पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आशिया कपमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऐतहासिक विजय मिळवत आशिया कपच्या फायनलमधील आपले स्थान पक्के केले. आज भारतीय संघ साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळण्यास उतरेल. कोलंबोमध्ये रंगणाऱ्या या सामन्यात भारतीय संघापुढे बांगलादेशचे आव्हान असेल. बांगलादेशचे आशिया कपमधील आव्हान अगोदरच संपुष्टात आले आहे. त्यामुळे मुख्य खेळाडूंना विश्रांती देत बेंचवरील खेळाडूंना या सामन्यात संधी देण्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापन करेल. (IND vs BNG)
आशिया कपमध्ये आतापर्यंतची भारताची कामगिरी लौकिकाला साजेशी राहिली आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोखपणे पार पाडत संघाच्या यशात महत्वाची भूमिका बजावली आहे. आशिया कपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघासमोर पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेअगोदर संघबांधणी करण्याचे आवाहन आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बरेच बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. रोहित – शुभमन ही सलामी जोडगोळी भारताला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत विराट कोहलीने देखील आपण फार्मात असल्याचे दाखवून दिले आहे. (IND vs BNG)
तसेच दुखापतीमुळे जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर असणाऱ्या के एल राहुलने आपल्या पुनारागमनाच्या सामन्यात शतकी खेळी करत संघाच्या बऱ्याच समस्यांचे समाधान दिले आहे. २०१९ च्या क्रिकेट वर्ल्डकपमधील अपयशामागे भारताच्या मध्यफळीतील फलंदाजी विशेषतः चार नंबरचा फलंदाज शोधण्यास आलेले अपयश मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. के एल राहुलच्या शतकी खेळीमुळे चार नंबरची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली असे म्हणता येईल. तसेच संघात चार नंबरवर दावेदारी करणारे अजून दोन खेळाडू आहेत, सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर. वर्ल्डकप अगोदर या दोघांना पुरेसे सामने खेळवणे गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे आज यांपैकी कुणीतरी मैदानात दिसू शकेल. (IND vs BNG)
============
हे देखील वाचा : देशातील पहिल्या नाण्याचा इतिहास
============
प्रदीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने आशिया कपमध्ये अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज फलंदाजांना अडचणीत आणण्यात यशस्वी ठरला आहे. परंतु वर्ल्डकप संघात असणाऱ्या मोहम्मद शमीला पुरेसे सामने खेळण्याची संधी द्यावी लागेल. तोदेखील आज सामना खेळतांना दिसू शकतो. (IND vs BNG)
भारताच्या दृष्टीकोनातून या सामन्याला तेवढेसे महत्व नाही. परंतु नवीन खेळाडूंना मैदानात उतरवून संघबांधणी मजबूत करायला भारताला या सामन्यात संधी आहे.