Home » रहस्याने भरलेले भोजेश्वर मंदिर

रहस्याने भरलेले भोजेश्वर मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Bhojeshwar Temple
Share

भारतात अनेक शिवमंदिरे आहेत.  यातील अनेक मंदिरांना पौराणिक वारसा आहे.  काही मंदिरातील शिवलिंगाची स्थापना भगवान रामांनी केल्याचीही माहिती आहे.  काही मंदिरे ही पांडवांनी स्थापिलेली आहेत.  भगवान शंकर हे तमाम भारतीयांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे भगवान शंकराची अनेक मंदिरे आपल्या देशात बघायला मिळतात.  ही सर्वच मंदिरे शिवभक्तांनी गजबजलेली असतात.  ही मंदिरे भारतीय वास्तूशास्त्राचा अजोड नमुना आहेत.  मात्र आपल्या देशात एक असेही मंदिर आहे, जेथील शिवपिंड ही जगातील सर्वात मोठी शिवपिंड म्हणून ओळखली जाते. असे असले तरी हे मंदिर कधीही पूर्ण करता आले नाही. अपूर्ण असलेल्या या शिवमंदिरात अनेक रहस्ये आहेत. आजही या मंदिराच्या परिसरात राहणारे नागरिक या शिवमंदिरातील रहस्यांची चर्चा करतात. हे मंदिर आहे, मध्यप्रदेशच्या भोपाळजवळील भोजपूरचे शिवमंदिर.  महाकाय शिवलिंग असलेल्या अपूर्ण मंदिराचे वैशिष्ट हे मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात आहे. या मंदिराच्या  गर्भगृहात स्थापित केलेले शिवलिंग 22 फूट उंचीचे आहे. हे शिवलिंग जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे. या शिवलिंगाचा व्यास 7.5 फूट आहे. या भोजपूर शिवमंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. उत्तर भारताचे सोमनाथ मंदिर म्हणूनही हे भोजेश्वर शिवमंदिर प्रसिद्ध आहे. (Bhojeshwar Temple)

या भोजपूर मंदिराला भोजेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे शिवमंदिर भोपाळच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 32 किमी अंतरावर बेतवा नदीच्या टेकडीवर वसलेले आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अपूर्ण मंदिर आहे आणि त्याच्या अपूर्णतेचे कारण अद्यापही कोणालाही शोधता आले नाही.  या मंदिराच्या बांधकामाचे श्रेय मध्य भारतातील परमार घराण्यातील राजा भोजदेव यांना आहे. राजा भोजदेव हे कलेचे उपासक होते. कला, स्थापत्य आणि विद्येचे संरक्षक आणि एक उत्तम लेखक म्हणून त्यांची ओळख होती.  त्यांनी त्यांच्या काळात अनेक मंदिरे बांधली, त्यापैकीच हे एक मंदिर असल्याचे सांगण्यात येते. (Bhojeshwar Temple)

अन्य एका आख्यायिकेनुसार भोजेश्वर शिवमंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे.  पांडवांची आई, कुंती ही भगवान शिवाची उपासक होती.  मात्र वनवासात असतांना कुंतीला भगवान शिवाची आराधना करता येत नव्हती. त्यामुळे भीमाने हे मंदिर मोठ्या दगडांनी बांधले आणि शिवलिंगाची स्थापना केली. त्यानंतर कुंती, बेटवा नदीत स्नान करून भगवान शंकराची नित्यनियमानं पूजा करत होती, अशी कथा स्थानिक सांगतात.  हे मंदिर भिमानं बांधले आहे.  त्यामुळे त्याच्या बांधणीसाठी मोठे दगड वापरण्यात आले आहे.  स्वतः भिमानं भव्य शिवलिंगाची निर्मिती केली असेही सांगितले जाते.  तरीही हे भव्य मंदिर अपूर्ण का आहे, या रहस्याचा शोध अद्यापही घेतला जात आहे.  काहींच्या सांगण्यानुसार कुंतीनं हे मंदिर एका रात्रीत बांधण्याची अट भीमापुढे ठेवली होती.   त्यामुळे एका रात्रीत जेवढे उभारता येईल तेवढे हे मंदिर भीमानं बांधले आहे.  मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 70 हजार किलो दगड टेकडीच्या माथ्यावर नेण्यात आले.  हे एवढे दगड एका रात्रीत कसे नेले याचेही मोठे कोडे आहे. (Bhojeshwar Temple)

या शिवमंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे.  भोजेश्वर महादेव मंदिर (Bhojeshwar Temple) 106 फूट लांब आणि 77 फूट रुंद आहे.  हे मंदिर 17 फूट उंचीच्या चबुतऱ्यावर बांधले आहे. मंदिराचे गर्भगृहाचे काम अपूर्ण असून त्याचे छत 40 फूट उंचीच्या चार खांबांवर आहे.  गर्भगृहाचा दरवाजा अतिशय भव्य आहे.  त्याच्या दोन्ही बाजूंनी गंगा आणि यमुनेच्या मूर्ती आहेत.  याशिवाय या गर्भगृहात असलेल्या चार खांबावर शिव-पार्वती, सीता-राम, लक्ष्मी-नारायण आणि ब्रह्मा-सावित्री यांच्या मूर्ती आहेत.  या मंदिराबाबत आणखी एक वैशिष्ट म्हणजे, त्याचे छत.  या मंदिराचे छत घुमटाच्या आकाराचे आहे.  यावरुनच  भारतीय स्थापत्यकार ही घुमटाकार छत असलेले पहिले मंदिर मानतात. तसेच हे मंदिर म्हणजे इस्लामच्या आगमनापूर्वीच भारतात घुमट बांधले जात असल्याचा पुरावा असल्याचेही सांगण्यात येते.  या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहात स्थापित केलेले 22 फूट उंच शिवलिंग.  जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी हे  शिवलिंगाचा 7.5 फूट व्यासाचे आहे.  हे शिवलिंग एकाच दगडाचे बनलेले असून ते बनवण्यासाठी गुळगुळीत वाळूचा दगड वापरण्यात आला आहे.  या मंदिराच्या परिसरात अनेक शिलालेखही आढळतात.  त्या शिलालेखांचा अभ्यास चालू असून त्यात या अपूर्ण मंदिराच्या विस्तृत कामाचा आराखडा कोरण्यात आला आहे. या नकाशाच्या आकृत्यांनुसार, येथे एक मोठे मंदिर परिसर बांधण्याची योजना होती.   अनेक मंदिरे देखील बांधली जाणार होती.  या आराखड्यानुसार या मंदिराची बांधणी झाली असती तर आत्ता हे भोजेश्वर शिवमंदिर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक झाले असते.  मंदिरातील काही शिलालेखांवर यामध्ये केदारेश्वर, रामेश्वर, सोमनाथ, कालभैरव आणि रुद्र यांचेही वर्णन आढळते. (Bhojeshwar Temple)

=========

हे देखील वाचा : माया संस्कृतीची रहस्ये…

=========

या मंदिराच्या परिसरात पूर्वी तीन धरणे आणि एक तलाव होता.  मात्र मुस्लिम शासकांनी ही धरणे युद्धकाळात नष्ट केल्याची माहिती आहे.   तसेच मंदिराच्या एका शिलवालेखामध्ये मंदिराच्या बांधकामाची तारीखही असल्याचा दावा करण्यात येतो.  त्यानुसार या मंदिराची निर्मिती राजा भोज यांनीच केल्याचा दावाही आहे.  भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे मंदिर परिसराला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून चिन्हांकित केले गेले आहे. शिवरात्रीनिमित्त राज्य सरकारतर्फे दरवर्षी येथे भोजपूर महोत्सवाचे आयोजन केले जाते.  याशिवाय मकर संक्रांतीलाही येथे मोठा धार्मिक सोहळा होतो.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.