इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यातले अनेक शहीदांची नावं आपल्याला माहिती आहेत. पण काही असेही क्रांतिकारी आहेत, जे आपल्या विस्मरणात गेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्याबद्दल जास्त लोकांना माहित नाही आहे. असेच एक क्रांतीकारी म्हणजे बाबुराव गेनू सैद. वयाच्या २२ व्या वर्षी जे इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनात शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाला इंग्रजांनी अपघात ठरवलं होतं. या अशा तरुण क्रांतीकारकाबद्दल जाणून घेऊया. (Baburao Genu Said)
१९०९ साली पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ गावात बाबू गेनू यांचा जन्म झाला. ते एकदम हलाखीच्या परिस्थितीत वाढले. बाबू गेनू यांच्या लहानपणीचं त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी त्यांची आई त्यांना घेऊन मुंबईला आली. पुढे मुंबईत गिरणीत ते काम करू लागले. पण मनात स्वातंत्र्य लढ्याचा ध्यास होताच. तेव्हा देशात इंग्रजांविरोधी चळवळींचा जोर वाढला होता. बाबू गेनूही या चळवळीत सहभागी होऊ लागले. सायमन कमिशन विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात ते होते, त्याशिवाय गांधीजींच्या मीठाच्या सत्याग्रहात सुद्धा त्यांचा सहभाग होता. परदेशी मालाला विरोध केल्यामुळे आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी रस्त्यावर उतरल्यामुळे वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पण शिक्षेला घाबरेल तो क्रांतीकारी कसला? शिक्षा भोगून परतल्यानंतर पुन्हा ते याच परदेशी मालाच्या विरोधातील आंदोलनात सक्रिय झाले. तेव्हा परदेशी मालाच्या विरोधातील चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ यांनी जोर धरला होता. संपूर्ण देश इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठला होता. मोर्चे आंदोलनं रोज ठिकठिकाणी निघत होती. अशाच एका आंदोलनाचा तो दिवस १२ डिसेंबर १९३०. (Social News)
मुंबईच्या काळबादेवी परिसरात एका गोदामात परदेशी मालाने भरलेले दोन ट्रक कोर्ट मार्केटला जाण्यासाठी निघाले होते. क्रांतिकाऱ्यांना याची माहिती मिळाली होती आणि या क्रांतीकाऱ्यांमध्ये एक होते २२ वर्षांचे बाबू गेनू. हनुमान रोडवर ट्रक थांबवण्याचं ठरलं आणि मग तिथे मोठी गर्दी जमली. जॉर्ज फ्रेझर या व्यापाऱ्याचे ते ट्रक होते. फ्रेझरला याची माहिती मिळाली आणि त्याने मोठ्या प्रमाणावर पोलिसांची मदत मागवली. सर्व क्रांतिकारी ट्रकच्या रस्त्यात उभे राहिले. पोलिस त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. पण पुन्हा पुन्हा क्रांतिकारी रस्त्याच्या मधोमध येत राहिले. बाबू गेनू हे तेव्हा अक्षरशः रस्त्यावर आडवे पडले आणि ट्रक पुढे जाऊ देणार नाही, यासाठी ठाम राहिले. अखेर उपस्थित असलेला एक ब्रिटिश सार्जंट चिडला आणि बाबू गेणूला बाजूला होण्याचा त्याने इशारा केला. बाबू गेनू हे बाजूला होण्यास तयार झाले नाहीत. तेव्हा या ब्रिटिश सार्जंटने ट्रक ड्रायव्हरला ट्रक चालवण्याचा आदेश दिला पण ट्रक ड्रायव्हर विठोजी धोंडू याने ट्रक पुढे नेण्यास नकार दिला. यानंतर त्या ब्रिटिश सार्जंटने ट्रकचा ताबा आपल्या हातात घेत तो ट्रक सुरु केला आणि बाबू गेनू यांच्या अंगावरून नेला. रस्ता रक्ताने लाल झाला. २२ वर्षांच्या या कोवळ्या पठ्याने स्वदेशी आंदोलनात हौतात्म्य पत्करलं. (Baburao Genu Said)
========
हे देखील वाचा : भारताचं लाल सोनं म्हणजे रक्तचंदन !
========
बाबू गेणू त्याआधी फार लोकांना माहित नव्हते, पण त्यानंतर त्यांचं नाव सर्वांच्या मुखात होतं. दुसऱ्या दिवशी, कन्हैयालाल मुंशी, यूसुफ मेहरअली, पेरीन कॅप्टन यांचासह जवळ जवळ २० हजारपेक्षा जास्त लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होते. प्रेतयात्रेत शांतपणे चालली होती. बाबू गेनू अमर रहे याच्या घोषणा दिल्या जात होत्या. जमलेल्या लोकांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर करण्याची इच्छा होती. तो पर्यंत या किनाऱ्यावर फक्त लोकमान्य टिळक यांच्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पण ब्रिटिश प्रशासनाने बाबू गेनू यांच्या अंत्यसंस्कारासाठी येथे परवानगी नाकारली. तेव्हा गोंधळ निर्माण झाला पोलिस आणि जमावामध्ये लाठीचार्ज झाला. ब्रिटिश प्रशासनाच्या माहिती संचालकाने एक प्रेस नोट जारी केली ज्यात या घटनेचं “दुर्दैवी अपघात” म्हणून वर्णन करण्यात आलं. पोलिसांच्या रीपोर्टमध्ये तर बाबू गेनू यांचा मृत्यू ट्रकखाली चिरडल्यामुळे झाला नसून ट्रकचा धक्का लागल्यामुळे झाला असं लिहिलं होतं. पण खरंतर त्यांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात उतरले. आज एका रस्त्याला त्यांचं नाव आणि एक स्मारक याशिवाय बाबू गेनू हे नाव इतिहासातून नाहीसच झालं आहे. त्याकाळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’, नवाकाळ, बॉम्बे क्रोनिकल अशा तत्कालीन वृत्तपत्रांनीही त्यांच्या हौतात्म्याची बातमी केली होती. विस्मृतीत गेलेला हा नायक सर्वांच्या स्मरणात रहावा, यासाठीच हे दोन शब्द! (Social News)