ डीग्री सेल्सियस असायला हवं होतं. तिथे हे तापमान आता २०० च्या वर गेलं होतं. टॅंकवरील प्रेशर वाढलं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यूनियन कार्बाइड फॅक्टरीमध्ये गोंधळ सुरू झाला, पण बाहेर उद्याची वाट पाहत शांत झोपलेल्या भोपाळ शहराला त्याच्यावर ओढवलेल्या संकटाची चाहूल सुद्धा नव्हती. (Bhopal Gas Tragedy)
फॅक्टरीच्या आत गोंधळ वाढतचं चालला होता. कारण या परिस्थितीला आटोक्यात कसं आणायचं, याचं कोणालाच प्रशिक्षण किंवा अनुभव नव्हता. रात्री एकच्या सुमारास E६१० या टॅंकचा स्फोट झालाच. त्यातुन MIC गॅस भोपाळच्या शुद्ध हवेत मिसळलं. याचा पहिला फटका बसला. फॅक्टरीजवळ असलेल्या झोपडपट्टीला. या झोपडपट्टीत दूर दूर खेड्यातून कामाच्या शोधात आलेले लोकं राहत होते. या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांचा झोपेतच मृत्यू झाला. जे वाचले, ते खोकत उलट्या करत घराबाहेर पळाले. पण घराबाहेर रस्त्यांवर परिस्थिती आणखी बिकट होती. लोकं रस्त्यांवर मरून पडले होते. जे स्वत:चा जीव मुठीत घेऊन धावत होते, ते सुद्धा काही अंतर धावल्यानंतर बेशुद्ध पडत होते. त्यातच कित्येक प्राणी कुत्रे, गाय, बैल सगळे मरत होते. यूनियन कार्बाइडकडून मोठी चूक झाली होती. टॅंकमध्ये स्फोट झाल्यानंतर त्यांनी फॅक्टरीचा अलार्म वाजवायला हवा होता. पण स्फोट झाल्यानंतर खूप तास हे अलार्म बंदचं होते. तोपर्यंत लाखों जणांना MIC ने शिकार बनवलं होतं. कुणाच्या डोळ्यासमोर अंधार होता, कुणाला चक्कर येत होती आणि सर्वांना श्वास घ्यायला त्रास होत होता. जी बाळं जन्मालसुद्धा आली नव्हती, ज्यांनी पहिला श्वास सुद्धा घेतला नव्हता. त्यांनी सुद्धा आईच्या पोटातच जीव गमावला होता. (Social News)
२ डिसेंबरच्या रात्रीपासून ३ डिसेंबरच्या सकाळपर्यंत MIC ने भोपाळमध्ये तांडव घातला. या दुर्घटनेत किती जीव गेले? किती लोकं अपंग झाले? याची अचूक आकडेवारी सुद्धा कधी समोरं आली नाही. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत ३,७८७ लोकांचा मृत्यू झाला, तर ५.७४ लाखांहून अधिक लोक जखमी किंवा अपंग झाले. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका आकड्यानुसार या अपघातात 15,724 लोकांचा बळी गेला. मुळात २ दिवसात २५ हजार लोकांचा बळी गेला होता. या घटनेत मुख्य आरोपी यूनियन कार्बाइड कार्पोरेशनचा सीईओ वॉरन अँडरसन याला धरण्यात आलं. अँडरसनला 6 डिसेंबर 1984 रोजी अटकही करण्यात आली होती, परंतु दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी त्याला सरकारी विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले आणि तेथून तो अमेरिकेला गेला. असं म्हणतात की भारतातून पसार होण्यासाठी त्याला सरकारनेच मदत केली होती. त्यानंतर अँडरसन भारतात परतला नाही. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. 29 सप्टेंबर 2014 रोजी व्हेरो बीच, फ्लोरिडा येथे अँडरसनचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. (Bhopal Gas Tragedy)
=====
हे देखील वाचा : अमेरिकेने घ्यावे भारताकडून धडे !
========
भोपाळ गॅस ट्रॅजडीमध्ये जखमी झालेल्या किंवा स्वत:च कुटुंब गमावलेल्या लोकांना कधीच न्याय मिळाला नाही. फेब्रुवारी १९८९ मध्ये युनियन कार्बाइड आणि केंद्र सरकार यांच्यात पीडितांना नुकसान भरपाई देण्यावरून करार झाला होता. यामध्ये कंपनीने नुकसान भरपाई म्हणून ४७० डोलर्स म्हणजेच ७१५ कोटी देण्याच ठरलं होतं. नंतर सरकारने ही रक्कम अपुरी असल्याचं सांगितलं. २०१० मध्ये सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करून ७८४४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी सरकारने केली. २०२३ साली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या खटल्यावर असा निकाल दिला गेला की, “नुकसानभरपाईची रक्कम पुरेशी होती. जर सरकारला ती अपुरी वाटत होती, तर त्यांनी स्वत:हून अधिक भरपाई द्यायला हवी होती. त्या घटनेला ३ दशकांहून अधिक काळ लोटल्यामुळे कंपनीला नव्याने पैसे भरण्यास सांगता येणार नाही.” आजही अनेक पीडित न्यायची वाट पाहत आहेत. जे या घटनेत मृत्यूमुखी पडेल त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा डोळे उघडेच होते आणि हीच या घटनेची दाहकता आहे. (Social News)