रविवार प्रेक्षकांसाठी दोन आयपीएल (IPL) सामन्यांची पर्वणी घेऊन आला. दुपारच्या सामन्यात बंगळूरूसमोर राजस्थानचे आव्हान होते तर संध्याकाळी चेन्नई आणि कोलकाता या संघांमध्ये चुरस बघायला मिळाली. पहिल्या सामन्यात बंगळूरूने दणदणीत विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात धोनीच्या चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात बंगळूरूचा दणदणीत विजय (IPL)
फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे अत्यंत महत्वाच्या सामन्यात राजस्थानला अत्यंत दारुण पराभव स्वीकारावा लागला. बंगळूरूने दिलेल्या १७१ धावांच्या लक्षाचा पाठलाग करतांना राजस्थानचा डाव अवघ्या ५९ धावांवर गडगडला. आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. ११२ धावांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत बंगळूरूने आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले.
जयपूर येथे झालेल्या सामन्यात बंगळूरूने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करतांना राजस्थानची सुरुवात फार निराशाजनक झाली. राजस्थानचे दोन्ही सलामी फलंदाज भोपळा न फोडताच माघारी परतले. कर्णधार संजू सॅमसनला ( ५ चेंडूत ४ धावा ) देखील विशेष कामगिरीचे प्रदर्शन करता आले नाही. बंगळूरूच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजीला अक्षरशः सुरुंग लावला.(IPL)
शिमरोन हेटमायर ( १९ चेंडूत ३५ धावा ) वगळता राजस्थानच्या कुठल्याही फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही. बंगळूरूकडून वेन पार्नेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकात १० धावा देत ३ बळी मिळवले. मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला योग्य साथ दिली. ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनीदेखील प्रत्येकी एक बळी मिळवला.(IPL)
तत्पूर्वी बंगळूरूने फाफ डू प्लेसी ( ४४ चेंडूत ५५ धावा ), ग्लेन मॅक्सवेल ( ३३ चेंडूत ५४ धावा ) आणि अनुज रावत ( ११ चेंडूत २९ धावा ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १७१ धावांचे लक्ष उभे केले. तर राजस्थानकडून के एम असिफ आणि अॅडम झाम्पा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या विजयानंतर बंगळूरूचे प्लेऑफच्या आशा अजून पल्लवित आहेत तर राजस्थानचा मार्ग अजून खडतर झालेला आहे.(IPL)

चेन्नईच्या विजयरथाला कोलकाताचा ब्रेक (IPL)
सुनील नरेन ( १५ धावांत २ बळी ) आणि वरून चक्रवर्ती ( ३६ धावांत २ बळी ) यांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर कर्णधार नितीश राणा ( ४४ चेंडूत नाबाद ५७ धावा ) आणि रिंकू सिंग ( ४३ चेंडूत ५४ धावा ) यांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे रविवारी झालेल्या सामन्यात कोलकात्याने चेन्नईच्या संघावर ६ गडी राखून मात केली. अत्यंत महत्वाच्या सामन्यातील या विजयामुळे कोलकत्याचे आयपीएल मधील आव्हान अजून शाबूत आहे, तर चेन्नईला प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यासाठी अजून एका सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रथम फलंदाजी करतांना शिवम दुबे ( ३४ चेंडूत ४८ धावा ), डेवोन कॉनवे ( २८ चेंडूत ३० धावा ) आणि रवींद्र जडेजा ( २४ चेंडूत २० धावा ) यांच्या फलंदाजीच्या बळावर कोलकात्यासमोर १४४ धावांचे आव्हानात्मक लक्ष ठेवले. तर चेन्नई कडून दीपक चहर हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २७ धावा मोजत ३ फलंदाजांना माघारी धाडले.