फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. कोणाला कमी तर कोणाला जास्त, मात्र फिरायला जायला सगळ्यांना आवडते. आपण नेहमीच विकेंडला किंवा सुट्ट्या काढून विविध ठिकाणी फिरायला जात असतो. वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जाऊन आपण त्या ठिकाणांचे सौंदर्य पाहत आराम करतो. अनेकदा आपल्याला लांब लांब ठिकाणी सहलीला जाण्यासाठी नोकरदार वर्गाला जास्त सुट्ट्या मिळणे जरा अवघड असल्याने आपण जवळपासच जायला प्राधान्य देतो.
आता सणासुदीचे दिवस सुरु झाले असून, अनेक जोडून सुट्ट्या आहेत. यासाठी तुम्ही देखील कुठे जाण्याचा प्लॅन करत आहात का? लोणावळा, खंडाळा, कर्जत आदी ठिकाणी जाऊन जाऊन कंटाळा मग आज आम्ही तुम्हाला असे एक ठिकाण सांगणार आहोत जे जवळपण आहे आणि अतिशय सुंदर देखील आहे. या ठिकाणाबद्दल तुम्ही ऐकले असेल मात्र तिथे बघण्यासाठी काय काय आहे याची सर्व इत्यंभूत माहिती या लेखात तुम्हाला मिळेल.
आपल्या महाराष्ट्र्राला निसर्गाने अतिशय मोकळ्या हाताने भरभरून सुंदरता प्रदान केली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणं अतिशय सुंदर आहेत, मात्र यात कोकणाचे सौंदर्य काही औरच आहे. कोकणाला तर निसर्गाने अतिशय शांतपणे आणि वेळ घेत बनवले आहे. कोकणातील अगदी लहान आणि जास्त लोकप्रिय चर्चेत नसलेल्या जागी सुद्धा अतीव सुंदरता आहे. याच कोकणातले एक ठिकाण म्हणजे ‘दापोली’.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे छोटेसे शहर. तालुक्याचे ठिकाण आहे. कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे. नेहमीच्या रूटीनपासून ब्रेक हवा असल्यास दापोलीला नक्कीच भेट देता येईल. दापोलीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देताना दिसतात.
पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करण्याचे मुख्य कारण म्हणजे इथले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आणि सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी मिळणारे भरपूर ऑप्शन्स. दापोली शहर समुद्रसपाटीपासून साधारणपणे ८०० फुट उंचीवर वसले आहे आणि शहरापासून समुद्रकिनारा ८ किमीवर आहे.
दापोली म्हणजे समुद्रकिनारे. पर्यटकांची वर्षभर वर्दळ असूनही इथले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत. सोबतच इथल्या काही बीचवर तुम्हाला डॉल्फीन आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल एवढा निवांतपणा अनुभवता येईल.
दापोलीमध्ये कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच, लाडघर बीच, कोळथरे बीच आणि तामस तीर्थ बीच आदी बीचेस आहे. सर्वच बीचची आपली एक वेगळी विशेषतः आहे. अतिशय सुंदर आल्हादायक वातावरण आणि नितांत सुंदर पाणी, निरव शांतता असलेले हे बीचेच आपल्यासाठी जणू स्वर्गच आहे.
मुरूड बीच –
या बीचवर वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्यामुळे मुरूड बीच हा फिरण्यासाठी चांगला पर्याय आहे. दापोलीपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर हा बीच आहे. इथे तुम्हाला जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग असे आणि अजून बरेच वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील. जर तुम्ही सकाळी 9 च्या आधी या बीचवर आलात तर तुम्हाला समुद्रात जाऊन डॉल्फीन पाहण्याचीही संधी मिळेल.
लाडघर बीच –
लाडघर बीच हा अगदी निवांत आणि काहीसा निर्मनुष्य असा आहे. मात्र या बीचला अगदी भरभरून सौंदर्य लाभले आहे. लाडघरपासून काही अंतरावरच बुरोंडी आहे. जिथल्या उंच डोंगरावर परशुरामाचे स्मारक आहे. शिवाय रस्त्यातच आपल्याला तामस तीर्थ देखील लागते. इथला संपूर्ण समुद्रकिनारा तांबड्या रंगाचा भासतो. कारण समुद्रकिनाऱ्यावरील सर्व खडक आणि दगड हे तांबड्या रंगाचे आहेत.
आसूद बाग –
दापोली अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण आहे. हे ठिकाण उन्हाळ्यातही हिरवागार असते. फणसाने लगडलेली झाड आणि नारळीपोफळीच्या वाड्या इथे भरपूर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. आसूद बाग म्हणजे केशवराजाचे मंदिर. या मंदिरात जाण्यासाठी आधी डोंगर उतरून पुन्हा तेवढाच डोंगर चढावा लागतो. तब्बल 200 पायऱ्या चढून गेल्यानंतर केशवराजाचे देऊळ दिसते. या देवळातील गोमुखातून बारा महिने थंड पाणी वाहते.
दापोलीच्या इतिहासाची साक्ष असलेले समुद्रातील किल्लेही इथे आहेत. यात सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला आणि कनकदुर्ग. सुवर्णदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळात बांधण्यात आला होता. पण या किल्ल्यांची बरीच पडझड झाली आहे. मराठा आरमाराच्या नौकाबांधणीचे काम येथे होत असे. कनकदुर्ग किल्ल्यावर सर्वात जुने लाईटहाऊसही आहे.
कनकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला हे तिन्ही किल्ले सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी हर्णे समुद्रकिनाऱ्यावर बांधले आहेत. तिन्ही किल्ले चिंचोळ्या भूभागाने हर्णे बंदराला जोडले आहेत. कनकदुर्ग किल्ला समुद्रात घुसलेल्या कातळाच्या माथ्यावर बांधला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या असून जवळच डाव्या हाताला दगडी बुरुज आहे.
उन्हवरे येथील गरम पाण्याची कुंड ही दापोलीपासून ३५ किमीवर असलेल्या उन्हवरे गावात आहे. हे गांव पन्हाळेकाजी लेण्यांच्याजवळ आहे. येथील गंधकयुक्त पाण्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात अशी लोकांची धारणा आहे.
हर्णे बंदर आणि मासळी बाजार म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मासळीबाजार अशी हर्णे मासळी बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रीमासे बघावयास मिळतात. येथील बाजारात रोज मास्यांचा लिलाव केला जातो.
=======
हे देखील वाचा : कोलकाता घटनेवर किरण मानेंची सणसणीत पोस्ट
=======
व्याघ्रेश्वर मंदिर हे केशवराज मंदिरापासून अवघ्या २-३ किमी वर हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, काळभैरव आणि झोलाईदेवी इ. देवतांची मंदिरे आहेत. व्याघ्रेश्वर मंदिर नदीच्या काठावर असून नदीला सुंदर घाट बांधला आहे.
मुरुड समुद्रकिनारा हा दापोलीपासून १२-१३ किमीवर समुद्राच्या जवळ मुरुड गाव आहे. येथील समुद्र किनारा प्रेक्षणीय असून भरपूर मोठा आहे. पावसाळासोडून स्थानिक कोळी लोकांच्या बोटीतून डॉल्फिन बघण्यासाठी जाता येते.
महर्षी कर्वे उर्फ भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे यांचे मुरुड हे जन्मस्थळ. दुर्गादेवी मंदिराजवळ असलेल्या शाळेच्या प्रांगणात महर्षी कर्वे यांचा अर्धपुतळा आहे. महर्षी कर्वे यांच्याशिवाय साने गुरुजी (पालगड), लोकमान्य टिळक (चिखलगाव) आणि भारतरत्न पी. वी. काणे यांचा जन्म देखील दापोलीचाच आहे. अशा निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या दापोलीला भेट अवश्य दिली पाहिजे.