दिवाळीचा सण सध्या मोठ्या जल्लोषामध्ये सुरु आहे. उद्या अर्थात ३ नोव्हेंबर रविवार रोजी आपण दिवाळीचा शेवटचा दिवस साजरा करणार आहोत. भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊबीज म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा दिवस. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
या शुभ दिनी प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि जीवनात कायम तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाप्रमाणे हा सण देखील बहीण भावाच्या नात्याची साक्ष देतो.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या सणाला किंवा या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिनी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या घरी जाते, किंवा भाऊ देखील बहिणीच्या घरी जातो. बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि भाऊ त्यांना ओवाळणी देतो. मात्र तुम्हाला भाऊबीज हा सण का साजरा केला जातो माहीत आहे का? चला जाणून घेऊया.
भाऊबीजेचा मुहूर्त
भाऊबीजेची तिथी शनिवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सुरू होणार असून, रविवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार भाऊबीज रविवार ३ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल.
भाऊबीजेची कथा
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मृत्यूचा देव यमराज हा त्याची बहीण यमुनेकडे तिने अनेक वेळा बोलावल्यानंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि त्याचे औक्षण केले आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. यमुना म्हणाली की, तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करील, ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले आणि याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली, असे मानले जाते.
भाऊबीजेचा इतिहास
हिंदू पौराणिक कथेनुसार, नरकासुराचा पराभव केल्यानंतर भगवान कृष्णाने आपली बहीण सुभद्राला भेट दिली. सुभद्राने मिठाई आणि फुले देऊन त्यांचे स्वागत केले आणि कपाळावर तिलक लावला. तेव्हापासून हा दिवस भाईदूज साजरा केला जातो. दुसर्या कथेनुसार, मृत्यूचा देव यम त्याची बहीण यमुना हिला भेटला आणि तिलक समारंभाने त्याचे स्वागत केले. तेव्हा यमाने ठरवले की या दिवशी जो कोणी आपल्या बहिणीकडून तिलक आणि मिठाई घेईल त्याला दीर्घायुष्य लाभेल.