आपल्या देशाची कायम कुरापत काढणा-या पाकिस्तानचेच आता तुकडे पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे, तो बलुचिस्तान हा भाग. पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमधून गेली अनेक वर्ष तरुणांना जबरदस्तीने नेण्यात येत आहे, आणि त्यानंतर हे तरुण मृत अवस्थेत सापडत आहेत, किंवा बेपत्ता होत आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून हा अत्याचार होत असल्याचा आरोप बलुचिस्तामधील जनतेचा आहे. (Balochistan)
आता या अत्याचाराविरोधात अवघा बलुचिस्तान पेटला आहे. येथील जनतेनं पाकिस्तान सरकार विरोधात मोर्चा काढत थेट राजधानी इस्लामाबादपर्यंत कुच केली. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. इस्लामाबादच्या वेशीवर हा मोर्चा अडवला तरी बुलचिस्तानमधील जनतेचा आक्रोश कमी झालेला नाही. कारण या भागातील एका 24 वर्षीय तरुणाचे असेच अपहऱण करत त्याला मारण्यात आल्याचा आरोप आहे. या तरुणाला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार बलुचिस्तानमधील जनतेनं केला आहे. त्यामुळेच आता हा बलुचिस्तानचा भाग पाकिस्तानपासून वेगळा होण्याची चिन्हे आहेत. (Balochistan)
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद सध्या बलुच चळवळीच्या लॉंग मार्चेनं हादरली आहे. बलोच नेता मेहरंग बलोच याच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानं पाकिस्तानच्या राजधानीला घेराव घातला आहे. तेव्हापासून बलुचिस्तान नेमका कसा आहे, याची उत्सुकता वाढली आहे.
भारत आणि पाकिस्तानची फाळणी 1947 साली झाली. त्यावेळी बलुचिस्तान वेगळा देश होण्याच्या मार्गावर होता. मात्र पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानवर हल्ला करून हा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून बलुचिस्तान आपल्या हक्कांसाठी आणि वेगळ्या देशासाठी पाकिस्तानविरोधात आंदोलन करत आहे. (Balochistan)
बलुचिस्तान, हा सर्वात कमी विकसित प्रदेशांपैकी एक आहे. अतिशय विषम वातावरण या भागात आहे. बामपुश्त पर्वत रांगामुळे या भागाला बलुच प्रांत असे नाव पडले. या प्रदेशाच्या मध्यभागी मुबलक भूजल आणि नद्या आहेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या या प्रांताने सुरुवातीपासून आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा चालू ठेवला आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांत बलुचिस्तानवासीयांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांविरोधात निदर्शने तीव्र केली आहेत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे 23 वर्षीय बलुच तरुणाची हत्या.
बलुचिस्तानच्या काउंटर टेररिझम विभागाने शिंपी म्हणून काम करणाऱ्या बालच मोलाला स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली. मात्र काही दिवसातच सुरक्षा अधिकारी आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून बलुच लोक सातत्याने पाकिस्तानविरोधात आंदोलन करत आहेत.
या घटनेमुळे बलुचिस्तानमधील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तुर्बत शहरात आठवडाभर आंदोलन झाली. मयताचे कुटुंबीय आणि आंदोलकांनी बालच मोलाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून निषेध केला. हत्येनंतर सात दिवसांनी त्याचे दफन करण्यात आले. मात्र, तोपर्यंत लोकांमध्ये नाराजी वाढली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की 1600 किमी लांबीचा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बलुचिस्तानातील विविध शहरांतील लोक सामील झाले. (Balochistan)
या मोर्चानं राजधानीत प्रवेश करताच विरोधी पक्षनेते मेहरंग बलोचसह किमान 200 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय अन्य मोर्चेक-यांवर अतिशय क्रूरपणे लाठिचार्ज करण्यात आला. त्यामुळे अनेक मोर्चेकरी गंभीर जखमी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग होता. बलुचिस्तानमधून दरवर्षी शेकडो नागरिकांचे पाकिस्तानी लष्कराकडून अपहरण केले जाते. यातील काही लोक परत जातात, पण काहींचा ठावठिकाणा कळत नाही.
दहशतवादाचा नायनाट करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कर अपहरण केलेल्या लोकांवर अत्याचार करत असल्याचे मोर्चेक-यांनी सांगितले आहे. बलुच तरुणांच्या हत्या थांबवाव्यात ही या मोर्चेक-यांची प्रमुख मागणी आहे. पाकिस्तानी लष्कर या बलुच तरुणांची हत्या करुन त्यांचे मृतदेह रस्त्याच्या बाजुला टाकून देते. असे जवळपास 5000 तरुण लष्कराच्या अत्याचाराला बळी पडले आहेत. त्यांच्या सर्व नातेवाईकांचा या मोर्चात सहभाग होता. (Balochistan)
===============
हे देखील वाचा : बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत राजघराण्यांचे जावई
===============
मुळात बलुचिस्तान या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. बलुचिस्तानमध्ये कोळसा, सल्फर, क्रोमाईट, लोहखनिज, बॅराइट, संगमरवरीपासून नैसर्गिक वायूपर्यंतचे साठे सापडले आहेत. तथापि, खनिज संपत्तीने समृद्ध असूनही, बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात गरीब प्रांत आहे. येथील 70 टक्के लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही नाही. बलुचिस्तानची 60 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. पाकिस्तान आपल्या खनिज संपत्तीचा वापर करत आहे, पण त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही, असे येथील जनतेला वाटते. यामुळे येथे अनेक संघटना तयार झाल्या आहेत. या संघटना पाकिस्तानी प्रकल्प आणि लष्करावर हल्ले करत आहेत. गेल्या अनेक वर्षांचा हा संघर्ष आता थेट रस्त्यावर उतरला आहे.
सई बने