उत्तरप्रदेशमधील एका इंजिनिअरनं आत्महत्या केली आहे. बेंगळुरुच्या आयटी कंपनीमध्ये काम करणा-या या तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आत्महत्येला पत्नीला जबाबदार धरले आहे. 24 पानांची सुसाईड नोट ठेवत, या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला कशाप्रकारे टॉर्चर करण्यात आले, याची कहाणीच लिहून ठेवली आहे. अतुल शुभाष असे नाव असलेल्या या तरुणाची ही कहाणी सध्या व्हायरल होत आहे. महिलांच्या बाजुने असलेल्या कायद्यांचा फायदा घेत, सुभाषच्या पत्नीनं त्याला मानसिकदृष्ट्या जेरबंद केलं होतं. सुभाष या सर्वातून एवढा हतबल झाला होता की, त्यानं आत्महत्या का करत आहोत, याचा एक व्हिडिओच तयार केला. त्यात त्यानं आपल्या पत्नीला आणि तिच्या नातेवाईकांना माझ्या अंत्यसंस्काराला येऊ नका, म्हणून विनंती केली आहे. तर माझ्या मृतदेहाची राख न्यायालयासमोरच्या गटारात फेकून द्या, अशा शब्दात न्यायालयाकडूनही होत असलेल्या मानसिक कुचंबणेचा निषेध केला आहे. (Bengaluru)
बेंगळुरु मधील एका तरुण इंजिनिअरची आत्महत्या ही संवेदनशील व्यक्तीला धक्का देणारी गोष्ट ठरली आहे. मुळ उत्तरप्रदेश येथील अतुल सुभाषचे निकिता सिंघानिया हिच्याबरोबर लग्न झाले होते. मात्र अतुलला सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया, काकू आणि सासरे सुशील सिंघानिया यांनी एवढा त्रास दिला की त्यानं आत्महत्या केली. अतुलवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पत्नीला तो पोटगी म्हणून महिना 40 हजारांची रक्कम देत आहे. पण पत्नीची अपेक्षा जास्त आहे. त्याची पत्नी, म्हणजेच निकिता सिंघानिया त्याला मुलांचीही भेट घेऊ देत नसल्यामुळे अतुल आणखीन डिप्रेशनमध्ये गेला होता. आत्महत्या करतांना त्यानं पत्नीसह सासरच्या मंडळींनी आमच्याकडून पैसे उकळण्याचा मोठा कट रचल्याचा आरोप केला आहे. अतुल सुभाषने इंटरनेटवर 1:20 तासांचा एक व्हिडिओ जाहीर करत आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. सोबत 34 वर्षीय अतुल सुभाषने 24 पानांचे एक जाहीर करत आपण आत्महत्या का करत आहोत, हे सांगितले आहे. त्याचा हा व्हिडिओ जाहीर झाल्यावर त्याच्या फ्लॅटची दरवाजा तोडला. मात्र त्याला उशीर झाला होता, कारण अतुल सुभाषने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलीस पोहचेपर्यंत अतुलचा मृतदेहच हाती लागला. अतुलच्या पत्नीने त्याच्यावर घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. (Latest Updates)
शिवाय अतुलच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध वेगवेगळ्या कायद्यांनुसार आणि कलमांतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत. यासगळ्या खटल्यांचा अतुलच्या कुटुंबियाना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करत आत्महत्या करण्याचा निर्णय ऑनलाईन जाहीर केला आणि आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं जे पानांचे पत्र लिहून ठेवले आहे, त्यामध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायव्यवस्थेमध्ये पिडित महिलांना न्याय लवकर दिला जातो, मग पत्नीपिडित पुरुषांच्या बाबतीत न्याय कधी मिळणार. सर्वच पुरुष वाईट नसतात, काही वेळा महिलांचीही भूमिका चुकीची असते, अशावेळीही न्यायालयात पुरुषांची बाजू का समजून घेतली जात नाही, असे गंभीर प्रश्न अतुल सुभाष यांनी या पत्रातून विचारले आहेत. अतुल सुभाष आणि निकिता सिंघानिया यांचे मॅट्रिमोनी साइटद्वारे 2019 मध्ये लग्न झाले होते. पुढच्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. अतुलच्या सांगण्यानुसार लग्न झाल्यापासून त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीचे कुटुंब नेहमी पैशाची मागणी करायचे. अतुलने प्रत्येकवेळी ही मागणी पूर्ण केली असून आत्तापर्यंत सिंघानिया कुटुंबाला लाखो रुपये दिले आहेत. मात्र हे पैसे देणे बंद केल्यावर त्याच्या पत्नीने 2021 मध्ये मुलासह बेंगळुरू सोडले. यानंतर अतुल यांचा मानसिक छळ सुरु केला. (Bengaluru)
अतुलच्या पत्नीने त्यांच्यावर हुंडा मागितल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच त्यांच्या कुटुंबावरही अनेक गुन्हे दाखल केले. त्यात चक्क खून आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या गंभीरप्रकरणांचा समावेश आहे. निकिता यांच्या वडिलांचा मृत्यू अतुलने केलेल्या हुंड्याच्या मागणीमुळे झाल्याचा आरोप आहे. पण अतुलच्या म्हणण्यानुसार निकिताचे वडील दीर्घकाळापासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. आरोग्य समस्या आणि मधुमेहामुळे त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांची ढासळती प्रकृती बघूनच निकितानं अतुलसोबत घाईघाईनं लग्न करुन वडिलांची इच्छा पूर्ण करत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृत्युचे खापर अतुलवर फोडण्यात आले. या आरोपानंतर निकितानं अतुलकडे 3 कोटींची मागणी केली. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटीवर ती तडजोड करण्यासाठी मान्य झाली. या प्रकरणी जौनपूर कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांवरही अतुलनं गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीशांना त्यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते, तेव्हा या न्यायाधीशांनी तुम्ही कुटुंबाचा विचार करून खटला निकाली काढा. खटला निकाली काढण्यासाठी मी 5 लाख रुपये घेईन, असे सांगितल्याचे अतुलच्या अंतिम पत्रात नमुद आहे. अतुल न्यायालयाच्या आदेशानं निकिताला दर महिन्याला 40 हजार रुपये भरपोषणासाठी देत होता. मात्र तिला मुलाच्या संगोपनासाठी दर महिन्याला 2 ते 4 लाख रुपये हवे होते. (Latest Updates)
========
हे देखील वाचा : पुण्याच्या शनिवारवाड्यातून आजही अशी आरोळी ऐकू येते !
========
पैसे न दिल्यानं तिनं अतुलपासून त्याच्या मुलालाही दूर ठेवले होते. फक्त निकिताच नाही, तर तिचे सर्व कुटुंबच अतुलच्या मागे लागल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. निकिताची आई, त्याला वारंवार तू मेलास तरी तुझ्या वडिलांकडून आम्ही पैसे वसूल करु असे धमकावत असल्याचे अतुलनं म्हटले आहे. निकिता माझ्या पैशावर ऐश करत आहे, शिवाय त्याच पैशातून माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करीत आहे, त्यामुळे मी पैशाचा मार्गच बंद करत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे अतुलने या पत्रात म्हटले आहे. असेच पत्र अतुलने राष्ट्रपतींनाही पाठवून पत्नी पिडित पुरुषांसंदर्भात कायदे कडक करुन महिलांनाही कडक शासन होईल अशी तरदूत करा, ही मागणी केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर अतुलचे वडिल आणि भावांनी पोलीस आणि न्यायालयावर तीव्र शब्दात टिका केली आहे. अतुलच्या अस्थिकलशाचे विसर्जन त्याला न्याय मिळाल्यावरच करणार असे त्यांनी सांगितले आहे. अतुलची आत्महत्या ही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करुन गेली आहे. आत्महत्या करणे ही बाब चुकीचीच आहे, मात्र त्याला हा टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडणारी परिस्थिती आणि यंत्रणाही त्याला जबाबदार आहे. अतुलनं त्याच्या अंतिम पत्रात ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्यांची चौकशी करुन त्यांना शिक्षा मिळावी, अशी मागणी होत आहे. (Bengaluru)
सई बने